अमरावती : आगामी महापालिका निवडणुकीत भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती होईल, अशी घोषणा भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी केल्याने युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला असला, तरी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.

लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या युतीतून जे चित्र अमरावती जिल्ह्यात दिसले, भूतो न भविष्यती असा विजय मिळाला. अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत देखील या दोन्ही पक्षांची युती होईल. आपण सर्व जण एकत्र लढू आणि महापालिकेवर भगवा झेंडा फडकवू, असे वक्तव्य नवनीत राणा यांनी काल-परवा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलताना केले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्‍हणजे भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण तायडे, भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यावेळी उपस्थित होते.

आगामी महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार असून कोणत्याही पक्षासोबत युती केली जाणार नाही, असे वक्तव्य तीन महिन्यांपुर्वी नवनीत राणा यांनी केले होते. निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या सच्च्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, असेही आश्वासन नवनीत राणा यांनी दिले होते. राजापेठ येथील भाजपच्या कार्यालयात शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या पदग्रहण समारंभात बोलताना केलेले हे वक्तव्य भाजप कार्यकर्त्यांना सुखावणारे होते, पण पुढे काय वाढून ठेवले आहे, याचा अंदाज अनेकांना आला होता.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलताना युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आमदार रवी राणा यांनी केलेले वक्तव्य लक्षवेधी ठरले. नवनीत राणा या भाजपच्या ‘पॉवरफूल’ नेत्या आहेत, पण आपणही काही कमी नाही. त्यांच्याशिवाय आपली कामेच होणार नाही, असे तुम्हाला वाटत असेल, पण आम्हीही आहोत, असे रवी राणा म्हणाले. या ठिकाणी प्रत्येकाने प्रत्येकाचे अस्तित्व ठेवले पाहिजे. युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांची स्वतंत्र ओळख आहे. भाजपचे कार्यकर्ते जोमाने काम करीत आहेत, त्यांचेही अस्तित्व आहे. भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, या पक्षासोबत युवा स्वाभिमान पक्ष एक लहान भाऊ म्हणून नेहमी काम करेल. भाजपची आणि स्वाभिमानची युती राहील आणि भाजपचाच महापौर बनवू, असे आश्वासन आमदार रवी राणा यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला ४५ जागा मिळाल्या होत्या, तर युवा स्वाभिमान पक्षाचे तीन नगरसेवक निवडून आले होते. गेल्या आठ वर्षांत राजकीय परिस्थिती बदलली आहे. भाजपचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते वर्षानुवर्षे संधीच्या प्रतीक्षेत आहेत. महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यामुळे चांगल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळेल, असे आश्वासन भाजपचे कार्यकर्ते देत आहेत. पण, आता राज्य पातळीवर असलेली शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटासोबतची युती महापालिका निवडणुकीत कायम राहील का, याची उत्सुकता राजकीय वर्तूळात आहे. त्यातच युवा स्वाभिमान पक्षानेही वाटा मागितला आहे. अनेक वाटेकरी झाल्यास निष्ठावंताना कितपत न्याय मिळेल, असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.