Shishir Kumar assault case गेल्या आठवड्यात पाटण्याच्या महापौर सीता साहू यांचे पुत्र शिशिर कुमार आणि विरोधी नगरसेवकांमध्ये नियमित बैठकीदरम्यान हाणामारी झाली. त्यावेळी वातावरण चांगलेच तापले. नगरसेवक जीत कुमार यांनी शिशिर कुमारच्या विरोधात तक्रार दाखल केली. शिशिर कुमारवर हल्ला केल्याचा आणि सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला. तक्रार दाखल झाल्यापासून शिशिर कुमार फरारी असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी त्याचा तपास सुरू असताना त्याच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकले. हे प्रकरण सध्या चांगलेच तापले असून, राष्ट्रीय पातळीवर याची चर्चा होताना दिसत आहे. नेमके हे प्रकरण काय? शिशिर कुमारवर आरोप काय? त्यामुळे राजकारण का तापले? याविषयी जाणून घेऊयात.
प्रकरण काय?
- ११ जुलै साहू यांनी वादग्रस्त प्रस्तावांना जलद गतीने मार्गी लावण्यासाठी एक बैठक बोलावली होती.
- त्यावर महापालिका आयुक्त अनिमेश कुमार पराशर यांनी आक्षेप घेतला आणि दावा केला की, काही प्रकल्प खासगी हितसंबंधांना फायदा पोहोचवण्यासाठी म्हणून स्थगित करण्यात आले आहेत. साहू यांनी प्रस्ताव मंजूर करण्याचा आग्रह धरल्यानंतर पराशर यांनी सभात्याग केला.
- त्यानंतर महापौर आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. शिशिर कुमार बाउन्सर्ससह या बैठकीत पोहोचला आणि वाद निर्माण झाला.
- विरोधी नगरसेवकांनी बैठकीचा भाग नसलेला शिशिर कुमार बैठकीला उपस्थित असल्याने आक्षेप घेतला.
- शिशिर कुमारचा माजी उपमहापौर विनय कुमार यांच्याशी शाब्दिक वाद झाला. तसेच नंतर त्याच्या आईच्या विरोधात असलेल्या नगरसेवकांशी त्याचा शाब्दिक वाद झाला.
त्यानंतर पराशर यांनी पाटण्याचे जिल्हा दंडाधिकारी त्यागराजन एस. एम. यांना विनंती केली की, शिशिर यांना पाटणा महानगर पालिकेच्या (पीएमसी) बैठकांमध्ये सहभागी होण्यास बंदी घालावी. पोलिसांनी सांगितले की, शिशिर कुमारचा भाजपाशी संबंध असल्याचा दावा केला जात आहे आणि त्याचे अनेक गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत. त्याच्याविरोधात खून करण्याचा प्रयत्न आणि धमकी देण्यासारखे गंभीर गुन्हे आहेत. साहू यांचे टीकाकार आणि राजकीय प्रतिस्पर्धी असा आरोप करतात की, या घटनेवरून असे दिसून येतेय की, महापौरांना त्यांचा मुलगा कंट्रोल करत आहे. त्यांनी सशस्त्र सुरक्षेसह पीएमसीच्या बैठकांमध्ये सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती किंवा यापूर्वीही त्यांनी महापालिकेच्या कामात हस्तक्षेप केल्याची ही पहिलीच घटना नव्हती. सूत्रांनी सांगितले की, साहू यांच्याविरोधात असलेल्या काही नगरसेवकांनी शिशिर यांना पीएमसीच्या बैठकांमध्ये सहभागी होण्यास बंदी घालण्याची मागणी करणारे पत्र लिहिले होते.
शिशिर यांनी बैठकीत मारहाण का केली?
येत्या निवडणुकीत पाटणा येथून विधानसभेच्या जागेसाठी शिशिर इच्छुक असल्याचे मानले जाते आणि ११ जुलैची घटना ही सार्वजनिक व्यक्तिरेखा निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे म्हटले जाते. पाटणा महापालिकेमध्ये ७५ नगरसेवक आहेत, जे अधिकृतपणे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत. कारण- महानगरपालिका निवडणुका पक्षाच्या आधारे लढल्या जात नाहीत. परंतु, मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओ स्टेटमेंटमध्ये शिशिर याने स्वतःची ओळख राज्य भाजपा कार्यकारिणीचे सदस्य व महापौरपदाचा प्रतिनिधी, अशी करून दिली. “महापौरांनी पीएमसीमधील भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला राज्यात राहू दिले जाणार नाही. एकदा या अधिकाऱ्यांची चौकशी झाली की, मी पोलिसांत तक्रार करेन. फक्त गुन्हा दाखल झाला म्हणून मी दोषी नाही. मी घाबरत नाही आणि कोणासमोर झुकणार नाही,” असे शिशिर कुमारने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले.
शिशिर कुमारच्या दाव्यांबद्दल विचारले असता, भाजपाने म्हटले की, ते त्यांची बाजू मांडत आहेत आणि सर्व बाजू ऐकल्याशिवाय निष्कर्ष काढू नयेत. “सर्व पक्षांनी त्यांचे विचार मांडले, तरच निष्पक्ष सुनावणी शक्य आहे. आपण सर्व बाजू ऐकूया,” असे पक्षाचे प्रवक्ते मनोज शर्मा म्हणाले. काँग्रेस प्रवक्ते ज्ञान रंजन गुप्ता म्हणाले, “सर्व बिहारवासीयांना माहीत आहे की, शिशिर यांचे भाजपाशी संबंध आहेत. ते पाटण्यात असल्याचा दावा करणारे व्हिडीओ पोस्ट करीत आहेत. मात्र, पोलिसांनी त्यांना अद्याप अटक केलेली नाही. पोलिसांना कोण रोखत आहे? कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे. भाजपा फक्त राजकीय फायद्यासाठी राज्यातील करदात्यांचे शोषण करू इच्छित आहे.”
पोलिसांनी काय म्हटले?
पाटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) कार्तिकेय शर्मा यांनी त्यांच्या बाजूने कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होत नसल्याचे म्हटले. १३ जुलै रोजी त्यांनी निदर्शनास आणून दिले की, तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन, शिशिर कुमारला अटक करण्यासाठी साहू यांच्या महाराजगंज येथील निवासस्थानी छापा टाकण्यात आला. त्या छाप्यामुळे साहू यांच्या समर्थकांनी निदर्शने केली होती आणि त्यांनी पराशर यांच्या प्रतिमा जाळल्या. पोलीस अधीक्षक म्हणाले, “महापौरांनी पूर्ण सहकार्य केले नाही. त्यासंबंधी पुढील चौकशी सुरू आहे आणि त्यात त्यांचीही चौकशी केली जाईल.”