अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने होऊ घातलेल्या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या चाव्या थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात जाण्यास वेगळी किनार आहे. जिल्हा परिषदेच्या सत्ताबदलाकडे शिंदे-फडणवीस या दोघांचे दुर्लक्ष झाल्याने जिल्ह्यातील भाजपा आणि शिंदे गटाची बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात वाद वाढत असून सत्तांतराची संधी हुकल्यास त्यास हा वादच कारणीभूत राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेचे ‘मोठे मासे’ ‘बाळासाहेबांची शिवसेने’च्या गळाला?

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने १७ ऑक्टोबर रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना-काँग्रेसने अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. अशातच राज्यात झालेले सत्तांतर आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी शिंदे गटात केलेल्या प्रवेशामुळे आता सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ५६ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत काँग्रेसचे २४, भाजपचे २०, शिवसेनेचे आठ तर, राष्ट्रवादीचे चार सदस्य आहेत. सध्याच्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या हातात सत्तेच्या चाव्या असल्याने त्यांचे समर्थन लाभलेला पक्ष सत्तेत येणार येईल, असे साधे समीकरण आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांना युतीविषयी सूचना केल्यास भाजप-शिंदे गटाची सत्ता येऊ शकते. दुसरीकडे, रघुवंशी यांनी काँग्रेसला पाच वर्षांसाठी आघाडीचा शब्द दिलेला असला तरी अंतिम आदेश हा एकनाथ शिंदे यांचा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक उंबरठ्यावर आली असतानाही उच्च स्तरावरून कोणताही निर्णय न आल्याने या दोन्ही पक्षांना सत्तेत बसण्याची आयती संधी हुकते की काय, अशी चिन्हे आहेत. अडीच वर्षांपूर्वी चंद्रकांत रघुवंशी यांची भाजपशी पक्की बोलणी झाली असतांना संजय राऊतांचा निरोप आल्याने भाजपसोबत न जाता महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राज्यातील सत्तांतरानंतर आता शिंदे- फडणवीसांचा काही निरोप येतो का, याकडे भाजप आणि शिंदे गटाच्या नजरा लागून आहेत.

हेही वाचा- महाविद्यालयीन मुलींच्या छेडछाडीविराेधात मनविसेचा नवा अजेंडा; अमित ठाकरेंचा दौरा तरुणाईत चर्चेत

जिल्ह्याचे पालकमंत्री पद लाभलेले भाजपचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी जिल्हा परिषदेत सत्तांतरासाठी चंग बांधला आहे. रघुवंशी आपल्याशी युती करणार नसल्याची शक्यता गृ़हीत धरत त्यांनी काँग्रेसच्या तीन ते चार सदस्यांना गळाला लावल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळेच सहलीसाठी रवाना झालेल्या भाजप सदस्यांसमवेत काँग्रेस आणि शिवसेनेचेही काही सदस्य असल्याची माहिती आहे. अध्यक्षपदी डॉ विजयकुमार गावित हे आपली कन्या सुप्रिया हिच्या माध्यमातून ग्रामीण भागात सत्ता काबीज करण्यासाठी पूर्ण तयारीत आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळेच शहादा आणि तळोदा पंचायत समितीतील सत्ता त्यांच्या हातातून गेली. त्यामुळे हेच वाद आत्ता सत्तांतरासाठी पोषक ठरत असून काँग्रेसमधील काही असंतुष्ट सदस्य भाजपाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा- पक्षांतर्गत कोंडीमुळे अवधूत तटकरे यांनी शिवबंधन तोडले….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजप आणि काँग्रेसमधील काही राजकारणी रघुवंशी यांना जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूर ठेवण्यास उत्सुक असल्यानेच काँग्रेसमधूनच भाजपला छुप्या पद्धतीने रसद मिळण्याची चर्चा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे चार सदस्य हे वरिष्ठांचा आदेश डावलून भाजपाला मदत करण्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे १७ ऑक्टोबरला नेमक्या काय घडामोडी होतात, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.