महायुती सरकारमधील संजय शिरसाट व संजय राठोड हे शिवसेना शिंदे गटाचे दोन मंत्री गैरव्यवहार, भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. यातूनच राठोड यांना मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच दणका दिला. मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांच्या मालिकांमुळे धनंजय मुंडे यांच्यानंतर मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा कोणाचा क्रमांक लागणार याची कुजबूज आमदारांमध्येच सुरू झाली आहे.

शिवसेनेचे संजय शिरसाट यांच्यावर गेले काही दिवस सातत्याने आरोप होत आहेत. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलिल यांनी शिरसाट यांच्या विरोधात आरोपांची राळ उठवून दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीसाठी हॉटेल लिलावाची किंमत कमी करण्यात आल्याचा आरोप झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्यवहाराच्या चौकशीचा आदेश दिला. संपत्तीत वाढ झाल्याबद्दल दोनच दिवसांपूर्वी प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याचे स्वत: शिरसाट यांनी मान्य केले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिरसाट यांची चित्रफीतच सादर केली. त्यात घरात शिरसाट बसले असताना त्यांच्या बाजूला असलेल्या बॅगेत नोटांची बंडले दिसत आहेत. शिरसाट यांच्यावर होणारे आरोप, त्यांच्या विरोधात सारी कागदपत्रे विरोधकांच्या हाती लागणे, मुख्यमंत्र्यांनी दिलेला चौकशीचा आदेश यातूनच शिरसाट यांच्या मागे कोण लागले आहे याचीच सर्वत्र चर्चा होते.

जलसंधारणमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात महायुतीचेच आमदार अधिवेशनात खासगीत फार वाईट बोलताना अनुभवास येते. जलसंधारण खात्यातील बदल्या यंदा चांगल्याच गाजल्या आहेत. त्यातच जलसंधारण खात्यातील कामांना देण्यात आलेली सुधारित प्रशासकीय मान्यताच मुख्यमंत्र्यांनी रद्द केली. हा राठोड यांना मोठा दणका होता. कारण सुधारित मान्यतेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी झिरपल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांचे नागपूरमधील विश्वासू आमदार संदीप जोशी यांनीच राठोड यांच्या खातातील गैरव्यवहार आणि बदल्यांमधील गोंधळ यावरून आरोप केले होते.

संजय शिरसाट आणि संजय राठोड या दोन ‘संजय’ मुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. शिंदे स्वपक्षीयांना कोणालाच दुखावत नाहीत. पक्षप्रमुख त्यांचा तेवढा वचकही दिसत नाही. यामुळे मंत्री व आमदारांचे फावले आहे.

भरत गोगावले हे मंत्रीही कायम वादात असतात. राष्ट्रवादी अजित पवार गटाने गोगावले यांच्या विरोधात मोहिमच हाती घेतली आहे. गोगावले यांचे वादग्रस्त छायाचित्र राष्ट्रवादीने अलीकडेच प्रसिद्दीस दिले होते. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना मीरा-भाईंदरमधील मराठी मोर्चाच्या वेळी परिस्थिती योग्यपणे हाताळता आली नाही, असे शिंदे गटाच्या नेत्यांचे मत झाले आहे. आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील उपहारगृहात केलेल्या मारहाणीमुळे पक्षाची प्रतिमा अधिक डागळली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूणच सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात शिंदे गटाचे मंत्री व आमदारच अधिक चुकीच्या कारणांमुळे वादात अडकलेले दिसतात. शिरसाट यांच्यावर तर दररोज आरोप होत आहेत. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्यावर असेच आरोप झाले होते. शेवटी प्रकरण तापताच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांवर अशीच गत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यामुळेच धनंजय मुंडे यांच्यानंतर राजीनामा देणारा मंत्री कोण याचीच चर्चा सध्या विधान भवनात होताना दिसते.