गेल्या अनेक वर्षांमध्ये बिहारच्या राजकारणात काही मोजक्याच पक्षांनी वर्चस्व गाजवलं आहे. त्यामध्ये जनता दल युनायटेड आणि राष्ट्रीय जनता दलसारखे प्रादेशिक पक्ष, भाजपा व काँग्रेससारखे राष्ट्रीय पक्ष यांचा समावेश आहे. मात्र, अलीकडच्या निवडणुकांमध्ये काही छोटे प्रादेशिक पक्ष बिहारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या लहान पक्षांचं नेतृत्व लोकप्रिय असलेले स्थानिक नेते, जे विशिष्ट गटात किंवा समाजात प्रभावशाली आहेत, त्यांच्याकडे आहे. बिहारमधील लहान पक्ष राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तसेच अनेकदा ते मोठ्या पक्षांसाठी खूप तगडे आव्हान उभे करू शकतात. हे पक्ष जातीय आणि प्रादेशिक ओळखींवर आधारित असतात. निवडणुकांमध्ये हे लहान पक्ष वोट-कटर्स म्हणून काम करतात. त्यामुळे निवडणुकांचे निकाल निर्णायकपणे बदलू शकतात. हे लहान पक्ष सत्ताधारी युतीत सामील होऊन मोठे बदल घडवून आणू शकतात. बिहारमधील २४३ सदस्यांच्या विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर मागील काही निवडणुकांमध्ये या लहान पक्षांनी कसा प्रभाव दाखवला ते पाहूया….

लोक जनशक्ती पक्ष (रामविलास पासवान)

आगामी बिहार निवडणुकांमध्ये केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी हा एनडीएचा सर्वांत महत्त्वाचा मित्रपक्ष आहे. चिराग पासवान यांनी बिहारच्या राजकारणात सक्रिय होण्याचा आणि एका साधारण जागेवर विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनुसूचित प्रवर्गातील पासवान समाज केवळ त्यांच्या समुदायाच्या पलीकडे विचार करीत अनेक पक्षांशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएसोबतच्या जागावाटप करारावरून नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला मजबूत आव्हान देऊ शकतात.

२०२०च्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोक जनशक्ती पक्षाने एकट्याने १३५ जागांवर उमेदवार मैदानात उतरवले होते; मात्र केवळ मिथिहानी या एका जागेवर त्यांना मिळाला होता. तरीही त्यांना ५.६६ इतकी मतं मिळाली. ६४ जागांवर लोक जनशक्ती पक्ष तिसऱ्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर होता. तिथे या पक्षानं विजेत्याच्या विजयाच्या फरकापेक्षाही जास्त मतं मिळवली होती. त्यापैकी २७ जागांवर जेडीयू दुसऱ्या क्रमांकावर होता. म्हणजेच एनडीएमध्ये राहिला असता, तर किमान २७ जागा अधिक जिंकता येऊ शकत होत्या. २०२४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएमध्ये परतलेला लोक जनशक्ती पक्ष केवळ पाच जागांवर लढला आणि त्या सर्व जागा पक्षानं जिंकल्या. ३० विधानसभा विभागांमधील या जागांमध्ये पक्षानं ६.६ टक्के राज्यव्यापी मतं मिळवली. तसेच बहुतांश ठिकाणी ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवून वर्चस्व गाजवलं.

भाकपा लिबरेशन

बिहारमधील डाव्या पक्षांपैकी सर्वांत प्रभावी पक्ष म्हणजे भाकपा लिबरेशन. २०२० मध्ये युतीसोबत लढून १९ पैकी १२ जागा जिंकून पक्षानं विक्रमी कामगिरी केली. या जागांवर पक्षाचं सरासरी मताधिक्य ४१.३६ टक्के होतं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षानं तीन जागा लढवून दोन जागा जिंकल्या. १२ विधानसभा विभागांत आघाडी घेतली आणि उर्वरित आठ विभागांत पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला. बहुतेक सर्व ठिकाणी पक्षाला ३० टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली.

हिंदुस्तानी अवाम मोर्चा (सेक्युलर)

जेडीयूमधील सत्तासंघर्षामुळे मुख्यमंत्री पदावरून बाहेर पडलेल्या जितनराम मांझी यांनी २०१५ मध्ये हिंदुस्तान अवाम मोर्चा स्थापन केला. २०२० च्या निवडणुकांमध्ये सात जागा लढवून चार जागा जिंकल्या. हा पक्ष मुसहर समाजात प्रभावी मानला जातो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये गयातून एकमेव उमेदवार म्हणून मांझी यांनी ५२.३ टक्के मतांसह विजय मिळवला आणि त्यानंतर ते केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदावर आले.

जन सुराज पक्ष

राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राज्यभर यात्रा काढल्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये जन सुराज पक्षाची स्थापना केली. २०२५ ची विधानसभा निवडणूक हा पक्षाचा पहिला मोठा सामना असेल. मात्र, २०२४ मधील चार पोटनिवडणुकांमध्ये बेलागंज व इमामगंजमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नुकसान केल्याचे दिसून आले.

राष्ट्रीय लोक मोर्चा

उपेंद्र कुशवाह यांनी २०२३ मध्ये जेडीयूला राम राम केल्यानंतर राष्ट्रीय लोक मोर्चा स्थापने केला आणि ते एनडीएमध्ये सामील झाले. २०२० मध्ये त्यांचा आरएलएसपी पक्ष ९९ जागांवर लढला; मात्र एकही जागा त्यांना जिंकता आली नाही. तरीही ३३ जागांवर त्यांनी निवडणुकीचा निकाल प्रभावित केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एकमेव लढवलेल्या जागेवर कुशवाह २५.१४ टक्के इतक्या मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. एकंदर या संपूर्ण परिस्थितीवरून लक्षात येते की, बिहारमध्ये लहान पक्षांचा भौगोलिक प्रभाव जरी मर्यादित असला तरी ते मोठ्या पक्षांचे समीकरण बिघडवून, निवडणुकांच्या निकालावर निर्णायक परिणाम करू शकतात.