मुंबई : राज्यातील सर्व ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघात भाजपची निवडणूक ‘वॉर रुम’ महिनाभरात सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघासाठी भाजपच्या निवडणूक प्रमुखांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. भाजपकडून जे मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवारांसाठी सोडल्या जातील, तेथेही भाजपचे निवडणूक प्रमुख राहतील आणि या वॉर रुमचा त्यांनाही उपयोग होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सत्तेतील सहकारी पक्षांच्या उमेदवारांनाही निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची आहे. त्यामुळे ज्या जागा सहकारी पक्षांकडे जातील, तेथे त्यांना भाजपच्या निवडणूक यंत्रणेचा उपयोगच होईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – लोकजागर: स्वप्नांचे ‘शोषण’!
भाजपने पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. भाजपच्या सर्व विद्यमान आमदार-खासदार यांची उमेदवारी निश्चित नसली, तरी त्यांना आपल्या मतदारसंघात वॉर रुम सुरू करण्याच्या सूचना पक्षाने नुकत्याच जारी केल्या आहेत. ज्या ठिकाणी भाजपचे आमदार-खासदार नाहीत, तेथे भाजपने मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुख नियुक्त केले असून त्यांना वॉर रुम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. भाजपबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आहे. त्यांचे जागावाटप अद्याप झालेले नाही. पण जेथे ज्या पक्षाचे विद्यमान आमदार-खासदार आहेत, त्या जागा शक्यतो त्या पक्षांकडेच राहतील, असे सूत्र आहे.
काही जागांची अदलाबदल होऊ शकते. ज्या जागा भाजप, शिंदे व अजित पवार गटाकडे नाहीत, त्या जागांचे वाटप भाजप पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार केले जाणार आहे. पण सध्या भाजपने सर्व लोकसभा व विधानसभा मतदारसंघांमध्ये वॉर रुम आणि अन्य यंत्रणा उभारून तयारी सुरू केली आहे. ज्या ठिकाणी शिंदे आणि अजित पवार गटाचे आमदार-खासदार आहेत, त्या मतदारसंघातही भाजपचे निवडणूक प्रमुख काम करतील. त्या पक्षांनाही त्यांच्या नेत्यांची नियुक्ती निवडणूक प्रमुख म्हणून करण्याची विनंती करण्यात आल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.
भाजपने महाजनसंपर्क अभियान सुरू केले असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान ६० हजार घरी जाण्याच्या आणि किमान ३० हजार नागरिकांच्या मोबाईलवर सरल ॲप सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयांची माहिती जनतेपर्यंत तातडीने पोहोचविण्यासाठी व्हॉट्सॲप समूह तयार करावेत, प्रत्येक आमदार, खासदार व निवडणूक प्रमुखाने समाजमाध्यमांवर सक्रिय असावे, असे सांगण्यात आले आहे. यासंदर्भातील अहवाल, माहिती आणि निवडणूक तयारीचा आढावा वॉर रुमच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे २० ऑगस्टपासून ४ नोव्हेंबरपर्यंत २८ लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर जात असून त्यात निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे.