कोल्हापूर : राजकीयदृष्ट्या काहीशा तणावपूर्ण वातावरणात कोल्हापुरात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकोट प्रेमाची प्रचिती घडवली. पन्हाळगडावरून बोलताना या ऐतिहासिक किल्ल्याला पूर्णतः शिवकालीन पुनर्निर्मित करण्याचा इरादा व्यक्त करतानाच जागतिक वारसा स्थळात शिवरायांचे १२ किल्ले समाविष्ट करण्याबाबत ठामपणे आश्वासित केले.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान विरोधकांनी हवा तापवलेली असताना मुख्यमंत्री फडणवीस हे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत कोल्हापुरात येणे हेच एक आश्चर्य होते. खेरीज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनीही सोबत घेत त्यांनी हजेरी लावली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त विधान करणारे कोरटकर सारख्या वाचाळवीरांना अटक करून कडक कारवाई करावी या मागणीसाठी इंडिया आघाडी, महाविकास आघाडी कोल्हापुरात आक्रमक झाली होती. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी गनिमी काव्याने निदर्शने करण्याची तयारी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली होती. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री कोल्हापुरात येणार असल्याने पोलीस यंत्रणाही तशी तणावातच होती. त्यांनी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली होती. राजकीय धग जाणवू लागली असताना विमानतळावर कोरटकर, सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांचा शिवराळपणा यासारखे प्रश्न आल्यावर मुख्यमंत्र्यांनानी बोलणे आवरते घेतले.

आमदार विनय कोरे यांच्या प्रयत्नाने साकारलेल्या ‘ पन्हाळगडचा रणसंग्राम ‘ या १३ डी या अद्यावत तंत्राद्वारे निर्माण करण्यात आलेल्या लघुपटाचा त्यांनी मनमुराद आस्वाद घेतला. ऐतिहासिक पन्हाळगडावर सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या किल्ले, गडकोट विषयी प्रेमाचा दाखल पाहायला मिळाला. पन्हाळगड शिवकालीन पद्धतीने व्हावा यासाठी विनय कोरे यांनी सुरू केलेल्या प्रयत्नाचा संदर्भ देऊन फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या किल्ल्यापैकी पन्हाळा हा पहिला शिवकालीन पुनर्निर्मित करण्याची घोषणा करीत गडकोट मिनची मने जिंकली. रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून केलेल्या कामाचाही त्यांनी उल्लेख करीत इतिहासाशी जोडण्याची संधी या निमित्ताने मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळासाठी नामांकित केले आहेत. त्याचे एक सादरीकरण पॅरिसमध्ये झाले आहे. दुसऱ्या सादरीकरणासाठी मुख्यमंत्री मे महिन्यात विदेश दौरा करणार आहेत. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक वारसा हक्क स्थळात आणण्याचा आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखवला. यामुळे साहजिकच फडणवीस यांच्या या भाषणाला शिवप्रेमी, इतिहास प्रेमी, गड -किल्ले प्रेमींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला.