मुंबई: शिवसेनेच्या मंत्र्यांना प्राप्तिकर विभागाच्या नोटीसा, मुंबई पालिका निवडणुकीसाठी ‘ठाकरे’ बंधूंच्या एकत्र येण्याच्या सुरु झालेल्या हालचाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुक्तवाव मिळत नसल्याने होणारी घुसमट, स्वपक्षीय मंत्री व आमदारांचे प्रताप यातून उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदे यांची चोहोबाजूने कोंडी झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्र पदाच्या शपथविधीपासून एकनाथ शिंदे नाराज आहेत. त्यांची ही नाराजी अनेक वेळा ठसठसीतपणे दिसून आली आहे. मुख्यमंत्री पदाची खात्री असलेल्या शिंदे यांना ऐनवेळी उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. ती सल त्यांच्या मनात आजही कायम आहे. त्यावेळी मुख्यमंत्री नाही तर किमान गृहमंत्री पद द्या अशी त्यांची अपेक्षा होती. फडणवीस गृहमंत्री पद सोडण्यास तयार झाले नाहीत.
नाराज शिंदे चार दिवस गावी जाऊन राहिले. त्यानंतर ठाण्यातील घरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपण नाराज नसल्याची सारवासारव केली. त्यानंतर त्यांनी सुरु केलेल्या अनेक कल्याणकारी योजनांना कात्री लावली गेल्याने शिंदे नाराज झाले. त्यांची ही नाराजी त्यांनी व्यक्त केली. रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला देण्यास मुख्यमंत्री तयार नाहीत. उदय सामंत यांनी त्यांच्या खात्याच्या कारभारावरून लिहिलेले पत्र हे सारे संदर्भ महत्त्वाचे आहेत.
मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात सध्या मोहिमच उघडण्यात आली आहे. त्यांच्या विरोधातील कागदपत्रे सरकारमधूनच कोणी तरी विरोधकांच्या हाती दिल्याचा संशय शिंदे गटात आहे. त्यातच शिरसाट यांना आलेली प्राप्तिकर विभागाच्या नोटीसीमुळे संतापात भर पडली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनाही नोटीस आल्याचे शिरसाट यांनी आधी सांगितले होते पण नंतर त्यांनी सारवासारव केली.
भाजपकडून सातत्याने डावलले जात असल्याची शिंदे गटाच्या आमदारांची तक्रार आहे. निधीवरून अजित पवार कोंडी करतात. ही बाब अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणूनही अजित पवारांच्या कार्यपद्धतीत बदल झालेला नाही, असाही शिंदे गटाच्या आमदारांचा आक्षेप आहे. दुसरीकडे. स्वत: शिंदे यांच्याकडे असलेल्या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कारभाराची तपासणी करण्याची टिप्पण वित्त खात्याने तयार केल्याबद्दलही शिंदे गटात अस्वस्थता आहे. शिंदे व त्यांच्या समर्थकांना चेपण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचा आरोप होत आहे.
अधिवेशन सुरू असताना शिंदे यांनी दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याचे समजते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. या आठवड्यात शिवसेनेतील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिंदे यांच्यासाठी हा निकालही महत्त्वाचा आहे.