जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी पक्षाच्या अध्यक्षा महबुबा मुफ्ती यांनी दिल्लीत सोमवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल केला. महबुबा मुफ्ती म्हणाल्या की, “भाजपाने जम्मू काश्मीरचा अफगाणिस्तान केलाय! राज्यभरात अतिक्रमणविरोधी मोहीमेअंतर्गत गरीब आणि अल्पभूधारकांची घरं पाडली जात आहेत. त्यांच्या घरांवर बुल्डोझरचा फिरवला जात आहे.”
पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्षा मुफ्ती म्हणाल्या की, “मी देशातल्या सर्व विरोधी पक्षांना आवाहन करते भाजपाकडून काश्मीरमध्ये सुरू असलेल्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करू नका. भाजपा त्यांच्या प्रचंड बहुमताचा वापर संविधानाची पायमल्ली करण्यासाठी करत आहे.”
जम्मू काश्मीरची परिस्थिती पेलेस्टाईनपेक्षा गंभीर
मुफ्ती म्हणाल्या की, “जम्मू काश्मीरमधली सध्याची स्थिती पेलेस्टाईनपेक्षा गंभीर आहे. कमीत कमी तिथले लोक एकमेकांशी बोलू तरी शकतात. ज्या प्रकारे काश्मीरमधली स्थिती आहे, इथल्या लोकांची घरं पाडण्यासाठी बुल्डोझर फिरवला जात आहे, त्यावरून दिसतंय की, काश्मीर अफगाणिस्तानपेक्षा वाईट होत चालला आहे.”
पीडीपी नेत्या म्हणाल्या की, “लेफ्टनंट गवर्नर मनोज सिन्हा यांनी दावा केला आहे की, अतिक्रमणविरोधी मोहिमेअंतर्गत गरिबांच्या घरांचं कोणतंही नुकसान होऊ दिलं जाणार नाही. परंतु जमिनीवर नेमकं त्याच्या उलट घडत आहे. टिन शेड असलेली घरं देखील पाडली जात आहेत.”
हे ही वाचा >> …म्हणून परवेज मुशर्रफ यांचं निधन झालं, Amyloidosis आजाराबद्दल माहितीय का? जाणून घ्या सविस्तर
“एक देश, एक भाषा, एक धर्म”
मुफ्ती म्हणाल्या की, “एक संविधान एक विधान आणि एक प्रधान अशा घोषणा देणाऱ्या लोकांनी आता एक देश एक भाषा एक धर्म असा नारा देणं सुरू केलं आहे. आता असं वाटू लागलं आहे की, देशात संविधानाचं अस्तित्व राहिलेलं नाही.”