संभाजीनगर : ‘ धन्यवाद खासदार ओम.. आम्हाला कळालं असं’ असा मजकूर लिहून धारशिवमध्ये भाजपने खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या विरोधात प्रचार मोहीम सुरू केली आहे. भाजपचे कार्यकर्ते समाज माध्यमांमध्ये आम्हाला कळालं आहे, मजकूर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावा, यासाठी प्रयत्न करत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांना काय कळाले, हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील मतदानाशी त्याचा संबंध जोडला जात आहे.
गेल्या आठवड्यात गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान गणपती मंडळे लेझीम, ढोल वादन सादर करत होते तेव्हा तुळजापूर भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे सुपूत्र मल्हार पाटील आल्यानंतरही भाजपच्या कार्यकर्त्यांनी खासदार ओम राजेनिंबाळकरांना डिवचले होते. त्यानंतर पुन्हा नवी प्रचार मोहीम भाजपकडून सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या मोहिमेविषयी भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले, ‘ या मोहिमेबाबतचा योग्य वेळी खुलासा होईल. ’
धाराशिव जिल्ह्यात ओम राजेनिंबाळकर आणि राणा जगजतीसिंह पाटील यांच्यातील राजकीय वाद पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्येनंतर निर्माण झाले. धाराशिव विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये ओम राजेनिंबाळकर यांनी विजय मिळवला होता. २०१९ व २०२४ च्या लोकसभा निवडणुका त्यांनी मोठ्या फरकाने जिंकल्या. मात्र, आता अचानक भाजपने ओम राजेनिंबाळकरांच्या विरोधात समाजमाध्यमातून ‘ संशय’ निर्माण करणारी मोहीम सुरू केली आहे. या अनुषंगाने खासदार ओम राजेनिंबाकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमच्या निष्ठांविषयी त्यांनी बोलण्याची गरज नाही. त्यांनी रात्रीतून शरद पवार यांची साथ सोडून दिली होती. आम्हाला जर सत्तेला मदत करायची असती तर मागेच केली असती. असले काही आमच्या तत्वात बसत नाही. पण ते नेहमी काही तरी नवे करायला जातात आणि तोडांवर पडतात. ’ भाजपकडून करण्यात आलेल्या मोहिमेस ओम राजेनिंबाळकर यांनीही त्याच पद्धतीने उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. ‘ मालकाचे आदेश आणि गुलामाच्या पोस्ट’ असे उत्तर देत तिन्ही पिढ्यांचे कारनामे उपलब्ध असल्याचे ओम राजेनिंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
ऐन निवडणुकामध्येही संशय निर्माण करणाऱ्या मोहिमा धाराशिव जिल्ह्यात या पूर्वीही आणख्यात आल्या होत्या. २००४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ‘ पवन राजेनिंबाळकर यांचा पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा’ असे वृत्तच एका स्थानिक दैनिकात प्रसिद्ध करण्यात आले होते. ऐन मतदानाच्या दिवशी आलेल्या या मजकुराचा खुलासा रिक्षांवर मजकूर लिहून करण्यात आला होता. आता समाजमाध्यमांमध्ये नव्या रुपात संशय निर्माण करणाऱ्या मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत. या मोहिमेचा अर्थ अद्याप गुलदस्त्यात असून तो योग्य वेळी बाहेर येईल, असे सांगण्यात येत आहे.