चंद्रपूर : अपक्ष आमदार किशार जोरगेवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असून चंद्रपूर मतदारसंघातून ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता व तीव्र नाराजी आहे. काँग्रेसमधील अनेक इच्छुकांचा स्वप्नभंग होण्याची चिन्हे आहे.

यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक तथा अपक्ष आमदार जोरगेवार यांनी ‘तुतारी’ फुंकून राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाकडून निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहे. जोरगेवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना तसे पत्रही दिले आहे. यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. चंद्रपूर हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ. १९९५ मध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी तेव्हाचे राज्यमंत्री शाम वानखेडे यांचा पराभव करून हा मतदारसंघ भाजपकडे खेचून आणला होता. त्यानंतर येथे सातत्याने भाजपने विजय मिळवला. मात्र, २०१९ मध्ये जोरगेवार यांनी भाजप आमदार नाना शामकुळे यांना पराभवाची धुळ चारली होती.

हेही वाचा : परभणीत ‘खान हवा की बाण’चे संदर्भ बदलले !

मागील तीस वर्षांत या मतदार संघात काँग्रेसची प्रचंड वाताहात झाली. गेल्या दोन निवडणुकांमध्ये तर काँग्रेस उमेदवाराला येथे अनुक्रमे २५ व १३ हजार इतकीच मते मिळाली होती. नेमका हाच मुद्दा जोरगेवार यांनी शरद पवार यांना पटवून दिला. यामुळे काँग्रेसने हा मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा, आमदार जोरगेवार उमेदवार राहतील, असे शरद पवार गटाने काँग्रेसश्रेष्ठींना स्पष्टच सांगितले.

स्थानिक काँग्रेसकडून मात्र याला विरोध आहे. आम्ही हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडणार नाही, आमच्याकडे प्रवीण पडवेकर व राजू झोडे हे दोन सक्षम उमेदवार आहेत. नेत्यांकडे या मतदारसंघासाठी आग्रह धरू, असे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी सांगितले. मात्र, महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला तर आघाडी धर्म पाळून जोरगेवार यांचा प्रचार करू, असेही धोटे म्हणत आहेत. दुसरीकडे, जोरगेवार निवडणुकीत विजयी झाले तर काँग्रेसचे अस्तीत्व संपणार. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत जोरगेवार मनमानी करतील, त्यामुळे पराभव झाला तरी चालेल पण येथे काँग्रेस उमेदवारच द्या, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. राष्ट्रवादीला ही जागा सोडल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्हीदेखील अशीच सोयीस्कर भूमिका घेऊ आणि स्थानिक पातळीवर वाट्टेल त्याच्याशी युती करू पण दहा ते बारा सदस्य निवडून आणू, असा इशारा पदाधिकारी देत आहेत.

हेही वाचा : सलग निवडून येणाऱ्या महायुतीतील १५ आमदारांना जनमत रोषाचा फटका ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवार गटातही अस्वस्थता

जोरगेवार यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही प्रचंड अस्वस्थता आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य एकीकडे तर शहर अध्यक्ष व महिला अध्यक्ष दुसरीकडे, असे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बघायला मिळत आहे.