Congress accuses BJP of MP Vote Fraud : भाजपाने निवडणूक आयोगाशी संगनमत करून लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मतचोरी केल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार राहुल गांधी यांनी केला. मतदार याद्यांमध्ये फेरफार झाल्याचे काही पुरावेही त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेतून सादर केले. त्यांच्या या आरोपानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांच्या कथित मतचोरीच्या आरोपांना आता केरळमधूनही प्रतिसाद मिळला आहे. भाजपानं केरळमधील त्रिशूर लोकसभा मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार करून आपल्या उमेदवाराचा विजय घडवून आणला, असा दावा काँग्रेसनं केला आहे. केरळमधील भाजपाचे एकमेव खासदार व राज्यमंत्री सुरेश गोपी यांच्याविरोधात काँग्रेसनं मंगळवारी तक्रार दाखल केली आहे.
मतदार यादीत आपल्या नातेवाईकांची नावे समाविष्ट करण्यासाठी मंत्री सुरेश गोपी यांनी खोटी माहिती दिली असून त्यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. २०१९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार टी. एन. प्रभापन यांनी त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून सुरेश गोपी यांचा पराभव केला होता. २०२१ च्या केरळ विधानसभा निवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गोपी यांनी दणदणीत विजय मिळवून लोकसभेत प्रवेश केला. त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार सुनील कुमार यांना निवडणुकीत पराभूत केलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार मुरलीधरन या जागेवरून तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
काँग्रेसच्या माजी खासदाराने काय म्हटलं?
२०१९ मध्ये सुरेश गोपी यांचा पराभव करणारे काँग्रेसचे माजी खासदार टी. एन. प्रभापन म्हणाले, “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं बाहेरून लोक आणून त्यांना किरायाच्या घरांमध्ये ठेवलं. इतकंच नाही तर त्यांची त्रिशूर मतदारसंघातील मतदार यादीत नोंदणीही केली. निवडणुकीच्या वेळीही आम्ही याबाबत तक्रार केली होती, पण आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केलं. आता लोकसभेतील विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.”
आणखी वाचा : सोनिया गांधी यांचं नाव निवडणूक यादीत दोनदा? भाजपाने काय केला आरोप?
प्रभापन पुढे म्हणाले, “त्रिशूर मतदारसंघातील मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी त्या मतदारसंघात किमान सहा महिने वास्तव्यास असणे ही आवश्यक असलेली अट पूर्ण झाल्याचे खोटे निवेदन सुरेश गोपी यांनी दिले. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर गोपी आणि त्यांच्या कुटुंबातील आणखी ११ जणांची नावे या यादीत समाविष्ट करण्यात आली, त्यामुळे आमची ठाम मागणी आहे की, त्रिशूरमधील त्यांचा मतदानाचा अधिकार रद्द करण्यात यावा.” दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने केरळमध्ये आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्रिशूर, अटिंगल, पथानमथिट्टा आणि तिरुअनंतपूरम या मतदारसंघांवर भाजपाचे नेते तळ ठोकून होते.
गोपी यांच्या प्रचारार्थ मोदींनी घेतली होती सभा
राज्यातील पराभवाचा क्रम मोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः त्रिशूरमध्ये सभा आणि रोड शोद्वारे प्रचार मोहिमेची सुरुवात केली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपाच्या मतांचा टक्का ११.१५ वरून थेट २८.२ टक्के इतका झाला होता. त्यावेळीही भाजपानं सुरेश गोपी यांनाच उमेदवारी दिली होती. २०२४ मध्ये भाजपाने त्यांच्या अभिनेते गोपी यांच्या स्टार दर्जासह ख्रिस्ती समाजाशी असलेल्या सौहार्दपूर्ण संबंधांवरही भर दिला होता. त्रिशूरमधील सुमारे २४% मतदार ख्रिस्ती समुदायातील असल्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत सुरेश गोपी यांनी ३७.८% मतांच्या वाट्यासह ७४ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला.

राजीनाम्याच्या विधानामुळे सुरेश गोपी चर्चेत
९ जून २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात सुरेश गोपी यांनी शपथ घेतली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्याकडे पर्यटन व पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर काही दिवसांत एका मल्याळम वृत्तवाहिनीनं वृत्त दिलं की, गोपी हे मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत, कारण त्यांना फक्त खासदार म्हणूनच काम करायचे आहे. अभिनय हा गोपी यांचा छंद असून त्यांचे आधीच काही चित्रपट प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. तथापि, गोपी यांनी सोशल मीडिया पोस्टवर हा दावा फेटाळून लावला. “मी मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त चुकीचं असून मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्हाला केरळमध्ये विकास करायचा आहे,” असं मंत्री गोपी म्हणाले होते.
हेही वाचा : राहुल गांधींमुळे चर्चेत आलेल्या महादेवपुरा मतदारसंघातल्या त्या घरांमध्ये नेमकी किती माणसं राहतात?
त्रिशूर लोकसभा मतदारसंघात गैरप्रकार : माकपचा दावा
दरम्यान, त्रिशूरमधील कथित मतदान गैरप्रकारांच्या आरोपांमध्ये सत्ताधारी माकप (CPI(M)) पक्षही सहभागी झाला आहे. पक्षाचे सरचिटणीस एम. ए. बेबी यांनी भाजपावर मतदारसंघात तीन हजार बनावट मते वाढवल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, “हे बनावट मतदार त्रिशूरच्या आसपासच्या विधानसभा मतदारसंघांत मतदान करून नंतर शहरात बनावट पत्त्यांवरूनही मतदान करतात. हे नेमकं का आणि कशामुळे घडत आहे याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यायला हवे.” जिल्ह्यातील अनेक इमारतींमध्ये आठ ते १५ बनावट मतदारांचा समावेश करण्यात आल्याचा दावा केरळचे शालेय शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी केला आहे. मतदार यादीतील कथित अनियमितता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने त्रिशूर मतदारसंघात पुन्हा मतदान घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
भाजपाने नेमकी काय प्रतिक्रिया दिली?
खासदार सुरेश गोपी यांनी अद्याप या आरोपांवर प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी भाजपाचे राज्य सरचिटणीस एम. टी. रमेश यांनी त्रिशूरमधील विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे शक्य झाल्याचे सांगितले. “निवडणूक आयोगाने ठरवलेल्या नियमांनुसारच मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली. तिरुवनंतपूरमच्या मतदार यादीतून नावे वगळल्यानंतरच सुरेश गोपी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे त्रिशूरच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली. काँग्रेस आणि माकप पराभवाचा धक्का सहन करू शकत नाहीत, त्यांनी वास्तव स्वीकारायला हवं,” असा सल्ला रमेश यांनी दिला आहे.