Jyotiraditya Scindia rebellion 2020 मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांनी ज्योतिरादित्य शिंदेंच्या २०२० च्या बंडखोरीवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. २०२० मार्चमध्ये काँग्रेसमधील विश्वासू नेत्यांच्या फळीत असणारे ज्योतिरादित्य शिंदे पक्षातून बाहेर पडले. या बंडखोरीचा दोष दिग्विजय सिंह आणि कमलनाथ एकमेकांना देताना दिसत आहेत. या बंडखोरीमुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार कोसळले होते. या सरकारने केवळ १५ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. हा वाद नक्की काय आहे? ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडखोरीवरून काँग्रेसमध्ये वाद निर्माण होण्याचे कारण काय? जाणून घेऊयात…

दिग्विजय सिंह काय म्हणाले?

  • ‘एमपी तक’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ७८ वर्षीय दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिंदेंच्या मागण्यांची यादी विचारात न घेतल्याने त्यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला.
  • दिग्विजय यांनी दावा केला की, २०२० च्या सुरुवातीला ते, कमलनाथ व शिंदे एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या निवासस्थानी भेटले होते. त्यांच्यातील मतभेद मिटविण्यासाठी ही बैठक झाली होती.
  • या बैठकीत दिग्विजय यांनी दावा केला की, त्यांनी आणि शिंदेंनी कमलनाथ यांना ग्वाल्हेर-चंबळ (शिंदेंचा बालेकिल्ला) भागाशी संबंधित प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी एक मागण्यांची यादी दिली होती; परंतु त्या समस्या पूर्णपणे सोडविल्या गेल्या नाहीत.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांच्या २२ निष्ठावान आमदारांसह (सहा मंत्र्यांसह) भाजपामध्ये प्रवेश करीत बंडखोरी केल्याने कमलनाथ सरकार कोसळले. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

“एक उद्योगपती होता, ज्याचे दोघांबरोबरही (कमलनाथ आणि शिंदे) चांगले संबंध होते. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितले की, त्यांच्या भांडणामुळे सरकार पडेल. त्यानंतर उद्योगपतीच्या घरी रात्रीचे जेवण होते, मीही तिथे होतो. मी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला; पण जे मुद्दे निश्चित झाले होते, ते पाळले गेले नाहीत,” असे दिग्विजय यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले.

२२ आमदारांसह शिंदेंनी पक्ष सोडला

ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांच्या २२ निष्ठावान आमदारांसह (सहा मंत्र्यांसह) भाजपामध्ये प्रवेश करीत बंडखोरी केल्याने कमलनाथ सरकार कोसळले होते. दिग्विजय यांनी म्हटले की, जर शिंदेंच्या मागण्यांवर लक्ष दिले असते, तर सरकार पडले नसते. मात्र, शिंदे भाजपामध्ये जातील, अशी अपेक्षा त्यांना नव्हती, असेही ते म्हणाले. त्यावर कमलनाथ यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये म्हटले, “जुने मुद्दे उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही. पण,हे खरं आहे की त्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेव्यतिरिक्त ज्योतिरादित्य शिंदे यांना वाटले की, सरकार दिग्विजय सिंह चालवीत आहेत. याच असंतोषामुळे त्यांनी काँग्रेसचे आमदार फोडले आणि सरकार पाडले.”

या दाव्यांवर ज्योतिरादित्य शिंदे काय म्हणाले?

दिग्विजय यांच्या दाव्यांबद्दल शिंदेंना प्रसारमाध्यमांनी विचारले असता, ते म्हणाले, “मी जुन्या गोष्टींवर बोलणार नाही.” त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. राज्यातील काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांनी दिग्विजय आणि कमलनाथ यांच्या विधानांना महत्त्व देण्यास नकार दिला. ते म्हणाले, “त्यांच्यात एकमेकांबद्दल प्रेम आहे आणि त्यांची स्वतःची केमिस्ट्री आहे. त्यांना लोकांना मुद्द्यांवर चर्चा करायला लावण्याची कला माहीत आहे. त्यामुळे ‘विश लिस्ट’ (मागण्यांची यादी) काय होती, याची काळजी करू नका.”

