BJP Two MLAs suspended : देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपात मागील काही दिवसांपासून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. आमदारांकडून वारंवार होणारी बेताल वक्तव्ये व पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षाला अडचणीचा सामना करावा लागतो आहे. हीच बाब लक्षात घेता भाजपाने आपल्या दोन आमदारांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. एस. टी. सोमशेखर व शिवराम हेब्बर अशी भाजपातून हकालपट्टी झालेल्या आमदारांची नावे आहेत. या दोन्ही आमदारांना पुढील सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे. दरम्यान, या दोन्ही आमदारांची पक्षातून हकालपट्टी का करण्यात आली? इतकं गंभीर काय घडलं? याबाबत जाणून घेऊ…
दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, भाजपाच्या केंद्रीय शिस्तभंग समितीने कर्नाटकचे आमदार ए. शिवराम हेब्बार व एस. टी. सोमशेखर यांना मंगळवारी पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे या दोन्ही आमदारांना भाजपाने २५ मार्च २०२४ रोजी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या होत्या. या नोटीसीला उत्तर न दिल्यामुळे दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. विशेष बाब म्हणजे, याआधी मार्च २०२४ मध्ये भाजपाने आमदार बसणगौडा पाटील यतनाळ यांनाही पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले होते.
‘ऑपरेशन लोटस’अंतर्गत भाजपामध्ये आले
प्राप्त माहितीनुसार, आमदार एस. टी. सोमशेखर व शिवराम हेब्बर हे यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. २०१९ मध्ये कर्नाटकमध्ये झालेल्या ‘ऑपरेशन लोटस’दरम्यान त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी काँग्रेस आणि जेडी(एस) चे १७ आमदार भाजपामध्ये गेले होते, त्यामुळे कर्नाटकातील काँग्रेसचं सरकार अल्पमतात आलं होतं. भाजपाच्या तिकीटावर पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर दोन्ही आमदारांना सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात आलं होतं. मात्र, २०२३ मध्ये कर्नाटकात पुन्हा काँग्रेस सत्तेत आल्यानंतर भाजपाने दोन्ही आमदारांना मुख्य प्रवाहातून दूर केलं.
आणखी वाचा : तेजप्रताप यादव यांच्यामुळे लालूंचा पक्ष चक्रव्यूहात? बिहारच्या निवडणुकीवर काय होणार परिणाम?
आमदारांवर कारवाई नेमकी कशामुळे?
“यशवंतपूरचे आमदार असलेले एस. टी. सोमशेखर यांनी वारंवार पक्षाच्या आदेशांकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यांनी काँग्रेस सरकारने सादर केलेल्या अनेक विधेयकांना पाठिंबा दिला, ज्याला भाजपाने विरोध केला होता. इतकंच नाही तर भाजपा आमदारांबरोबर सभागृहाचा त्यात करण्यासाठीही त्यांनी नकार दिला होता”, असं पक्षातील एका नेत्याने सांगितले. “फेब्रुवारीमध्ये कर्नाटकात राज्यसभेच्या चार जागांसाठी मतदान घेण्यात आलं होतं. या चारपैकी तीन जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले, तर एका जागेवर भाजपा उमेदवार निवडून आला. व्हिप जारी केल्यानंतरही एस. टी. सोमशेखर यांनी काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांच्या बाजूने मतदान केल्याचं पक्षाच्या अभ्यासात निष्पन्न झालं. सोमशेखर यांच्या क्रॉस व्होटिंगमुळे व शिवराम हेब्बर यांच्या मतदान न करण्यामुळे भाजपाचा केवळ एकच उमेदवार राज्यसभेची निवडणूक जिंकू शकला”, असंही भाजपाच्या नेत्याने यावेळी सांगितलं.
२०२४ लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला मदत
भाजपाच्या आणखी एका दुसऱ्या नेत्याने सांगितलं की, आमदार सोमशेखर व आमदार हेब्बर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना समर्थन दिलं होतं. यामुळे त्या मतदारसंघांत काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही आमदार पक्षविरोधी कारवाया करीत असल्यामुळे भाजपाच्या शिस्तभंग समितीने त्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या होत्या. या नोटीसीला उत्तर न देता त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे.
काँग्रेसशी असलेली पूर्वीची जवळीक
आमदार सोमशेखर हे कधी काळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय मानले जात होते. २०२३ मध्ये काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर ते उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (वोक्कालिगा समाजाचे नेते) यांच्या संपर्कात आले. २०१८-१९ दरम्यान सोमशेखर हे काँग्रेस सरकारमध्ये बंगळुरु विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी येडियुरप्पा व नंतर बोम्मई सरकारमध्ये सहकार खात्याचा कार्यभार सांभाळला. भाजपाने पक्षातून काढून टाकलेले दुसरे आमदार शिवराम हेब्बर हे उत्तर कन्नड जिल्ह्यातील येळ्ळापूर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. २०२३ मध्ये कर्नाटकात भाजपाचा पराभव झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्यांनाही भाजपाच्या शिस्तभंग समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसीला उत्तर न दिल्यामुळे भाजपाने त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे.
हेही वाचा : India-Pakistan War : भारत-पाकिस्तानमधील तणाव खरंच अमेरिकेनं मिटवला? चीनची भूमिका काय होती?
विधानसभेतील भाजपाचे संख्याबळ घटले
आमदार एस. टी. सोमशेखर व आमदार शिवराम हेब्बर यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याने कर्नाटक विधानसभेतील भाजपाचे संख्याबळ आता ६१ वर आले आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने कर्नाटकमधील २२४ पैकी ६५ जागांवर विजय मिळवला होता. माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, पक्षविरोधी कारवाया केल्याने यावर्षीच्या सुरुवातीला भाजपाने आमदार बसनगौडा पाटील यत्नाल यांची हकालपट्टी केली होती. आता दोन आमदारांची हकालपट्टी झाल्याने पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान मोदींनी भाजपा नेत्यांना फटकारलं?
मागील काही दिवसांपासून भाजपाचे काही आमदार बेताल विधाने करताना दिसून येत आहे, ज्यामुळे पक्षाला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले आहे. २५ मे रोजी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नेत्यांची दिल्लीत एक बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएमधील प्रत्येक नेत्याला, विशेषतः त्यांच्या स्वतःच्या पक्षातील नेत्यांना फटकारल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मोदींनी भाजपा नेत्यांना प्रत्येक मुद्द्यावर बोलणे टाळावे असा सल्ला दिला. कोणतेही विशिष्ट उदाहरण न देता त्यांनी नेत्यांना संयम राखण्यास सांगितलं आहे.