कविता नागापुरे, लोकसत्ता

भंडारा : भाजपने जिल्हा परिषदेमध्ये खेळलेल्या एका खेळीमुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांचा ‘वजीर’ पुढे चालविताच आला नाही. भाजपच्या एका खेळीमुळे नानांच्या इच्छेवर पाणी फेरले गेले. मात्र, याचा फायदा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जीभकाटे यांना झाला असून त्यांच्यावरील संकट आता टळले आहे.

भाजपमधून निलंबित माजी आमदार चरण वाघमारे (सध्याचे बीआरएस नेते) यांच्या सोबत गेलेल्या ३ जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपात घरवापसी केली. याचा थेट परिणाम जिल्हा परिषदेवर झाला आहे. सत्ता वाचविण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तारेवरची कसरत करावी लागणार, हे निश्‍चित आहे. दरम्यान, या संपूर्ण राजकीय घडामोडींचा सर्वाधिक लाभ विद्यमान जिल्हापरिषद अध्यक्ष गंगाधर जीभकाटे यांना होत आहे. कारण, २०२३ मध्ये जीभकाटे यांना बाजूला सारून काँग्रेसच्या एका महिला सदस्याकडे जिल्हा परिषदेची धुरा सोपवण्याची खेळी नानांनी खेळली होती. मात्र, सध्याचे जिल्हा परिषदेतील बदलेले राजकीय समीकरण आणि काँग्रेसकडे नसलेले बहुमत लक्षात घेता पटोले यांची जीभकाटे यांना पदमुक्त करण्याची इच्छा पूर्ण होणे अशक्य वाटते आहे. तसा प्रयत्न करणे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणेच ठरेल आणि ते नाना करणार नाही, हे नक्कीच. परिणामी जीभकाटे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा कार्यभार पूर्ण उपभोगता येणार आहे आणि इच्छा नसतानाही पटोले यांना जीभकाटेंना हे पद उपभोगू द्यावे लागणार आहे.

आणखी वाचा-ऊस निर्यातबंदी निर्णयावर शेतकरी संघटनांची विरोधाची वज्रमूठ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५२ सदस्यीय भंडारा जिल्हा परिषदेत १० मे २०२२ ला अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसाठी निवडणूक झाली होती. काँग्रेसच्या २१ सदस्यांनी एक अपक्ष आणि भाजपमधून निलंबित करण्यात आलेले चरण वाघमारे यांच्या ६ सदस्यांसोबत (भाजप ५+१ अपक्ष) मिळून सत्ता स्थापन केली होती. काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे अध्यक्ष तर चरण वाघमारे गटाचे संदीप टाले उपाध्यक्ष झाले. कालांतराने चरण वाघमारे गटातील २ सदस्य पुन्हा भाजपवासी झाले. दरम्यान, उपाध्यक्ष संदीप टाले, उमेश पाटील व द्रुपदा मेहर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात भंडारा जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात अपात्रतेबाबतची सुनावणी होऊ नये, यासाठी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांची ही याचिका फेटाळली. यामुळे सदस्य अपात्रतेची सुनावणी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांकडे होईल, हे स्पष्ट झाले. आता आपले पद जाणार, याची जाणीव होताच हे तिन्ही सदस्य पुन्हा भाजपमध्ये स्वगृही आले. काँग्रेसकडे आता २१ व १ अपक्ष तर भाजपकडे एकूण १२ सदस्य आहेत, त्यांना एका अपक्षाचे पाठबळ आहे. राष्ट्रवादीकडे १७ (राष्ट्रवादी प्रणीत आघाडी १६ व १ अपक्ष) असे बलाबल आहे. भाजपने आपल्या पाच सदस्यांना परत आणण्याची खेळलेली खेळी पटोले यांच्यावर भारी पडल्याचे चित्र आहे. सध्याची स्थिती पाहता जीभकाटे यांच्याकडील अध्यक्षपद काढून घेणे पटोलेंना राजकीयदृष्ट्या नक्कीच परवडणारे नाही.