BJP to Congress defection आसाममधील भाजपाच्या तीन माजी आमदारांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राज्यातील राजकीय वाऱ्याची दिशा बदलली आहे. सत्यब्रत कलिता, बिनंदा कुमार सैकिया व डॉ. मानसिंग रोंगपी या तीन नेत्यांनी मंगळवारी (९ सप्टेंबर) पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपा नेत्यांच्या पक्षप्रवेशाने विरोधकांना नवी ऊर्जा मिळाली आहे आणि राज्यातील राजकीय लढाई पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

भाजपा नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

  • काँग्रेसचा हा पक्षप्रवेश सोहळा आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय असलेल्या इंदिरा भवन येथे पार पडला.
  • या कार्यक्रमात वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत या नेत्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
  • या घटनेकडे काँग्रेसच्या राजकीय पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांना आलेले फळ म्हणून पाहिले जात आहे.
  • आसाममध्ये काँग्रेस स्वतःला सत्ताधारी भाजपाचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न करीत आहे.
सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करताना काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या प्रशासनाला ‘खासगी कंपनी’ म्हटले आहे. (छायाचित्र-गौरव गोगोई/एक्स)

काँग्रेस नेत्यांचा सत्ताधारी भाजपावर आरोप

सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करताना काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या प्रशासनाला ‘खासगी कंपनी’ म्हटले आहे. त्यांनी आरोप केला की, हे सरकार लोकांच्या हिताऐवजी काही विशिष्ट लोकांच्याच हितासाठी काम करीत आहे. काँग्रेसचे उप गटनेते गौरव गोगोई यांनी आपल्या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “वाढत्या असंतोषामुळे भाजपाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनुभवी नेते सत्ताधारी पक्षाचा त्याग करून काँग्रेसमध्ये आश्रय घेत आहेत.”

“आसामच्या लोकांना हे माहीत आहे की, हिमंता बिस्वा सरमा यांचे सरकार आता लोकांचे सरकार राहिलेले नाही, तर ती त्यांची खासगी कंपनी झाली आहे. त्यामुळेच ज्या नेत्यांना खऱ्या अर्थाने लोकसेवा करायची आहे, ते भाजपा सोडून काँग्रेसमध्ये येत आहेत,” असे गौरव गोगोई यांनी या कार्यक्रमात सांगितले.

पक्षप्रवेश केलेल्या नेत्यांनी भाजपावर काय आरोप केले?

तिन्ही माजी आमदारांनीही याच भावना व्यक्त केल्या. त्यांनी दावा केला की, भाजपाने आपली आश्वासने आणि प्राधान्यक्रम सोडून दिले आहेत, तर काँग्रेस लोकांच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध आहे. त्यांच्या या पक्षबदलामुळे भाजपामधील सुप्त असंतोष समोर आला आहे. पक्षातील कामकाजाच्या पद्धती आणि स्थानिक समस्या हाताळण्याबद्दल टीका होत आहे.

राजकीय निरीक्षकांचे असे मत आहे की, जरी भाजपाचा आसाममध्ये मजबूत संघटनात्मक पाया असला तरी प्रमुख नेत्यांच्या या पक्षबदलामुळे त्याच्या स्थिरतेच्या आणि एकसंधतेच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो. काँग्रेससाठी हे नवीन सदस्य एका व्यापक रणनीतीचा भाग आहेत. काँग्रेसला आगामी निवडणुकापूर्वी पुन्हा संघटन मजबूत करणे, तळागाळातील लोकांचा पाठिंबा मिळवणे आणि स्वतःला राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारला एक सक्षम पर्याय म्हणून सादर करायचे आहे. २०२६ ची आसाम विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. त्यामुळे पक्षबदल, युती व संघटनात्मक ताकद यांचा राजकीय लढाईवर निर्णायक प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

आसाममधील भाजपाचा प्रभाव

या वर्षी मे महिन्यात आसाममध्ये पंचायत निवडणुका पार पडल्या. त्या निवडणुकांत भाजपानं मोठा विजय मिळवला. त्यांनी जिल्हा परिषदेच्या ३९७ जागांपैकी २१९ जागा जिंकल्या, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आसाम राज्य निवडणूक आयोगाच्या (ASEC) आकडेवारीनुसार, विरोधी पक्ष काँग्रेसला २७१ जागा मिळाल्या; तर एआययूडीएफला ३३, रायजोर दलाला ९, तृणमूल काँग्रेसला तीन, आसाम जातीय परिषदेला दोन, आम आदमी पक्षाला एक आणि अपक्ष उमेदवारांना ११७ जागा जिंकता आल्या.

त्यावेळी हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले होते की, पंचायत निवडणुकीत गावातील लोकांची भूमिका महत्त्वाची असते. शहरांमध्ये भाजपा आधीच मजबूत आहे. त्यामुळे जेव्हा गावांचे निकाल शहरांच्या निकालांशी जुळतील, तेव्हा निकाल आणखी चांगले लागतील. त्यांनी सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहता, मला वाटते की, भाजपामध्ये राज्यातील १२६ पैकी १०४ जागा जिंकण्याची क्षमता आहे. परंतु, शक्यता आणि वास्तविकता पाहता, असे वाटते की, आम्ही आगामी निवडणुकीमध्ये ९५ जागा सहज जिंकू.