नागपूर : राजकीय नेत्यांच्या भूमिकेतील दुटप्पीपणा ही काही नवी गोष्ट राहिली नाही, ‘ आपला तो बाप्या, दुसऱ्याचे ते कार्टे’ अशी सोयीची भूमिका घेण्यात ते पारंगत असतात. मात्र मंत्र्यांचे तसे नसते, सरकारचा प्रतिनिधी म्हणून एखाद्या मुद्यावर त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी ठाम असणे अपेक्षित असते. राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत अशा अपेक्षा ठेवणे रास्त नाही, उलट त्यांनी भूमिका बदलली नाही तरच आश्चर्य. येथे मुद्या आहे तो वर्तमान पत्रात प्रकाशित दोन वेगवेगळ्या जाहिरातीवर बावनकुळे यांनी व्यक्त केलेल्या परस्पर विरोधी भूमिकांचा. एक जाहिरातीवर त्यांनी कारवाईचा इशारा दिला तर दुसऱ्या जाहिरातीचे कट्टरपणे समर्थक केले. दोन दिवसांच्या फरकाने त्यांनी त्यांची मते नागपुरात व्यक्त केली.
बावनकुळे नागपुरात आले की त्यांचा वृत्तवाहिन्यांशी संवाद ठरलेला. एकूणच राज्यपातळीवरच्या मुद्यावर, राजकारणावर, विरोधी पक्षातील राष्ट्रीय नेत्यांवर ते टीका टिप्पणी करीत असतात. दोन दिवसांपूर्वी बावनकुळे नागपुरात आले असता त्यांना पत्रकारांनी मुंबईतील ‘ हलाल लाईफस्टाईल टाऊनशिप’ च्या जाहिरातीबाब प्रश्न केला होता. अपेक्षेप्रमाणे त्यावरील बावनकुळेंचे उत्तर नकारात्मकच होते “ हलाल या नावाने कोणतीही टाऊनशिप किंवा स्कीम मान्य केली जाणार नाही, त्यांचा फलककाढून टाकला जाईल त्यावर कारवाई केली जाईल”.असे त्यांनी स्पष्ट केले.
दोन दिवसांनी राज्यातील सर्व प्रमुख दैनिकात पूर्ण पानभर ‘देवाभाऊ’ या नावाने जाहिरात प्रकाशित झाली. त्याचे स्रोत कोण याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) युवा नेते व आमदार रोहित पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले. या जाहिरातीबाबत मात्र बावनकुळे यांची भूमिका अगदी ‘यू -टर्न ’ घेणारी होती. “ जाहिरात कोणीही छापली असेल, रोहित पवार यांना काय प्रॉब्लेम आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एखादी जाहिरात छापून आली तर हरकत काय, कोणीही छापू शकतो? मग त्यांच्या पोटात का दुखते ?. असा सवाल त्यांनी केला.
मुंबईतील ‘हलाल लाईफस्टाईल’ गृहनिर्माण प्रकल्पाच्या जाहिरातीवर कारवाईचा इशारा देणारे बावनकुळे दोनच दिवसांनी मात्र ‘ देवाभाऊ’ या जाहिरातीबाबत ‘विरोधकांच्या पोटात का दुखते’ असा प्रश्न करतात. यावरून त्यांचा दुटप्पीपणा स्पष्ट होतो. दोन्ही जाहिरातीच आहे, मग एकीला एक तर दुसरीला वेगळा न्याय का ? विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी त्यांच्यावरच टीका का केली जाते, असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात. त्याची सध्या नागपुरात चर्चा सुरू आहे. राजकारणात राजकीय पक्षांना सोयीचीच भूमिका घ्यावी लागते, त्याला भाजपही अपवाद नाही, पण भाजप नेते अनेकदा नैतिकतेचे धडे देत असल्याने त्यांच्याकडून प्रत्येक वेळी घेतली जाणारी सोयीची भूमिका पक्षाच्या भूमिकेवरच प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे.