एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मीच पक्षाला दिला होता,असे फडणवीस म्हणत असले तरी ते मुख्यमंत्री होउ शकले नाही याची सल त्यांच्या समर्थकांच्या मनात कायम आहे. फडणवीस यांच्या अभिनंदन फलकांवरून अमित शहा यांचे छायाचित्र वगळून त्यांनी आपली नाराजी स्पष्ट केली,अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच नागपुरात आलेल्या फडणवीस यांचे मंगळवारी दणदणीत स्वागत झाले. या निमित्ताने भाजपचे नेते, आमदार,पक्षाचे पदाधिकारी व फडणवीस समर्थकांनी ठिकठिकाणी अभिनंदन फलक लावले होते. गडकरी व फडणवीस यांचे नेतृत्व मान्य करणा-या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या फलकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह राज्यातील नेत्यांची छायाचित्रे होती. विशेषत: आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी लावलेल्या फलकावरील छायाचित्रांमध्ये केंद्रीय व राज्यातील नेत्यांचा समन्वय साधण्यात आला होता. पण फडणवीस समर्थकांनी हे पथ्य पाळले नाही. त्यांच्या फलकांवर अमित शहा यांचे छायाचित्र नव्हते. फडणवीस समर्थक व माजी महापौर संदीप जोशी यांनी मिरवणुकीच्या मार्गावर पन्नासहून अधिक अभिनंदन फलक लावले होते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांची छायाचित्रे होती. फक्त अमित शहा यांचे छायाचित्र त्यावर नव्हते. शहा यांच्यामुळेच फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद गेले ही भावना अद्यापही फडणवीस समर्थकांच्या मनात कायम आहे. त्यांनी शहा यांचे छायाचित्र वगळून ही नाराजी फलकांवर व्यक्त केली,अशी भाजपमध्ये चर्चा आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे असे मीच पक्षाला सांगितले होते,असे सांगून फडणवीस यांनी चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र समर्थकांमध्ये नाराजी कायम आहे. या संदर्भात संदीप जोशी म्हणाले, अमित शहा पक्ष संघटनेत कुठल्याही पदावर नाहीत. ज्यांच्याकडे पक्षाची प्रमुख जबाबदारी आहे. त्यांचे छायाचित्र फलकावर आहे. दरम्यान पक्षात कुठलीही नाराजी नाही, असे भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी स्पष्ट केले. फलकांवर छायाचित्रे लावण्याचा ‘ प्रोटोकॉल ‘ असतो. त्यानुसारच छायाचित्रे होती. यातून चुकीचा अर्थ काढण्यात काहीच अर्थ नाही.