MP women alcohol consumption मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितेंद्र (जितू) पटवारी यांच्या वक्तव्याने एक मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, देशातील इतर राज्यांच्या तुलनेत मध्य प्रदेशमधील महिला सर्वाधिक मद्यपान करतात. सार्वजनिक सभेत आणि नंतर भोपाळमध्ये केलेल्या या टीकेमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यानंतर भाजपादेखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काय आहे हा वाद? जितू पटवारी नक्की काय म्हणाले? अधिकृत आकडेवारी काय सांगते? त्याविषयी जाणून घेऊयात…

जितू पटवारी यांनी मध्य प्रदेशातील महिलांवर काय आरोप केले?

  • आपल्या भाषणात जितू पटवारी यांनी भारतीय जनता पार्टी (भाजपा) वर हल्ला केला.
  • बेरोजगारी, वाढलेले मद्यपान आणि मध्य प्रदेशात अमली पदार्थांच्या प्रसारासाठी त्यांनी भाजपाला जबाबदार धरले.
  • “जर तुमचा मुलगा बेरोजगार असेल, जर तुमचा मुलगा दारू पिऊन घरी येत असेल, तर मी १०० टक्के खात्रीने सांगू शकतो की यासाठी भाजपा, शिवराज सिंह चौहान आणि मोहन यादव जबाबदार आहेत,” असे पटवारी म्हणाले.
आपल्या भाषणात जितू पटवारी यांनी भारतीय जनता पार्टी (भाजपा) वर हल्ला केला. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

जितू पटवारी यांनी पुढे असा आरोप केला की, भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत मध्य प्रदेशमधील महिला सर्वाधिक मद्यपान करतात. “आपल्या भगिनी आणि मुलींनी मादक पदार्थ सेवन करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने लाडली बहनासारख्या योजनांच्या नावावर मते मागितली, परंतु महिलांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी कधीही गंभीर पावले उचलली नाहीत. आज मध्य प्रदेश असे राज्य होत चालले आहे, जिथे भारतातील सर्वाधिक मद्यपान करणाऱ्या महिला आहेत.”

भाजपा आक्रमक

जितू पटवारी यांच्या टिप्पणीमुळे मध्य प्रदेशातील सत्ताधारी पक्ष आक्रमक झाला आहे. भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी या टीकेला अशोभनीय म्हटले. राज्याच्या प्रवक्त्या नेहा बग्गा यांनी राजकीय फायदा मिळवण्यासाठी महिलांचा अपमान केल्याचा आरोप पटवारींवर केला आहे. “जेव्हा नेत्याकडे मुद्दे शिल्लक राहत नाही, तेव्हा ते महिलांना बदनाम करण्यासाठी खोट्या आकडेवारीची मदत घेतात, हा महिलांच्या प्रतिष्ठेवर हल्ला आहे. महिला व्यसनाधीन नाहीत, तुमची मानसिकता आहे,” असे बग्गा यांनी म्हटले.

अधिकृत आकडेवारी काय सांगते?

अधिकृत आकडेवारीनुसार, महिलांच्या मद्यपानाच्या बाबतीत मध्य प्रदेश अनेक राज्यांच्या तुलनेत खूप मागे आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ (२०१९-२०२१) नुसार आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

  • अरुणाचल प्रदेशमध्ये सुमारे २६ टक्के महिला मद्यपान करतात आणि हे प्रमाण सर्वाधिक आहे.
  • सिक्कीममध्ये १६.२ टक्के महिला मद्यपान करतात, त्यानंतर आसाम, तेलंगणा आणि झारखंडचा समावेश होतो.
  • या तुलनेत मध्य प्रदेशात केवळ १.६ टक्के महिला मद्यपान करतात, जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप कमी आहे.

मध्य प्रदेशात दारू हा राजकीय वादाचा मुद्दा का आहे?

मध्य प्रदेशच्या राजकारणात मद्य धोरण हा नेहमीच एक संवेदनशील मुद्दा राहिला आहे. महसूल वाढवण्यासाठी मद्य विक्रीला प्रोत्साहन दिल्याबद्दल आणि अवैध व्यापारावर नियंत्रण ठेवण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल सरकारवर टीका झाली आहे. ग्रामीण भागातील महिला संघटनांनी वारंवार कठोर निर्बंधांची मागणी केली आहे. मद्यपानामुळे घरगुती हिंसाचार, गरिबी आणि सामाजिक अस्थिरता निर्माण झाल्याचे महिला संघटनांचे म्हणणे आहे.

काँग्रेस नेत्याचे विधान पक्षासाठी अडचणी निर्माण करेल का?

मद्य सेवनाबद्दलच्या टीकेमुळे वाद निर्माण झाल्याने जितू पटवारी यांनी उचलून धरलेला बेरोजगारी आणि वाढत्या अमली पदार्थांच्या गैरवापरावर हल्ला करण्याचा मूळ उद्देश बाजूला पडला आहे. त्यांच्या टीकेमुळे लक्ष वेधले गेले असले तरी चुकीच्या आकडेवारीचा वापर आणि महिलांना लक्ष्य केल्याने अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः काँग्रेस राज्यात भाजपाला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असताना, अशी वक्तव्ये आणि वाद पक्षासाठी धोका निर्माण करू शकतात.