नागपूर : पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपात्रात पोलिसांना दोन्ही पायांनी अपंग मुलगी सापडली. समाजसेवक शंकरबाबा पापडकर यांनी तिचे पालन करून पहिल्यांदा जीवदान दिले. परंतु, नंतर तिची प्रकृती खूपच खालावली. मेडिकलच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसह अचूक उपचार करून तिला दुसऱ्यांदा जीवनदान दिले.
रुपा शंकरबाबा पापडकर (२६) असे या मुलीचे नाव आहे. तिला शंकरबाबांनी बाप म्हणून स्वत:चे नाव दिले. ती पंढरपूर येथील चंद्रभागेच्या काठी पोलिसांना सापडली होती. बाल न्यायालयाच्या आदेशानुसार तिला पोलिसांनी स्व. अंबादास पंत वैद्य दिव्यांग बालगृहात दाखल केले. शंकरबाबांनी तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शंकरबाबांच्या प्रयत्नाने तिला नगरपालिका अचलपूर, येथे नोकरी लागली. सर्वकाही सुरळीत असताना रुपाचे गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही पाय दुखत होते. १४ ऑगस्टला अमरावती मेडिकल बोर्डने वैद्यकीय तपासणी करून तिला अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. येथे तिची खालावणारी प्रकृती बघत नागपुरातील मेडिकल रुग्णालयात पाठवले. मेडिकलमध्ये मंगळवारी रात्री २ वाजता तिची प्रकृती जास्तच खालावली. मेडिकलच्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत सकाळपर्यंत तिला स्थिर केले. पहाटे सहाच्या सुमारास तिच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांनी शल्यक्रिया विभागाला तातडीने सूचना करत सर्व आवश्यक औषधांसह साहित्य उपलब्ध करून रुग्णावर लक्ष देण्याची सूचना केली होती. रुग्णावर डॉ. शरद कुमार, डॉ. बन्सोड, डॉ. उमेश चांडक, डॉ. मुरारी सिंग स्वत: लक्ष ठेवून होते. डॉ. गजभिये व डॉ. शरद कुचेवार यांनी रुग्णाची भेट घेत शंकरबाबा पापडकर यांच्याशीही संवाद साधला. यावेळी शंकरबाबांना अश्रू अनावर झाले. शंकरबाबा म्हणाले, रुपाची प्रकृती खूपच नाजूक असून अमरावतीच्या डॉक्टरांनी तिचे वाचणे कठीण असल्याचे सांगितले होते. मुंबईला दाखवल्यावर तेथील डॉक्टरांनीही हात टेकले होते. शेवटी नागपुरातील मेडिकलच्या डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून रूपाला जीवदान दिले. सध्या रुपावर मेडिकलच्या वार्ड क्रमांक ७ मध्ये उपचार सुरू आहेत.
हेही वाचा – लोकजागर: स्वप्नांचे ‘शोषण’!
रुपाच्या सेवेत अपंग बांधव
अत्यवस्थ रुपाच्या सेवेत बालगृहातील कर्मचाऱ्यांसह शंकरबाबांनी पुनर्वसन केलेले तीन अपंग मुलेही आहेत. सगळ्यांना रूपाला बरे करून परत बालगृहात न्यायचे आहे. रुपाला शुद्ध आल्यावर सगळ्यांनी हसून तिला लवकरच परत जाणार असल्याचे सांगितले.