बुलढाणा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात प्रक्षोभक विधान करणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र ‘वाचाळवीरांना आवरा’, असे म्हणत गायकवाड यांचे नाव न घेता अप्रत्यक्षरीत्या कान टोचले.

येथील शारदा ज्ञानपीठाच्या प्रांगणात गुरुवारी संध्याकाळी पार पडलेल्या लाडकी बहीण सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. शिंदे गटाचे आमदार गायकवाड, भाजप खासदार अनिल बोंडे तसेच नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधानावरून गदारोळ सुरू आहे. याची दखल घेत, उपमुख्यमंत्री पवार यांनी वाचाळवीरांना खडेबोल सुनावले. महाराष्ट्र हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे, यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्यांचे हे राज्य आहे. याचे भान ठेवूनच नेत्यांनी बोलावे. आपल्या वक्तव्यामुळे महायुती आणि सरकार अडचणीत येणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्ला पवार यांनी दिला.

हेही वाचा: कधीकाळी मतदानावर बहिष्कार टाकणाऱ्या गावात यंदा मतदानासाठी लांबच लांब रांगा; जम्मू-काश्मीरमध्ये बदलाचे वारे?

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र आमदार गायकवाड यांचे कौतुक केले. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येत महापुरुषांच्या पुतळ्यांचे लोकार्पण हा एक विक्रम आहे. आमदार गायकवाड यांनी चांगले काम केले. त्यांचा विकासकामांचा धडाका कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा: ‘एक देश, एक निवडणूक’, राज्यावर परिणाम नाही; पालिका निवडणुकांबाबत संदिग्धता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘४६०० कोटींच्या धनादेशावर सही करूनच आलो ’

विरोधक लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर बंद पडणार, असा अपप्रचार करून योजनेत अडसर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, तुम्ही काळजी करू नका, योजना कुठल्याही स्थितीत बंद होणार नाही, असा दिलासा अजित पवार यांनी दिला. या कार्यक्रमाला येण्यापूर्वीच पुढील हप्त्यासाठीच्या ४६०० कोटी रुपयांच्या धनादेशावर सही करूनच येथे आल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना सुरू ठेवायची असेल तर पुढील निवडणुकीत कमळ, घड्याळ आणि धनुष्यबाणाला निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.