या वर्षाच्या शेवटपर्यंत तेलंगणा राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी तेलंगणातील भारत राष्ट्र समिती हा पक्ष आतापासूनच तयारीला लागला आहे. हा पक्ष अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्यांक मतदारांकडे विशेष लक्ष देत आहे. याचाच एक भाग म्हणून भीम आर्मीचे प्रमुख तथा आझाद समाज पार्टीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना तेलंगणा सरकारने आमंत्रित केले होते. तेलंगणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा १२५ फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याला भेट देण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांना आमंत्रित करण्यात आले होते.

भीम आर्मीच्या महासभेला केसीआर यांना आमंत्रण

आपल्या तेलंगणा दौऱ्यात चंद्रशेखर आझाद यांनी तेथील १२५ फूट उंच असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भेट दिली. यासह तेलंगणा सरकारने चंद्रशेखर आझाद यांना तेथील दलित, बहुजनांसाठी राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली; तर दुसरीकडे येत्या २६ ऑगस्ट रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या भीम आर्मीच्या महासभेला चंद्रशेखर आझाद यांनी के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांना आमंत्रित केले आहे.

आपल्या तेलंगणा भेटीत चंद्रशेखर आझाद यांनी केसीआर सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्य कल्याणकारी योजनांची प्रशंसा केली. विशेषत्वाने त्यांनी तेलंगणा सरकारच्या ‘दलित बंधू’ या योजनेचे कौतुक केले. या योजनेंतर्गत दलित प्रवर्गातील व्यक्तीला १० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते.

चंद्रशेखर आझाद यांच्या मागणीला के. कवितांचा पाठिंबा

या भेटीमध्ये केसीआर आणि चंद्रशेखर आझाद यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. केसीआर यांच्या भेटीनंतर चंद्रशेखर आझाद यांनी बीआरएस पक्षाच्या आमदार तथा केसीआर यांच्या कन्या के. कविता यांचीही भेट घेतली. चंद्रशेखर आझाद संसदेच्या नव्या इमारतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, तसेच नव्या संसद इमारतीच्या परिसरात आंबेडकरांचा पुतळा उभारावा अशी मागणी करण्यात आली होती, या मागणीला आमचा पाठिंबा असल्याची भूमिका यावेळी के. कविता यांनी घेतली आहे.

के. कविता यांची चंद्रशेखर आझाद यांना ग्वाही

या भेटीबद्दल कविता यांनी अधिक माहिती दिली आहे. तेलंगणातील बहुजन, दलित यांच्या उत्थानासाठी तेलंगणा सरकारने काय काय पावलं उचलली आहेत, याची आम्ही त्यांना माहिती दिली, असे के. कविता यांनी सांगितले. तसेच राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास वर्ग, अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी केसीआर सरकार वचनबद्ध असल्याचेही यावेळी के. कविता यांनी चंद्रशेखर यांना सांगितले.

या भेटीदरम्यान चंद्रशेखर आझाद यांनी मणिपूरमधील महिला अत्याचाराचा मुद्दादेखील उपस्थित केला. ही देशातील सर्वांत दुर्दैवी घटना आहे. भाजपा सरकारने मणिपूरमध्ये हस्तक्षेप करायला हवा, अशी मागणी चंद्रशेखर आझाद यांनी केली.

चंद्रशेखर आझाद यांचे अन्य पक्षांशीही बोलणे

२८ जून रोजी चंद्रशेखर आझाद यांच्यावर अज्ञात लोकांनी गोळीबार केला होता. मात्र, या हल्यात ते बचावले. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ते समविचारी पक्षांशी युती करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांची समाजवादी पार्टी, राष्ट्रीय लोक दल या पक्षांशी चर्चा सुरू आहे.

दलित मतदार बीआरएसच्या बाजूने?

तेलंगणा राज्यात या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होऊ शकते. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी बीआरएस पक्ष तेथील दलित, अल्पसंख्यांक, मागास प्रवर्ग या घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तेलंगणा राज्यात साधारण १६ टक्के दलित आहेत. हे सर्व मतदार आपल्या बाजूने यावेत यासाठी केसीआर प्रयत्नरत आहेत. आंध्र प्रदेशचे विभाजन होण्यापूर्वी दलित मतदार हा काँग्रेसला मत द्यायचा. मात्र, तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर तेलंगणामधील दलित मतदार हा बीआरएस पक्षाकडे वळलेला आहे. ही मतं कायम ठेवण्याचा केसीआर यांचा प्रयत्न आहे. असे असताना केसीआर आणि चंद्रशेखर यांच्यात वाढलेली जवळीक लक्षात घेता, आगमी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणामध्ये नवे राजकीय समीकरण उदयास येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१४, २०१८ सालच्या निवडणुकीत काय घडलं होतं?

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या एकूण १४ जागांपैकी बीआरएस पक्षाने १० जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला तीन, तर टीडीपी पक्षाला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला होता. २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत बीआरएस पक्षाने अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या १९ जागांपैकी एकूण १६ जागांवर विजय मिळवला होता; तर दोन जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर टीडीपी पक्षाचा विजय झाला होता.