सर्वसाधारणपणे सरकारी ,सामाजिक कार्यक्रमात मंत्री, सत्ताधारी पक्षाचे नेते राजकीय भाषण करणे टाळतात. कारण तसे पूर्वापार चालत आलेले संकेत आहेत. कार्यक्रम जर आरोग्य सेवेशी निगडीत असेल तर त्यात राजकीय टिकाटिप्पणी कोणी करीत नाही.पण २०१४ नंतर केंद्रात आणि राज्यात गैरकॉंग्रेसी सरकार आल्यावर संकेत, परंपरा मोडण्याची व ते नव्याने मांडण्याची पद्धत रुढ झाली. हे सर्व सांगण्याचे निमित्त ठरले ते केंद्रीय गृहमंत्री व भाजपमधील ‘ लोहपुरुष’ (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्दप्रयोग) अमित शहा यांचे नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमातील भाषण. ते त्यांच्या निवडणूक प्रचार सभेतील भाषणाप्रमाणे होते. त्यामुळे त्याची नागपूरच्या राजकीय वर्तु‌ळात चर्चा होत आहे.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबधित संस्थेव्दारे संचालित व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढकारातून नगपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची उभारणी झाली. २०२३ मध्ये त्याचे उद्घाटन झाले. खऱे तर तेव्हाच अमित शहा येणार होते. तशी घोषणाही झाली होती, पण ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला. तेव्हा ते येऊ शकले नाहीत म्हणून आता ते आले. निमित्त होते. इन्स्टिट्यूटच्या परिसरात बांधण्यात येत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकाच्या निवासाच्या भूमिपूजनाचे.

कॅन्सर रुग्णांवर उपचार करणाऱ्या संस्थेचा कार्यक्रम असल्याने आरोग्य सुविधांवर वक्ते बोलतील, असे अपेक्षित होते. तसे झालेही. मात्र शहा यांनी आरोग्य सुविधांवर बोलताना त्याला राजकारणाची जोड दिली. केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर आरोग्य क्षेत्रात झालेली गुंतवणूक, वैद्यकीय महाविद्यालये, एम्सच्या संख्येत झालेली वाढ व डॉक्टरांची वाढलेली संख्या, सरकारने उपलब्ध केलेली आरोग्य विमा सुविधा यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना उपचार सहज उपलब्ध झाले, असा दावा शहा यांनी त्यांच्या भाषणात केला. ते ज्या पक्षात आहेत व त्या पक्षाच्या केंद्रातील सरकारचा एक घटक आहेत, त्यामुळे सरकारने केलेल्या कामांची माहिती देणे यात काही गैर नाही, पण शहा यांनी सरकारची कामगिरी सांगताना पूर्वीच्या म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने आरोग्य क्षेत्रात काहीच काम केले नाही, त्या काळात उपचारावरील खर्चाच्या भीतीने रुग्ण उपचारच घ्यायला भीत होते , असेही सांगितले. रुग्णालयाच्या व्यासपीठावरून बोलताना शहा यांच्यातील राजकारणी पुरुष जागा झाल्याचे हे उदाहरण होते.

शहा यांनी काँग्रेस शासन काळाबाबत केलेले विधान नागपूरचाच विचार केला तरी वस्तूस्थितीला धरून नाही. नागपूरला एक नव्हे तर दोन सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालये आहेत. खासगी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय काँग्रेसच्याच राजवटीत सुरू झाले. नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तेथील उपचारामुळे दूरदूरपर्यंत प्रसिद्ध आहे. तेथे सर्वाधिक रुग्णांची गर्दी सध्या भाजपची सत्ता असलेल्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील रुग्णांची असते. शासकीय दंत महाविद्यालय काँग्रेसचीच देण आहे. मोपत उपाचाराची सुविधा केंद्रात काँग्रेसची सत्ता असतानाच सुरू करण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुर्गम भागात शासकीय रुग्णवाहिकेची मोफत सेवाही काँग्रेसच्याच राजवटीत आहे. राज्यात भाजप सत्ताकाळात ती मरणपंथाला आली हा भाग वेगळा. आरोग्य क्षेत्रातील अनेक गोष्टी, सांगता येतील त्या काँग्रेस सत्ताकाळात सुरू झाल्या. भाजप सरकारने त्या पुढे नेल्या. ही चांगली बाब आहे. पण पूर्वसरींनी काहीच केले नाही असे सांगणे हा दृष्ट राजकारणाचा प्रकार आहे. शहा चोवीस तास राजकारण करणाऱ्या नेत्यांपैकी एक नेते मानले जातात. काही गोष्टी राजकारणापासून दूर ठेवाव्या असे भाजप नेतच सांगतात. आरोग्य सुविधा ही त्यापैकीच एक गोष्ट असताना शहा यांनी त्यावर बोलताना राजकारण आणावे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते.