ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात कायमच राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील राहिलेल्या ‘हाजीमलंग की श्रीमलंगगड’ या वादाला राज्यस्तरीय हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच नव्याने दिलेली फोडणी सध्या येथील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. मलंगगडाच्या बाबतीत तुमच्या भावना पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असे वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यात नव्याने हिंदुत्वाचा नारा देण्याचा प्रयत्न केला असून आनंद दिघे यांच्याशी भावनिकदृष्ट्या कमालीचा जोडल्या गेलेल्या शिवसेनेच्या मतदारांनाही यानिमित्ताने साद घालण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मलंगगडाच्या डोंगराच्या पायथ्याशी नव्या वर्षाच्या सुरुवातीला राज्यस्तरीय वारकरी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. मलंगगडाचा हा सर्व परिसर वारकरी संप्रदायासाठी नेहमीच भावनिक विषय राहिला आहे. या संप्रदायाच्या मूळ पिठाचा मच्छिद्रनाथांची या गडावर समाधी असल्याचा दावा हिंदुत्ववाद्यांकडून नेहमीच केला जातो. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनीही याच मुद्दयावरुन मलंगगड मुक्ती आंदोलन हाती घेतले होते. त्यावेळी हे आंदोलन ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आणि विशेषत: कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर यासारख्या नव्याने विकसित होत असलेल्या पट्ट्यातील हिंदुत्ववादी तसेच शिवसैनिकांसाठी कमालिचा भावनिक विषय ठरला होता. देशात राम मंदिराचा मुद्दा तापला असताना दिघे यांनी त्याच दरम्यान मलंगमुक्तीचे आंदोलन सुरु केले होते. त्यामुळे हा मुद्दा शिवसेना आणि या भागातील हिंदुत्ववाद्यांसाठी नेहमीच महत्वाचा ठरला. राज्यस्तरीय हरिनाम सप्ताहाचे आयोजन करताना शिंदे पिता-पुत्रांनी राजकीय, सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मलंगगडाच्या पायथ्याची जागा निवडून ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा बुलंद करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमचे सरकार आजही आहे, उद्याही राहणार”

सप्ताह नाही तर धर्माचे काम

या सप्ताहानिमित्ताने राज्यभरातील किर्तनकार, भजन मंडळी तसेच वारकरी संप्रदायातील प्रभावी मंडळींना अंबरनाथ तालुक्यात निमंत्रित करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शास्त्री महाराज, वारिंगे महाराजांच्या पुढाकाराने आयोजित केलेला हा काही केवळ सप्ताह नाही तर हे धर्माने काम आहे अशापद्धतीची वातावरण निर्मिती यानिमित्ताने करण्यात आली होती. या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने निवृत्ती महाराज देशमुख, इंदुरीकर महाराजांच्या खास किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने वारकरी संप्रदायाने आपली ताकद दाखवून दिल्याचे वक्तव्य या मंडळींकडून करण्यात आले. या किर्तन सोहळ्यासाठी मलंगगड परिसरच नव्हे तर कल्याण, अंबरनाथ, ठाणे, पनवेल आदी भागांतून आलेल्या हजारो वारकरी मंडळींच्या दळणवळणाची तसेच इतर सुविधांची खास व्यवस्था याठिकाणी ठेवण्यात आली होती. श्रीरामांचे क्षेत्र अयोध्या येथून आलेल्या अक्षता कलशाचा कार्यक्रम हा या महोत्सवात सहभागी झालेल्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरला.

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला हिंदुत्वाची धार

या हरिनाम सप्ताहाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगडाविषयी तुमच्या मनातील स्वप्न मी पूर्ण करेन असे वक्तव्य करत या संपूर्ण माळकरी, वारकरी, भजनी मंडळांच्या या महोत्सवाला हिंदुत्वाची किनार मिळवून देण्याचा पद्धतशीर प्रयत्न केल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. देशभर अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनवरून वातावरण ढवळून निघाले आहे. अशात त्यालाच पुरक अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेत हाजीमलंग वादावर थेट वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे. हाजीमलंगचा मुद्दा संवेदनशील असला तरी अशाच प्रकारातील आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यावर ठरवून भूमीका घेतल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा – “गुन्हेगारांच्या स्थानबद्धतेत होणारा विलंब समाजासाठी धोकादायक,” उच्च न्यायालय म्हणाले…

श्रीमलंग मुक्तीचा आनंद दिघे साहेबांनी नारा दिला होता. या आंदोलनासाठी शिवसैनिकांच्या, हिंदुत्ववाद्यांच्या पिढ्यांनपिढ्या खपल्या आहेत. त्यामुळे दिघे साहेबांनी सुरु केलेल्या या आंदोलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्याय मिळवून देतील आणि कोट्यवधी नागरिकांनी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ती करतील. – नरेश म्हस्के, समन्वयक शिवसेना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमका हा वाद काय ?

ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ तालुक्यात रायगड जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या डोंगराला हाजीमलंगचा डोंगर म्हणून ओळखले जाते. हाजी मलंग, मलंगगड, श्री मलंग आणि मच्छिंद्रनाथांची समाधी अशा वेगवेगळ्या नावाने या जागेचा उल्लेख केला जातो. मुस्लिम बांधवांच्या मते ही हाजी अब्दुर्उरहमान मलंग साह बाबांची कबर आहे. सुमारे आठशे वर्षांपासून येथे दर्गा असल्याचा दावा मुस्लिम बांधव करतात. पेशव्यांच्या काळात येथे चादर चढवण्यात आल्याचेही पुरावे दिले जातात. तर येथील समितीमध्ये हिंदू ब्राह्मण कुटुंबांचाही समावेश आहे. येथील ट्रस्टची हिंदू देवतांची मंदिरेही आहेत. तर हिंदू बांधव नाथ पंथातील मच्छिंद्रनाथांची ही समाधी असल्याचा दावा करतात. या समाधीवर अतिक्रमण झाल्याचा आरोप हिंदू संघटनांकडून वारंवार केला जातो. मात्र हिंदू आणि मुस्लिम धर्मियांसोबत इतर धर्मीयही या स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात.