Congress disciplinary action मुख्यमंत्रिपदाबाबतच्या एका वक्तव्यानंतर कर्नाटक काँग्रेसने आपल्या आमदाराविरोधात कारवाई करीत, ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. शिस्तभंगाबद्दल उचललेले कठोर पाऊल आणि इतर नेत्यांसाठी एक इशारा म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसने कर्नाटकमधील चन्नगिरीचे आमदार शिवगंगा व्ही. बसवराज यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. पक्षनेतृत्वाने सार्वजनिकरीत्या कोणतीही चर्चा किंवा विधाने न करण्याच्या सूचना दिल्यानंतरही त्यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. काय आहे हे नेमके प्रकरण? आमदारांनी मुख्यमंत्रि‍पदाबाबत नक्की काय म्हटले? कोण आहेत शिवगंगा व्ही. बसवराज? जाणून घेऊयात.

आमदारांनी नक्की काय म्हटले?

  • बसवराज यांनी, वारंवार उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून सूत्रे हाती घेणार असल्याचे वक्तव्य केले होते.
  • डी. के. शिवकुमार यांचे समर्थक आणि दावणगेरे जिल्ह्यातील चन्नगिरीचे आमदार बसवराज नेतृत्वातील बदलांबद्दल वारंवार विधाने करीत आहेत.
  • त्यांनी डिसेंबरपर्यंत डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होऊ शकतात, असा दावा केला होता.
  • काही दिवसांपूर्वी सिद्धरामय्या यांचे निकटचे अनुयायी असलेले सहकारमंत्री के. एन. राजण्णा यांना मंत्रिमंडळातून काढण्यात आले, त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे.

राजण्णा यांनी नेतृत्वाबाबत आणि मतचोरी (vote theft)वर केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यात त्यांनी पक्षच यासाठी जबाबदार असल्याचा दावा केला होता आणि त्यामुळे ‘मतचोरी’विरोधात मोहीम राबविणारे राहुल गांधी अडचणीत आले होते. पक्षाच्या अंतर्गत बाबींवर सार्वजनिक वक्तव्ये करू नयेत, असा इशारा इतरांना देण्यासाठी या दोन्ही नेत्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. केपीसीसीच्या शिस्तपालन समितीने रविवारी ही नोटीस बजावली आणि बसवराज यांना सात दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे. या समितीचे प्रमुख राज्यसभेचे माजी उपसभापती के. रहमान खान आहेत.

नोटिशीमध्ये नेमके काय म्हटलेय?

समितीचे पदाधिकारी निवेदिथ अल्वा यांनी नोटिशीमध्ये म्हटले आहे, “माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही वारंवार केलेली सार्वजनिक वक्तव्ये केवळ पक्षासाठीच लाजिरवाणी ठरली नाहीत, तर त्यांच्यामुळे गोंधळही निर्माण झाला आहे. ही सार्वजनिक विधाने बेशिस्तपणा दर्शवतात. केपीसीसी शिस्तपालन समितीने या बेशिस्तीची गंभीर दखल घेतली आहे आणि तुम्हाला ही नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याबाबतची ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. “

काही दिवसांपूर्वी रामनगरचे काँग्रेस आमदार इक्बाल हुसेन यांनी राज्यात नेतृत्वातील बदलांबद्दल वारंवार वक्तव्य केले होते. त्यांनाही पक्षाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. ते डी. के. शिवकुमार यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्याशी जोडलेले आमदार आणि ज्येष्ठ नेते नेतृत्वबदलाबाबत वारंवार वक्तव्य करताना दिसत आहेत. त्यांची सार्वजनिक विधाने कथित ‘Leadership Rotation’ करारामुळे केली जात आहेत. मात्र, हा करार सिद्धरामय्या यांनी नाकारला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या अटकळींबाबत बोलताना सांगितले आहे की, ते आपला कार्यकाळ पूर्ण करतील.

डी. के. शिवकुमार काय म्हणाले?

डी. के. शिवकुमार यांनी शिवगंगा व्ही. बसवराज यांच्या विधानावर आक्षेप घेतला. शिवगंगा यांचे विधान पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले. अनेकदा सांगूनही शिवगंगा अशी विधाने करीत राहिले, तर त्यांना नोटीस पाठवली जाईल, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

कोण आहेत शिवगंगा व्ही. बसवराज?

शिवगंगा व्ही. बसवराज हे २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर चन्नगिरी मतदारसंघातून निवडून आले होते. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांचा शेती हा व्यवसाय आहे. शिवगंगा व्ही. बसवराज यांची एकूण घोषित मालमत्ता ६.१ कोटी रुपये आहे, ज्यात २.७ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि ३.४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांचे एकूण घोषित उत्पन्न २४.३ लाख रुपये असून, त्यापैकी ११.१ लाख रुपये स्वतःचे उत्पन्न आहे. शिवगंगा व्ही. बसवराज यांच्यावर एकूण १.७ कोटी रुपयांची देणी आहेत. त्यांनी या प्रतिज्ञापत्रात आपल्यावर तीन फौजदारी खटले दाखल असल्याचीही माहिती दिली आहे.