प्रशांत देशमुख

वर्धा : वादाचे दुसरे नाव म्हणजे आमदार रणजीत कांबळे होय, या निष्कर्षावर पक्का शिक्का मारावा, अशी प्रतिक्रिया सार्वत्रिक उमटत आहे. वाद ओढवून घेणे, वादाला फोडणी देणे, वादंग निर्माण करणे, वादग्रस्त वक्तव्य करणे, असे वादाचे सर्व ते प्रकार आ. कांबळे यांनी जनतेला दाखवून दिले आहे. अधिकाऱ्यांसोबत, विरोधी पक्षनेत्यांसोबत, पत्रकारांसोबत व स्वपक्षीयांसोबत त्यांचा वाद सातत्याने गाजत आला आहे. पण कांबळेंना सांगणार कोण? हा प्रश्न व घंटा बांधणार कोण? हा प्रश्न समानार्थी ठरावा.

हेही वाचा >>> समलैंगिकतेबाबत मोहन भागवतांनी केलेल्या वक्तव्यावर संघाचे घूमजाव; संघाचे नेते म्हणाले, “हे राक्षसांचे…”

पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर अडचणींचे सावट गडद झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय व प्रदेश नेते आंदोलनाची कठोर भाषा व कृती करीत आहेत. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्याने आंदोलनाचे मोहोळ उठवून देण्याच्या भूमिकेत काँग्रेस नेते आले आहेत. आगामी काळातील प्रत्येक आंदोलन ठोस उत्तर ठरावे म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. . आगामी दोन महिन्यात ‘करो या मरो’ची लढाई लढण्याचा पवित्रा घेण्यात आला. हे करताना जिल्हा मुख्यालयी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडा, माध्यमांपुढे जा, असे स्पष्ट निर्देश असताना आ. कांबळे नाहक पत्रकार परिषदेतच वाद ओढवून घेतात.

हेही वाचा >>> शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना के. चंद्रशेखर राव यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’ची भुरळ

पक्ष कार्यालयातील धूळ खात पडलेल्या राष्ट्रीय नेत्यांच्या प्रतिमांना जपण्याचा सल्ला सार्वत्रिक होता. मात्र, कांबळेंनी तो स्वत:ला लावून घेतला. वाद सुरू केला. मी निपटवण्यास समर्थ आहे, अशी भाषा जाहीरपणे केली. हा उद्दामपणा येतो कुठून? असा प्रश्नच उपस्थितांना पडला. पत्रकारांना माहिती देण्यास आलेले प्रदेश नेतेही संकोचले. कृपया बातमीवर बहिष्कार टाकू नका, अशी विनंती करावी लागली. माध्यम प्रतिनिधींनी विनंती ऐकली. मात्र, कांबळेंचा जाहीर निषेध नाेंदवला. कांबळेंच्या चढ्या आवाजाला त्याच वेळी प्रत्युत्तरही मिळाले. यापूर्वी एकाही आंदोलनात न दिसणारा हा नेता केवळ सल्ले देण्यासाठीच येतो का, असे पत्रकारांनी ठणकावून सांगितले. वाद ओढवून घेण्याचा हा प्रकार काँग्रेसच्या अंगलटी येण्याची शक्यता दिसताच उपस्थित काही काँग्रेस नेत्यांनी पत्रकारांची क्षमा मागून झाले ते विसरण्याची विनंती केली. हे कांबळेदेखील करू शकले असते. मात्र, आजवर त्यांची प्रत्येक कृती क्षम्यच, अशाच भावनेत ते वावरल्याचे चित्र राहिले.

हेही वाचा >>> राजकीय व्यासपीठांवर प्रतीकांची नवी मांडामांड, ध्रुवीकरणाला वेग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोना काळात भाजप नेत्यांशी खडाजंगी झाल्यावर तत्कालीन पालकमंत्री सुनील केदार यांना मध्यस्थी करावी लागली होती. त्याच काळात एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ करण्याची ध्वनीफीत चांगलीच गाजली. त्यामुळे कांबळेंवर गुन्हेही दाखल झाले. यापूर्वी मंत्रीपद भूषविलेले व सातत्याने आमदार म्हणून निवडून येत असलेले कांबळे हेच काँग्रेसची जिल्ह्यातील पताका फडकवीत ठेवत आहे. जिल्हा शंभर टक्के भाजपमय करण्याच्या संकल्पास तेच आडवे येतात. त्यांच्या देवळी मतदार संघात ते काँग्रेस विरोधकांना सातत्याने नामोहरम करीत आले आहे. पक्षाचे ‘ॲसेट’ असलेले कांबळे ऐन संकटसमयी काँग्रेससाठी आपत्ती ठरत असल्याचे चित्र आशादायी म्हणता येणार नाही. त्यांना दोन समजूतीच्या गोष्टी प्रदेश नेते सांगणार का, असा काँग्रेस वर्तुळाचा प्रश्न आहे. पत्रकार परिषदेत घडलेला प्रकार एव्हाना ज्येष्ठांकडे कळवण्याची ‘जबाबदारी’ कांबळे विरोधकांनी पार पाडली असेलच. कांबळेंच्या संतापाला आवर घातल्या गेल्याचे पाहायला मिळेल, अशी आशा कार्यकर्ता वर्ग ठेवून आहे.