छत्तीसगढमध्ये सत्तारूढ काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट मुकाबला आहे. गेल्या २०१८ च्या निवडणुकीत भाजपची पंधरा वर्षांची राजवट काँग्रेसने खंडित केली. राज्यातील विधानसभेच्या ९० पैकी ७१ जागा त्यांनी जिंकल्या. तर भाजपला केवळ १५ ठिकाणी यश मिळाले. बहुजन समाज पक्ष १ व माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या जनता काँग्रेस छत्तीसगढला एक जागा मिळाली. काँग्रेस पुन्हा सहज सत्ता राखेल असेच चित्र होते. मात्र गेल्या सहा महिन्यांत राज्यातील परिस्थिती बदलली. आता लढत चुरशीची झाली आहे. राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना राज्यात मिळणारा प्रतिसाद पाहता, भाजपाही तगडा प्रतिस्पर्धी बनला आहे.

राज्यातील मतदारसंघही छोटे आहेत, त्यामुळे भाकीत वर्तवणे कठीण आहे. तुर्तास काँग्रेसचा प्रचार भाजपच्या तुलनेत संघटित आहे. भाजपच्या प्रचाराची सूत्रे केंद्रीय नेतृत्वाकडे आहेत. भुपेश बघेल यांना टक्कर देण्यासाठी भाजपकडे राज्यात तगडा नेता नाही. त्यामुळे पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. यातून राज्यात काही प्रमाणात काँग्रेस पुढे आहे, मात्र त्यांना सत्ता राखताच येईल असे थेट सांगणे कठीण आहे. बघेल यांच्या एकमुखी नेतृत्वाच्या जोरावर काँग्रेसने राज्यात सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या आधारे प्रचार चालवला आहे. बघेल यांना पक्षात टी.एस. सिंहदेव यांनी आव्हान दिले होते. पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीने उपमुख्यमंत्रीपदावर त्यांची बोळवण करण्यात आली. काँग्रेस पक्षनेतृत्वापुढे बघेल यांच्यापुढे नमण्याखेरीज पर्याय नव्हता. निवडणुकीला सामोरे जाताना बघेल हाच काँग्रेस पक्षाचा प्रमुख चेहरा आहे. राज्यात ३० टक्के आदिवासी मतदार आहेत. त्यांच्यासाठी विविध योजना राबवल्याचा सरकारचा दावा आहे. भाजपच्या हिंदुत्वाच्या प्रचाराला तोंड देण्यासाठी काँग्रेसने सौम्य हिंदुत्वाचा आधार घेतला. त्यातून सरकारी पातळीवर विविध यात्रा सरकारने सुरू केल्या.

हेही वाचा – तेलंगणात चंद्रशेखर राव हॅटट्रिक करणार का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधानांच्या प्रतीमेवर भिस्त

भाजपने विधानसभेचे काही उमेदवार जाहीर करत, काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न चालवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर भाजपची सारी भिस्त आहे. राज्यात पंतप्रधानांचे दौरेही झाले. माजी मुख्यमंत्री रमणसिंह हे जरी राज्यातील पक्षाचे प्रमुख नेते असले तरी, सत्ता आली तर तेच मुख्यमंत्री होतील याची खात्री नाही. खासदारांसह अनेक ज्येष्ठ नेत्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवत सत्ता आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पंतप्रधानांनी सभांमध्ये राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत काँग्रेसची कोंडी केली आहे. सत्ताविरोधी नाराजीचा काँग्रेसला काही प्रमाणात फटका बसेल. आदिवासींच्या धर्मांतराचा मुद्दाही भाजपने उपस्थित केला आहे. एकूणच राज्यातील इतर कोणत्याही भाजप नेत्यापेक्षा छत्तीसगढमध्ये मुख्यमंत्री भुपेश बघेल विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हा सामना होईल असे चित्र आहे.

हेही वाचा – ‘भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता मिळाली तर जनेतला पश्चाताप व्यक्त करावा लागेल’, केरळच्या मुख्यमंत्र्यांची टीका

संख्याबळ २०१८

एकूण जागा – ९०

काँग्रेस – ६८

भाजप – १५

अन्य – ७