संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व तेलुगू देशमचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या लागोपाठ दोन जाहीर सभांच्या वेळी चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाल्याने चंद्राबाबूंची लोकप्रियता वाढल्याने गर्दी होऊ लागली का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पण गुटूंरमधील दुसऱ्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या वेळी मोफत अन्नधान्य आणि कपड्यांचे वाटप करण्यात येत असल्याने गर्दी झाली होती व मोफतचे गोळा करताना चेंगराचेंगरी झाली.

आंध्र प्रदेशमध्ये २०२४ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार असली तरी राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले आहे. माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे राज्यभर दौरे सुरू झाले आहेत. गेल्या आठवड्यात नेल्लोर येथे चंद्राबाबूंच्या दौऱ्याच्या वेळी कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली. चिंचोळ्या रस्त्यात झालेल्या चेंगराचेंगरीत आठ जणांचा मृत्यू झाला. यावरून आंध्रत सत्ताधारी वाय एस. आर. काँग्रेस व तेलुगू देशममध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नल्लोर चेंगराचेंगरीचा प्रकार ताजा असतानाच गुटूंरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत तीन जणांचा मृत्यू झाला. गुटूंरमध्ये तेलुगू देशमच्या वतीने धान्य आणि कपड्यांचे वाटप करण्यात येत होते. गर्दी झाल्याने वाहनावरून धान्य आणि कपड्यांची पाकिटे लोकांमध्ये भिरकावली जात होती. तेव्हा चेंगराचेंगरी झाली.

हेही वाचा… कोल्हापूरमध्ये पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्ध्यांमधील संघर्षाला नव्याने धग

तेलुगू देशमच्या एका अनिवासी भारतीय चाहत्याने कपडे आणि धान्याचा सारा खर्च केला आहे. तेलुगू देशम सरकारच्या काळात गोरगरिबांना धान्य आणि कपडे हे दिवाळी, ईद आणि नाताळच्या निमित्ताने दिले जात असत. जगनमोहन सरकारने ही योजना बंद केल्याने तेलुगू देशमने स्वत:हून ही योजना सुरू केल्याचे चंद्राबाबू नायडू यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा… विमानसेवा अन् चिमणीवरून सोलापूरच्या राजकारणाला वेगळी दिशा

चंद्राबाबूंच्या दौऱ्याच्या वेळी किंवा नंतर कपडे व धान्याचे वाटप केले जात असल्याने गर्दी होणे स्वाभाविक आहे. राजकीय लाभ उठविण्याकरिता तेलुगू देशम व चंद्राबाबू यांची ही खेळी आहे. याचा किती उपयोग होतो हे निवडणुकीत समजेल पण या निमित्ताने गर्दी खेचण्यात चंद्राबाबू यशस्वी झाले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrababu naidus popularity increased print politics news asj
First published on: 03-01-2023 at 12:12 IST