बुलढाणा : वरकरणी युतीविरुद्ध आघाडी अशी वाटणारी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील लढत अपक्ष रविकांत तुपकर यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी झाली आहे. वंचित, बसपा अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्यासह एकूण २१ उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे महायुती विरोधातील मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात होणाऱ्या या लढतीला ‘गद्दार’ विरुद्ध ‘खुद्दार’ असा रंग देण्यात येत आहे.
महायुतीकडून शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान खासदार प्रतापराव जाधव पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तीनदा आमदार, तीनदा खासदार असा जाधवांचा चढता राजकीय आलेख आहे. निवडणूक तंत्र, रणनीती आखण्याचे कौशल्य या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र मतदारांची नाराजी, मतदारसंघाचा न झालेला विकास, जनसंपर्काचा अभाव आणि भाजपची नाराजी आदी बाबींचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात आल्यावर जाधव यांनी भाजप नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. सर्व घटक पक्षांना एकत्र आणले. त्यांना रसद पुरवली. त्याचे प्रतिबिंब अर्ज भरताना केलेल्या शक्तिप्रदर्शनातून दिसून आले. तरीही मुख्यमंत्री शिंदेंना बुलढाण्यात रात्री उशिरापर्यंत तळ ठोकवा लागला होता. यातून युतीत सर्वकाही आलबेल नाही हे स्पष्ट झाले होते.
शिवसेना ठाकरे गटाने नरेंद्र खेडेकर या कट्टर शिवसैनिकाला रिंगणात उतरवले आहे. ‘गद्दार’ विरुद्ध ‘ खुद्दार’ यावर खेडेकर यांचा प्रचाराचा भर आहे. शिवसेनेचे पारंपरिक गठ्ठा मतदान, उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूती, विद्यमान खासदार जाधव यांच्याविषयी मतदारांमध्ये असणारा रोष या त्यांच्या जमेच्या बाजू ठरतात. मात्र त्यांच्या प्रचारात नियोजन, समन्वयाचा अभाव दिसून येतो. काँग्रेसही त्यांच्या प्रचारात पूर्ण ताकदीने सहभागी झाली नसल्याचे चित्र आहे.
तुपकर हे शेतकरी नेते म्हणून सर्व परिचित आहे. भावूक व आक्रमक भाषणाद्वारे त्यांचा प्रचार सुरू आहे. आर्थिक अडचणी, साधनसामुग्रीचा अभाव, घाटाखालील दोन मतदारसंघात नसलेला फारसा प्रभाव आदी बाबींचे तुपकर यांच्यापुढे आव्हान आहे.
हेही वाचा… Election 2024: राजकीय पक्षांसाठी काम करणारे पगारी कार्यकर्ते
लढतीतील महत्त्वाचा घटक वंचित बहुजन आघाडीचा आहे. २०१९ मध्ये या पक्षाचे बळीसाम शिरस्कर यांनी पावणेदोन लाख मते घेतली होती. यावेळी वंचितने वसंत मगर यांना उमेदवारी दिली आहे. दलित, माळी समाज व मुस्लीम समाजाची मते हा वंचितचा प्रमुख आधार आहे. अपक्ष उमेदवार शेळके यांची उमेदवारीही चर्चेत आहे.
मतदारसंघात प्रमुख उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा पुढच्या काळात होण्याची शक्यता आहे. महायुतीकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाविकास आघाडीकडून स्टार प्रचारकांच्या सभा होण्याची शक्यता आहे. एकूणच तिरंगी लढतीमुळे जाधव यांच्या विरोधातील मतांचे विभाजन होण्याचा धोका आहे.
हेही वाचा… जाट समाजाची भाजपावर नाराजी काँग्रेसच्या पथ्यावर?
मराठा समाजाचे मत विभाजन अटळ
या मतदारसंघात सुमारे मराठा समाजाचे पावणेसहा लाख मतदार आहेत. मात्र या समाजाचे ६ उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे मतविभाजन अटळ आहे. याची जाणीव झाल्याने जाधव यांनी अन्य समाजाच्या मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. बंजाराबहुल भागांत मंत्री संजय राठोड यांच्या सभा झाल्या. वंजारीबहुल भागात पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे, माळी समाजाच्या मतदानासाठी छगन भुजबळ यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे.
महायुतीकडून अपक्षांवर टीका
प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात युतीच्या दिग्गज नेत्यांनी दोन अपक्ष उमेदवारांवर टीका केली. भाजप नेते संजय कुटेंसह जाधव यांनी अपक्षांना लक्ष्य केेले. खासदारांनी तुपकरांना ‘गारुडी’ संबोधणे आणि कुटेंनी शेळकेंच्या शाहू पतसंस्थेची निवडणुकीनंतर चौकशी करण्याची मागणी करणे याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
हेही वाचा… ओडिशाचे मुख्यमंत्री दोन जागांवर लढवणार निवडणूक; काय आहेत डावपेच?
जातीचा घटक निर्णायक
मराठा मतांचे विभाजन अटळ असल्याने लक्षणीय संख्येतील माळी, दलित व मुस्लीम (एमडीएम) समाजाचे मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता असल्याने महाविकास आघाडीसह इतर प्रमुख उमेदवारांनी या मतांवर लक्ष केंद्रित केले आहे. माळी व आंबेडकरी समाजावर वंचितचा डोळा आहे. महाविकास आघाडीसोबत युती होऊ न शकल्याने आंबडेकरी समाज नाराज आहे. जिल्ह्यातील भीमजयंतीच्या मिरवणुकात ‘चौकीदार बदलना है’ हे गाणे खूप गाजले. यामुळे चळवळीचा रोख स्पष्ट झाला आहे. दोन लाखांच्या आसपास असलेल्या मुस्लीम समाजाच्या मतांचा कल आघाडीकडे आहे.