लोकसभा निवडणूक लढविण्यास राज्यातील नेते फारसे उत्सुक नसतात. निवडून गेल्यास दिल्लीत येणारा भाषेचा प्रश्न अनेकांना सतावतो. तसेच मानमरातब मिळत नाही. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार किंवा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची नावे लोकसभेचे उमेदवार म्हणून चर्चेत आली. वडेट्टीवार यांनी चंद्रपूर मतदारसंघात कन्येसाठी जोर लावला होता. पण पक्षाच्या नेतृत्वाने वडेट्टीवार यांनाच लढविण्याची गळ घातली. ही ब्याद नको म्हणून स्वत: तर नाहीच पण मुलीच्या उमेदवारीचा आग्रह सोडून दिला म्हणे. शेवटी प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. दानवे यांच्या आमदारकीची मुदत दीड वर्षे असल्याने तेसुद्धा कितपत आग्रही आहेत हे कळायला मार्ग नाही. पण सरकारी बंगला, गाडी, पोलिसांचा ताफा, परत विरोधी पक्षनेते म्हणून होणारी कामे हे सारे लक्षात घेतल्यावर मुंबई सोडून दिल्लीत जाण्याच्या कोण भानगडीत पडेल?

राजवाडयावरील शिष्टाचार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील नवीन राजवाडयात शाहू महाराज यांची भेट घेणार म्हटल्यावर अनेक शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. आगत-स्वागत झाल्यावर बंद दाराआड दोघांमध्ये चर्चा झाली. त्यात नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. त्यामुळे नंतर मालोजीराजे छत्रपती यांच्या भोवती गराडा पडला. तपशील समजून घेण्यासाठी वरच्या बाजूला असलेला एक सामान्य शिवसैनिक तेथे पायऱ्या उतरून पोहोचला. लगेचच तेथे उभे असलेल्या हुजऱ्यांनी, अहो, काय करताय? असे महाराजांजवळ जाता येत नाही. असे म्हणत त्याला वरच्या पायरीवरून पुन्हा खाली उतरण्यास भाग पाडले. हा सगळा जामानिमा पाहता त्याच्या चेहऱ्यावर जे उमटले ते बरेच काही दर्शवणारे होते. जनतेच्या पाठबळावर निवडणुकीला उभा असे घोषवाक्य घेऊन शाहू महाराज निवडणुकीला सामोरे जात आहेत. अशा काळात हुजऱ्यांचे सामान्यांप्रती राजवाडयाच्या शिष्टाचाराबाबत ठाम राहणे कितपत योग्य?

हेही वाचा >>> ३३ वर्षांनंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते लोकसभा निवडणूक लढवणार; गमावलेला गड काँग्रेसला परत मिळणार का?

आधी पैसा मगच..

हौसे, गवसे, नवसे, जत्रा. निवडणूक म्हटलं की लोकशाहीचा उत्सव म्हणजे जत्राच. या जत्रेत गर्दी जितकी जास्त तेवढी प्रसिद्धीची हमी. निवडणुकीच्या रणांगणावर केवळ भाषणबाजी, आश्वासन यांचा पाऊस चालत नाही तर गर्दीही जमवावी लागतेच. प्रचारसभेला किती गर्दी होती यावर निवडणुकीतील उमेदवाराचे पारडे जड का हलके हे राजकीय निरीक्षक  ठरवत असतात. गेल्या आठवडयात एका पक्षाने संवाद मेळावा आयोजित करून गर्दी करण्याचा प्रयत्न केला. गर्दीच्या प्रतीक्षेत तब्बल दोन तास तिष्ठत बसावे लागल्याची कुजबुज सुरू होती. आणि अचानक गर्दीचा लोंढा आला आणि पाहता पाहता सभास्थळ गर्दीने फुलून गेले. आयोजकांचे चेहरेही गर्दी पाहून शाबासकी मिळेल या आशेने फुलले. सभा झाली. नेतेमंडळी मार्गस्थ झाली आणि एका कोपऱ्यात वाद सुरू झाला. तीनशे ठरले होते, दोनशेच हातावर टेकवले. काय मुडदाड हाय ह्यो, आता पुढच्या येळंला सांगायला ये तव्हा, अगुदर पैकं मगच मोटारीत पाय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(संकलन : दिगंबर शिंदे, संतोष प्रधान, दयानंद लिपारे)