दिग्विजय सिंह आणि शिंदे एकाच व्यासपीठावर आल्याने चर्चांना उधाण

नुकतेच दिग्विजय सिंह एका शाळेच्या उदघाटन समारंभात सामील झाले होते. त्या कार्यक्रमाला शिंदेही उपस्थित होते. त्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. शिंदे व्यासपीठावर बसलेले असताना दिग्विजय प्रेक्षकांमध्ये बसलेले दिसले. ते पाहून शिंदे खाली उतरले आणि ते दिग्विजय यांचा हात धरून, त्यांना व्यासपीठावर घेऊन गेले. त्या घटनेबद्दल विचारले असता, दिग्विजय यांनी सांगितले की, त्यांना व्यासपीठावर बसण्याऐवजी प्रेक्षकांमध्ये बसणे आवडते.

विरोधी पक्षात असूनही दिग्विजय आणि शिंदे यांचे संबंध सौहार्दपूर्ण आहेत. दिग्विजय यांनी अनेकदा काँग्रेसने शिंदेंचे वडील माधवराव शिंदे यांना पक्षात कसे घेतले आणि ते कसे पक्षाचे मोठे नेते झाले, याबद्दल सांगितले आहे. सप्टेंबर २००१ मध्ये माधवराव यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांनी ज्योतिरादित्य यांना योग्य मदत दिली होती, असा दावाही त्यांनी केला आहे. दिग्विजय यांचा बालेकिल्ला राघोगड हा शिंदेंच्या गुना लोकसभा मतदारसंघात येत नसला तरी तो गुना जिल्ह्यात येतो.

राज्यात पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न

२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर मोहन यादव यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. राज्यातील काँग्रेस युनिटची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करताना, काँग्रेस नेतृत्वाने नुकतीच राज्यातील नवीन जिल्हा काँग्रेस कमिटी (DCC) अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. त्यात दिग्विजय यांचे पुत्र व माजी मंत्री जयवर्धन यांना गुनाचे जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष नेमण्यात आले. दिग्विजय यांच्या एका निष्ठावान कार्यकर्त्याने सांगितले, “जितू पटवारी यांच्या नेतृत्वाखाली दिग्विजय यांनी त्यांच्या निष्ठावान लोकांना काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या पदांवर नेमण्यास मदत केली आहे. ग्वाल्हेर-चंबळमध्ये त्यांना पर्याय नाही. दिग्विजय यांना राज्यभरातील काँग्रेस नेते माहीत आहेत आणि त्यांचा पक्षावर अजूनही प्रभाव आहे.”

कमलनाथ यांनीही त्यांच्या निष्ठावान लोकांना महत्त्वाच्या पदांवर आणले आहे. “कमलनाथ अजूनही महाकोशल भागात प्रभावशाली आहेत आणि पक्षाला मदत करण्यासाठी त्यांच्याकडे मोठे आर्थिक स्रोत आहेत. त्यांना सहजासहजी बाजूला करता येणार नाही. नुकतेच खतांच्या तुटवड्याविरोधात निदर्शने करण्यासाठी सर्व वरिष्ठ नेते छिंदवाडा येथे पोहोचले होते. तिथे नकुल (कमलनाथ यांचा मुलगा व माजी खासदार) अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदा दिसले,” असे कमलनाथ यांच्या एका सहकाऱ्याने सांगितले.

मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याशी चांगले संबंध असलेले शिंदे यांनी नुकताच गुना आणि ग्वाल्हेर-चंबळ भागातील पूरग्रस्त भागांना भेट दिली होती. “शिंदे ग्वाल्हेर, शिवपुरी व गुनाच्या विकासासाठी केंद्रीय मंत्र्यांमध्ये लॉबिंग करीत आहेत. ते या भागांत विविध विकास प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात ड्रेनेज आणि स्वच्छता कामांपासून ते बस टर्मिनल, विमानतळ आणि विविध उद्योगांपर्यंतच्या कामांचा समावेश आहे. लोकांशी संपर्कात राहण्यासाठी ते महत्त्वाच्या सणांदरम्यानही या भागात येतात. ते भूतकाळाचा नव्हे, तर भविष्याचा विचार करीत आहेत,” असे शिंदेंच्या एका निष्ठावान कार्यकर्त्याने सांगितले.