PM Narendra Modi mother AI video पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईवरील एआय (एआय) व्हिडिओवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. बिहार कॉंग्रेसच्या अधिकृत पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे. मात्र, असे असले तरीही, काँग्रेस आपली भूमिका कायम ठेवली आणि म्हटले की, कोणाचाही अनादर झालेला नाही आणि हा व्हिडिओ एका आईने आपल्या मुलाला शिकवण देण्याबद्दल आहे. “मुलांना शिकवणे हे पालकांचे कर्तव्य आहे. त्या (पंतप्रधान मोदींच्या दिवंगत आई हिराबेन मोदी) फक्त आपल्या मुलाला शिकवत आहेत आणि मुलाला जर असे वाटत असेल की हा त्यांचा अनादर आहे, तर ही त्यांची समस्या आहे,” असे काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले. या व्हिडीओमध्ये नक्की काय? व्हिडीओवर भाजपाची प्रतिक्रिया काय? या एकूण वादाविषयी जाणून घेऊयात…

व्हिडीओमध्ये काय?

बिहार काँग्रेसने ‘एक्स’ (X) वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, हिराबेन मोदी यांच्या एआय प्रतिमेद्वारे पंतप्रधान मोदींवर मत मिळवण्यासाठी त्यांचा वापर केल्याबद्दल टीका केली आहे. “अरे बेटा, आधी तू मला नोटाबंदीसाठी लांब रांगेत उभे केलेस, नंतर माझे पाय धुण्यासाठी रील बनवलीस आणि आता तू बिहारमध्ये माझ्या नावाने राजकारण करत आहेस. तू माझा अपमान करणारे बॅनर आणि पोस्टर्स छापत आहेस. तू पुन्हा बिहारमध्ये तेच करण्याचा प्रयत्न करत आहेस. राजकारणाच्या नावाखाली तू किती खालच्या पातळीवर जाणार आहेस?, ” असे दिवंगत हिराबेन मोदी पंतप्रधान मोदींना सांगत असल्याचे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे.

भाजपा आक्रमक

हा व्हिडिओ सर्व महिलांचा अपमान आहे. काँग्रेसने नीच स्तर गाठला, असा आरोप भाजपाने केला आहे. त्यानंतर खेरा यांची ही प्रतिक्रिया आली आहे. भाजपाचे प्रवक्ते सय्यद शाहनवाझ हुसेन यांनी निदर्शनास आणले की, गेल्या महिन्यात एका विरोधी पक्षाच्या रॅलीत पंतप्रधान मोदी आणि हिराबेन मोदी यांच्या विरोधात अपशब्द वापरले गेले होते. “काँग्रेस नीच स्तरावर पोहोचली आहे. आधी काँग्रेसच्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींच्या आईसाठी अपशब्द वापरले गेले. आता, पक्ष त्यांचा एआय-निर्मित व्हिडिओ तयार करून पुन्हा त्यांचा अपमान करत आहे. बिहार आणि भारत हा अपमान सहन करणार नाही. आपल्यात नसलेल्या पंतप्रधान मोदींच्या आईंचा असा व्हिडिओ तयार करणे दुर्दैवी आहे. काँग्रेसने ही निर्लज्जता सोडावी. या निवडणुकीत त्यांना याची किंमत मोजावी लागेल कारण बिहारमधील जनता खूप संतप्त आहे,” असे हुसेन म्हणाले.

भाजपाचे प्रवक्ते अरविंद कुमार सिंह यांनीही सांगितले की, या व्हिडिओने देशातील मातांच्या भावनांची थट्टा केली आहे. “काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या आईचा एआय व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे हे दुर्दैवी आहे. ते देशातील कोट्यवधी मातांच्या भावनांची थट्टा करत आहेत. आमच्यासाठी माता या दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांच्यासारख्या पूजनीय आहेत. काँग्रेस नेत्यांनी तात्काळ माफी मागावी,” असे ते म्हणाले.

अनादर कुठे आहे? – काँग्रेस नेते

काँग्रेसचे मीडिया आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख असलेले काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले की, कोणाचाही अनादर झालेला नाही आणि भाजपाने सहानुभूती मिळवण्यासाठी या मुद्द्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. “त्यांच्या दिवंगत आईचा अनादर कुठे झाला आहे? मला एक शब्द, एक हावभाव, एक इशारा दाखवा. कुठेही तुम्हाला अनादर दिसतोय का? आपल्या मुलांना शिकवणे हे पालकांचे कर्तव्य आहे आणि त्यांचा अधिकार आहे. त्या फक्त आपल्या मुलाला शिकवत आहेत. आता जर मुलाला वाटत असेल की तो त्याचा अनादर आहे, तर ती त्याची समस्या आहे, माझी किंवा तुमची नाही,” असे खेरा म्हणाले.

“भाजप प्रत्येक गोष्टीचा मुद्दा का बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न का करत आहे? या गोष्टींवर आता सहानुभूती राहिली नाही. पंतप्रधान मोदी ‘टच-मी-नॉट’ राजकारण करू शकत नाहीत. ते राजकारणात आहेत आणि त्यांना प्रत्येक गोष्ट, अगदी विरोधी पक्षाची विनोदी भावना सुद्धा योग्यरित्या घ्यायला हवी. यात विनोद नाही, यात केवळ उपदेश आहे, ” असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी आईंवरून भावून

या महिन्याच्या सुरुवातीला एका कार्यक्रमात महिलांना संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी ‘इंडिया’ आघाडीच्या रॅलीत त्यांच्या आईसाठी वापरल्या गेलेल्या अपशब्दांबद्दल सांगितले होते. ते म्हणाले होते की विरोधकांनी प्रत्येक आई आणि बहिणीचा अपमान केला आहे. “बिहारमध्ये, आरजेडी-काँग्रेसच्या व्यासपीठावरून माझ्या आईसाठी अपशब्द वापरले गेले. या अपशब्दांनी फक्त माझ्या आईचाच नाही, तर भारतातील प्रत्येक आई आणि बहिणीचा अपमान केला आहे. हे ऐकून तुम्हालाही माझ्यासारखीच वेदना झाली आहे हे मला माहीत आहे. माझ्या आईचा, ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. हे खूप दुःखदायक, वेदनादायक आणि व्यथित करणारे आहे,” असे ते म्हणाले होते.

आपल्या आयुष्यात आईने बजावलेल्या भूमिकेची आठवण करून देत पंतप्रधानांनी पुढे म्हटले, “माझी आई आजारी असली तरी ती काम करत राहायची. आमच्यासाठी कपडे घेण्यासाठी ती प्रत्येक पैसा वाचवत असे. आपल्या देशात अशा कोट्यवधी माता आहेत. आईचे स्थान देव-देवतांपेक्षाही उच्च आहे.”