मुंबई : मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आरूढ झाल्यापासून राज्यातील राजकारणात आलेला कडवटपणा व विखार हळूहळू कमी होऊ लागल्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यातील राजकीय संस्कृतीनुसार सत्ताधारी व विरोधक यांच्या सौहार्द वाढत असल्याचे चित्र आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. तेव्हापासून दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर दोन्ही गटांमध्ये गेली दोन अडीच वर्षे कमालीचा विखार व कडवटपणा होता. पक्षफोडीमुळे शिंदे व अजित पवारांवर विरोधी पक्षातील नेत्यांकडून क़डवट टीका होत होती. विधानभवनात शिंदे व उद्धव किंवा आदित्य ठाकरे समोरासमोर आल्यावर नजरेतून अंगार प्रकट होत होता. आताही ठाकरे व शिंदे एकमेकांशी अवाक्षरही बोलत नाहीत. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या छायाचित्राच्या वेळी ठाकरे यांनी शिंदे यांच्या शेजारी बसण्याचे टाळले आणि शिंदे यांनीही त्यांच्याकडे बघण्याचे टाळले. पण ठाकरे हे फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद अध्यक्ष प्रा. राम शिंदे आदी नेत्यांबरोबर हसतखेळत गप्पा मारत होते.
शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ठाकरे यांच्याशी त्यांची भेट कधीही झाली नाही. पण फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात, नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात उद्धव व आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या भेटी घेवून विविध विषयांवर चर्चा केली आहे. त्यांच्यात हास्यविनोद व मनमोकळ्या गप्पा होत आहेत. राजकीय विरोधक म्हणून एकमेकांवर जोरदार टीका करीत असले तरी त्यातील विखारीपणा कमी झाला आहे. फडणवीस यांनी तर विधानपरिषदेत नुकत्याच केलेल्या भाषणात तर ठाकरे यांना सत्ताधारी गटात सामील होण्याची चक्क ऑफरच दिली. ठाकरे यांनीही ते गमतीने घेत दाद दिली.
फडणवीसांवर स्तुतीसुमने
फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले. या कॉफी टेबल बुकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर भरपूर स्तुतीसुमने उधळली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपने मुख्यमंत्री पदाबाबत दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप ठाकरे यांनी केला होता. फडणवीस व शहा यांच्यावर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्याबद्दल दगाबाजी केल्याची कडवट टीकाही करण्यात आली होती. मात्र आता पवार व ठाकरे यांचा राग हळूहळू कमी झाल्याचे दिसत असून फडणवीस हे हुशार, प्रामाणिक आणि विश्वासार्ह नेते असल्याचे प्रशस्तीपत्र ठाकरे यांनी दिले आहे. तर पवार यांनी फडणवीस यांच्या कार्याचा झपाटा व अन्य गुणांचे कौतुक केले आहे.
शिंदे मुख्यमंत्रीपदावर असेपर्यंत ठाकरे, पवार व अन्य नेत्यांकडून शिंदेंसह फडणवीसांवर जहरी टीका होत होती. राज्यातील राजकारण गढूळ झाले असून सत्ताधारी व विरोधक एकमेकांना कट्टर वैरी असल्याप्रमाणे समजत असल्याचे वर्तन व टीकेवरून दिसत होते. राजकारणातील कडवटपणा दूर करण्याचे प्रयत्न करीन, असे फडणवीस यांनी गेल्या दोन-तीन वर्षात काहीवेळा बोलूनही दाखविले होते. पण त्याला यश आले नव्हते. मात्र आता हळूहळू ठाकरे, पवार व काँग्रेस नेत्यांच्या टीकेतील कडवटपणा व धार कमी होत चालल्याचे चित्र दिसत आहे.