मुंबई : मुंबईतील बाँबस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता बरोबर पार्टीत नाचलेल्या नाशिकमधील वादग्रस्त नेते सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश स्वहस्ते करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी टाळले. त्यामुळे बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला विरोध केलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर बडगुजरांचा पक्षप्रवेश उरकण्याची वेळ आली.
बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा गेली दोन-तीन आठवडे सुरू होती. ते मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्कात होते आणि महाजन यांनी फडणवीस यांच्याकडे बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाचा आग्रह धरला होता. पण बडगुजर यांच्याविरोधात २९ गुन्हे दाखल असून सलीम कुत्ताबरोबर केलेल्या पार्टीची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करण्याची घोषणा फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री असताना विधानसभेत केली होती.
भाजप आमदार सीमा हिरे यांच्यासह अनेक नेत्यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला तीव्र विरोध केला होता. पण शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते असलेल्या बडगुजर यांची नाशिक महापालिकेत ताकद असून काही नगरसेवक त्यांच्याबरोबर आहेत. महापालिकेची आगामी निवडणूक काहीही करून जिंकायची, हा भाजपचा निर्धार असल्याने वादग्रस्त बडगुजर यांना पक्षात प्रवेश देण्यास फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविला.
बावनकुळे हे कुटुंबासह सुटीचा आनंद घेण्यासाठी मकाऊ येथे गेले असताना कँसिओमध्ये खेळत असल्याची छायाचित्रे शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी काही काळापूर्वी प्रसारित केली होती. ती बडगुजर यांनी पुरविल्याची चर्चा होती. त्यामुळे बावनकुळे यांचा बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध होता. तो डावलून फडणवीस यांनी पक्षप्रवेशाला मान्यता दिली, तरी त्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व सलीम कुत्ताबरोबर संबंध असल्याचा आरोप झालेल्या बडगुजर यांचा पक्षप्रवेश करण्याचे टाळले.
भाजपकडून शक्यतो मंगळवारी पक्षप्रवेश होतात. फडणवीस हे मंत्रिमंडळ बैठकीसाठी व नंतरही मंत्रालयात उपस्थित होते. पण ते बडगुजर यांच्या पक्षप्रवेशासाठी जवळच असलेल्या प्रदेश कार्यालयात फिरकले नाहीत व मंत्रालयातून थेट ‘ वर्षा ‘ निवासस्थानी रवाना झाले. बावनकुळेही उशिरा प्रदेश कार्यालयात गेले आणि पक्षप्रवेश झाला. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते वसंतदादा पाटील यांच्या स्नुषा जयश्री पाटील या भाजपमध्ये प्रवेश करणार, हा निर्णय बऱ्याच दिवसांपूर्वी झाला आहे. त्यांची व फडणवीस यांची चर्चा झाली होती.
फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश व्हावा, असा त्यांचा आग्रह मान्य करण्यात आला व त्यानुसार बुधवारी त्यांचा पक्षप्रवेश होत आहे. त्यास फडणवीस पक्ष कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. मात्र बडगुजर व पाटील यांचे पक्षप्रवेश फडणवीस यांच्या हस्ते एकाच वेळी करण्याचे भाजपने टाळले आणि स्वतंत्रपणे केले. बडगुजर यांचा पक्षप्रवेश भव्य स्वरूपात प्रदेश कार्यालयापुढे मंडप टाकून व स्टेज उभारून करायचा होता, अशी भावना बावनकुळे यांनी मंगळवारी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी व्यक्त केली, मात्र त्यांचा व पाटील यांचा पक्षप्रवेश स्वतंत्रपणे करून भाजपने त्यांना त्यांच्याबाबत कोणती भूमिका आहे, याची जाणीव करून दिल्याचे सूत्रांनी सांगितले.