निवडणूक आयोगाने गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगालमधील पाच विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. रविवारी आयोगाने ही घोषणा केली आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, चारही राज्यांमधील पोटनिवडणुकांसाठी १९ जून रोजी मतदान होणार आहे. तसंच २३ जून रोजी मतमोजणी होईल.

निवडणूक आयोगाच्या अधिकृत अधिसूचनेत पोटनिवडणुकांसदर्भात इतर महत्त्वाच्या तारखादेखील सूचित केल्या गेल्या आहेत. राजपत्र अधिसूचना २६ मे रोजी जारी केली जाईल असे या आयोगाच्या सूचनेत म्हटले आहे.
या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २ जून असेल, तर नामांकन अर्जांची पडताळणी करण्याची शेवटची तारीख ३ जून असेल.

एखाद्या निवडून आलेल्या सदस्याने राजीनामा दिला किंवा त्याचा मृत्यू झाला तसंच अपात्रतेमुळे ज्या जागा रिक्त होतात त्या जागांवर उमेदवार निश्चित करण्यासाठी पोटनिवडणुका घेतल्या जातात. पोटनिवडणुका फक्त रिक्त असलेल्या जागांसाठीच घेतल्या जातात. पोटनिवडणुकांमध्ये ज्या मतदारसंघात जागा रिक्त झाली आहे, त्या मतदारसंघातील मतदारच मतदान करण्यास पात्र असतात. पोटनिवडणुकांचे मतदान सार्वत्रिक किंवा इतर निवडणुकांसारखे मोठ्या प्रमाणात होत नाही. तसंच त्यांचा प्रचार खर्चही तुलनेने कमीच असतो. या निवडणुकांचा कालावधी काही आठवडेच असतो. दरम्यान, या पोटनिवडणुका आता का घेण्यात येत आहेत याबाबत थोडक्यात जाणून घेऊ…

गुजरात
गुजरातमध्ये विसावदर आणि काडी या दोन रिक्त विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
या वर्षी मार्चमध्ये आम आदमी पक्षाने विसावदर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी त्यांचे नेते गोपाल इटालिया यांची उमेदवार म्हणून घोषणा केली.
तत्कालीन आप आमदार भूपतभाई भयानी यांनी राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केल्याने विसावदरची जागा सध्या रिक्त आहे. तर केवळ अनुसूचित जाती (एससी) उमेदवारांसाठी राखीव असलेली काडीची जागा तत्कालीन भाजपा आमदार करसनभाई पंजाभाई सोलंकी यांचे निधन झाल्यामुळे रिक्त आहे.

केरळ
२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत सीपीएम आणि मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याशी झालेल्या मोठ्या मतभेदानंतर अपक्ष आमदार पीव्ही अन्वर यांनी राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर केरळच्या निलांबूरमध्ये पोटनिवडणूक आवश्यक होती. त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि नंतर ते तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले.

पंजाब
पंजाबमधील लुधियाना पश्चिम येथील आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचा गोळी लागून मृत्यू झाल्यानंतर त्यांची जागा रिक्त झाली होती. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि प्रदेश पक्षप्रमुखांनी पिस्तूल साफ करताना चुकून गोळी लागल्याने त्यांचा जीव गेल्याचे सांगितले होते. काँग्रेस आणि आपने या जागेसाठी आधीच उमेदवारांची घोषणा केली आहे. तर भाजपाने अद्याप लुधियाना पश्चिमेसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम बंगाल
या वर्षी फेब्रुवारीमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार नसिरुद्दीन अहमद यांच्या निधनानंतर बंगालच्या कालीगंज मतदारसंघातील पोटनिवडणूक आवश्यक होती. कालीगंज विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाल्यामुळे मतदार यादीची विशेष सारांश पुनरावृत्ती करावी लागली. मतदार यादीत फक्त १ हजार ६६९ नवीन मतदारांचा समावेश झाल्यामुळे मतदारांची संख्या ७ हजार ५५९ एवढी कमी होईल, असे एका अधिकाऱ्याने निदर्शनास आणून दिल्यानंतर हा निर्णय झाला.