अलिबाग : राज्यातील इतर भागांच्या तुलनेत महायुतीला कोकणात चांगेल यश मिळाले. मात्र हे यश मिळूनही लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत धुसफूस वाढल्याचे पहायला मिळत आहेत. घटक पक्षांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा मित्रपक्षांसाठी अडचणीच्या ठरू लागल्या आहेत.

लोकसभा निवडणूकीत रत्नागिरी सिंधूदूर्ग मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे विजयी झाले. मात्र नंतर शिवसेना शिंदे गटाने रत्नागिरीत काम केले नाही असा आरोप राणे कुटूंबियांनी केला. आता उदय सामंत यांच्या मतदारसंघासह रत्नागिरीतील पाचही विधानसभा मतदारसंघ स्वबळावर लढणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सामंत यांनी जाहीर केले.

आणखी वाचा-‘आनंदाचा शिधा’ योजनेत पारदर्शकता; ठराविक ठेकेदारांची मक्तेदारी संपुष्टात; ठेका मिळविण्यासाठी नऊ कंपन्या स्पर्धेत

मावळ मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे निवडून आले. पण निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने काम केले नाही ,असा थेट आरोप त्यांनी केला. आता विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील मतभेद उफाळून येण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभातील सुधाकर घारे यांच्या वाढत्या राजकीय महत्वाकांक्षा याला कारणीभूत ठरत आहेत.

कर्जत विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे आमदार आहेत. पण महायुतीचे जागा वाटप झाले नसतांनाही राष्ट्रवादी काँग्रेसने सुधाकर घारे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महेंद्र थोरवे संतापले आहेत. कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने युतीचा धर्म पाळावा अन्यथा आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर उमेदवार असतील असा थेट इशारा त्यांनी सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांना देऊन टाकला. थोरवेच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस विरूध्द शिवसेना असा संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. दरम्यान या टीकेनंतर शिवसेना पक्ष प्रतोद भरत गोगावले यांनी थोरवेंना सबुरीचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलून या संदर्भात तोडगा काढून अशी हमी दिली आहे.

आणखी वाचा-नितीश कुमारांची नक्कल करणे आरजेडी नेत्याला पडले महाग, विधान परिषदेतील सदस्यत्व रद्द; कोण आहेत सुनील सिंह?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा निवडणूक जशी जवळ येत चालली आहे. तसे महायुतीतील घटक पक्षातील मतभेदही समोर यायला लागले आहेत. तिन्ही घटक पक्षांच्या वाढत्या महत्वाकांक्षा यास कारणीभूत आहेत. हीच परिस्थिती कायम राहिली तर विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम होण्याची शक्यता आहे.