चंद्रपूर : दांडगा जनसंपर्क, स्वच्छ प्रतिमा, उत्कृष्ट वक्ता, उच्च विद्याविभूषित, सामाजिक कार्यात आघाडी, राजकीय जाणीव प्रगल्भ असलेल्या व्यक्तिमत्त्वाला आधी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली जायची. मात्र, आता राजकारणाचा पोत पूर्णत: बदललेला आहे. आर्थिक सक्षमता हीच उमेदवाराची मुख्य पात्रता आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम अर्थात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च करणाऱ्या उमेदवाराचा शोध विविध राजकीय पक्षांकडून घेतला जात आहे. काँग्रेस आणि भाजपकडून केवळ ‘अर्थकारणा’ला महत्त्व दिले जात असल्याचे बोलले जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रह्मपुरी, मूल, राजुरा, घुग्घुस, गडचांदूर, नागभीड, चिमूर या दहा नगरपालिका तथा भिसी नगरपंचायतसाठी निवडणूक होत आहे. या सर्वच ठिकाणी काँग्रेस व भाजप, या दोन्ही पक्षांकडून आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील एकही नेता पक्षाच्या उमेदवारावर पैसा खर्च करायला तयार नाही. यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणूक कुठलीही असो, समाजकार्य व सामाजिक जाण असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली जायची. मात्र मागील काही वर्षांत राजकारण पूर्णत: बदलले. आधी पैसा लावा आणि मग तिथूनच बक्कळ पैसा कमवा, असा हा सोपा मार्ग. त्यामुळेच सर्वच राजकीय पक्षांनी नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांची आर्थिक स्थिती ही एकच पात्रता लक्षात घेतली.

काँग्रेसने आठवडाभरापूर्वी नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यात पहिला प्रश्न किती पैसा खर्च करू शकता, हाच होता. काँग्रेस नेते व लोकप्रतिनिधींच्या या प्रश्नामुळे गरीब, सामान्य आर्थिक स्थिती असलेल्या, मात्र उत्तम शैक्षणिक पात्रता असलेल्या, सामाजिक जाण, लोकांच्या समस्या, गावातील प्रश्नांचा अभ्यास, दांडगा जनसंपर्क असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला. भाजपनेही हीच मुख्य पात्रता ठेवल्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते सांगत आहेत.

आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे हीच पात्रता असेल, तर नगराध्यक्षपदासाठी मुलाखतींचा फार्स कशाला? ‘अर्थकारणा’लाच महत्त्व असेल, तर जनतेचे प्रश्न कसे सुटणार, असे प्रश्न आता उपस्थित होत आहे.