सोमवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेदरम्यान रोहतकचे काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंह हुडा यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली. भारत-पाकिस्तान युद्धविरामाच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याबाबतही त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तब्बल २६ वेळा युद्धविरामाबाबत बोलल्याचे हुडा यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना दिपेंदर हुडा यांनी म्हटले, “भारतीय सैन्याला सलाम करण्यासाठी प्रस्ताव आणा, मग आम्ही तुमच्यासोबत आहोत. जर तुम्ही तसे करणार नसाल, तर आम्ही प्रस्ताव आणतो आणि तुम्ही त्याचे समर्थन करा. मूळात सैन्याचे शौर्य हा चर्चेचा विषय नाहीच. सैन्याने त्यांचे काम केले आणि सरकारने काय केले? भारतीय सैन्य जगातल्या सर्वोत्तम सैन्यापैकी एक आहे. या ऑपरेशनच्या काळात विरोधी पक्षांनी पूर्ण पाठिंबा दिला आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे म्हटले; पण तुम्ही काय केले?”

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी बोलताना हुडा म्हणाले, “आमच्या सरकारच्या काळात जेव्हा डोळे दाखवण्याची वेळ आली, तेव्हा आम्ही डोळे दाखवले आणि जेव्हा हात मिळवण्याची वेळ होती तेव्हा हात मिळवले. मुंबईवरील हल्ल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले होते की, पाकिस्तानमध्ये दहशतवादाचे सुरक्षित आश्रयस्थान आहे आणि ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. भाजपाचे परराष्ट्र धोरण तर बदलले आहेच; पण संघाचेही परराष्ट्र धोरण बदलले आहे का? अमेरिकेशी हातमिळवणी करायची की त्यांना डोळे दाखवायचे तुम्हीच ठरवू शकत नाही. एक तर डोनाल्ड ट्रम्प यांचं तोंड बंद करा किंवा भारतातलं मॅकडोनाल्ड बंद करा. भारत ही एक महासत्ता आहे. अमेरिकेला हे व्यवस्थित ठाऊक असलं पाहिजे की, भारत आणि पाकिस्तानची एकमेकांशी तुलना होणं शक्य नाही.”

अमेरिकेच्या विचारांबाबत शंका

अमेरिकेबाबत बोलताना हुडा म्हणाले, “अमेरिकेलाही भारताशी कोणत्या प्रकारचे संबंध ठेवायचे आहेत हे ठरवणं आवश्यक आहे. तुर्कीयेने पाकिस्तानला मदत केली तेव्हा पंतप्रधान सायप्रसला गेले होते. त्यातून एक चांगला संदेश गेला; पण त्यांना खरोखरच खऱ्या शत्रूला संदेश पाठवायचा होता. मग त्यांनी तैवानला जायला हवं होतं. त्याशिवाय परराष्ट्रमंत्री बीजिंगला गेले आणि म्हणाले की, आमचे संबंध सुधारत आहेत.”

अग्निवीर योजना आणि संरक्षण खात्याच्या बजेटमध्ये कपात केल्यावरूनही विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारले. काँग्रेस खासदार म्हणाले, “यूपीएच्या काळात भारतीय हवाई दलात ४१ स्क्वॉड्रन लढाऊ विमानांना मंजुरी देण्यात आली होती. सद्य:स्थितीत जमिनीवर ३१ स्क्वॉड्रन्स आहेत. आपले सैन्य आधुनिक शस्त्रास्त्रे आणि उपकरणांनी सुसज्ज असले पाहिजे. संरक्षणा दलाला सक्षम करण्यासाठी अर्थसंकल्पात जास्तीची तरतूद केली पाहिजे. आज तीन आघाड्यांवर चर्चा आहे. त्यामुळे देशाच्या सैन्याला बळकट करण्यावर केंद्र सरकारने जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे.”

“९ मे रोजी फायदा झाला, ती वेळ निर्णायक उत्तर देण्याची होती. १० मे रोजी युद्धविरामाची घोषणा झाली. तुम्ही पीओकेबाबत बोलत आहात; पण युद्धविरामाच्या मुद्द्यावर का बोलत नव्हता. तुम्ही ऑपरेशन राबवल्यानंतर म्हटले की, पाकिस्तानने गुडघे टेकले होते. मग युद्धविरामाची गरज काय होती? युद्धविरामाबाबत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे ट्विट आणि परराष्ट्रमंत्र्‍यांनी पाकिस्तानला फोन करून दहशतवादी तळांवर हल्ला करण्याबद्दल बोलणे हीदेखील धोरणात्मक चूक आहे. तुम्ही स्वत: वारंवार म्हटलं आहे की, पाकिस्तानचे दहशतवादी आणि सैन्य हे एकच आहेत, तर तुम्ही एवढी धोरणात्मक चूक कशी करू शकता, असे प्रश्न काँग्रेस खासदार हुडा यांनी संसदेत विचारले आहेत.

११ वर्षे जगभरात प्रवास करण्याचा काय फायदा झाला?

जगभरात भारताच्या मित्रराष्ट्रांची संख्या वाढवणं हे परराष्ट्र मंत्रालयाचं काम आहे. मग एवढं करून या काळात किती देश तुमच्यासोबत उभे राहिले आणि किती देशांनी आपल्याला पाठिंबा दिला ते सांगा. दहशतवादी कृत्यासह पाकिस्तानचाही निषेध करणाऱ्या एका देशाचं नाव तुम्ही सांगा. चीन, तुर्कीये, अझरबैजानसारखे कितीतरी देश पाकिस्तानसोबत आहेत. ११ वर्षांमध्ये तुम्ही एवढ्या देशांचा प्रवास केला; पण त्याचं सत्य हे आहे की, ऑपरेशन सिंदूरबाबत सत्य सांगण्यासाठी तुम्हाला शिष्टमंडळाची मदत लागली. ११ वर्षे जगभरात फिरून तुम्ही काय केले? भारत-पाकिस्तान संघर्ष सुरू असताना आयएमएफने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले. जागतिक बँकेने ४० अब्ज डॉलर्सचा गुंतवणूक प्रस्ताव मंजूर केला. पाकिस्तानला दहशतवादविरोधी संघटनेचे सहअध्यक्ष बनवण्यात आले, असे हुडा यांनी म्हटले आहे.

अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत होणाऱ्या चर्चेला घेऊन बरेच तर्कवितर्क लढवले जात होते. विरोधक सत्ताधारी सरकारला धारेवर धरणार हे नक्की असतानाच सत्ताधारी पक्षानंही त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी पुरेपूर तयारी केल्याचे दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी लोकसभेत पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर या मुद्द्यांवरून चर्चेला सुरुवात केली. विरोधी पक्षाकडून बऱ्याच काळापासून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं यावेळी त्यांनी दिली.