अलिबाग – आधी जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून सत्ताधारीपक्षात झालेले एकमत आणि आता मुख्यमंत्री समृध्य राज अभियानाच्या मुख्य कार्यक्रमाला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आणि रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी एकत्र लावलेली हजेरी, यामुळे रायगड जिल्ह्यात महायुतीमधील मतभेदांवर पडदा पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकमेकांविरोधातील तलवार म्यान केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सुरू झालेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता संघर्ष टोकाला पोहचला होता. तटकरे आणि गोगावले यांच्यातील वाद विकोपाला गेले होते. एकमेकांविरोधात कुरघोड्यांचे राजकारण सुरू झाले होते. शाब्दीक चकमकी आणि टिकाटीप्पणी दोन्ही पक्षांकडून सुरु होती. त्यामुळे महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते.
अशातच महाड मतदारसंघातील स्नेहल जगताप, राजीव साबळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेऊन तटकरे यांनी गोगावले यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. तर कर्जत मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या महेंद्र थोरवे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या सुधाकर घारे यांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये घेऊन जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केल्याने, शिवसेना आमदारांमध्ये कमालीची नाराजी निर्माण होती. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या अलिबाग मतदारसंघातही काँग्रेसच्या प्रविण ठाकूर यांना पक्षात घेऊन तटकरे यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. या घडामोडीमुळे दोन्ही पक्षातील संबध ताणले गेले होते.
या घडामोडींमुळे आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांनी एकत्र कार्यक्रमांपासून दूर राहणे पसंत केले होते. जिल्ह्याशी निगडीत विवीध विषयांच्या आढावा बैठकाही दोघे स्वतंत्रपणे घेत होते. बुधवारी मात्र मुख्यमंत्री समृध्द राज अभियानाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघेही एकत्र शासकीय कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे पहायला मिळाले, दोघांमध्ये यावेळी चांगला संवाद पहायला मिळाला.
काही दिवसांपूर्वी प्राप्त झालेल्या जिल्हा विकास योजनेतील निधी वितरणाबाबत दोन्ही पक्षात एकमत झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे दोन्ही पक्षातील मतभेद हळूहळू कमी होत असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. मात्र पालकमंत्री पदाबाबत दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील आम्ही दोघे रायगडच्या विकासासाठी एकत्र राहू असं आदिती तटकरे यांनी सांगितलं तर आम्ही दोघं चांगल्या कामासाठी एकत्र आलो आहोत यात कुणी राजकारण आणू नये अशी भूमिका भरत गोगावले यांनी मांडली. जिल्हयासाठी आम्ही दोन मंत्री आहोत आमच्यातील कुणी पालकमंत्री नसला तरी आम्ही जिल्हयासाठी काम करू असे गोगावले आपल्या भाषणात म्हणाले.
जर आमंत्रण वेळेत आलं तर आम्ही दोघेही आवर्जून हजेरी लावतो. पालकमंत्री पदाबाबत आमचे तीनही नेते निर्णय घेतील. पण जिल्ह्याचा जेव्हा विषय येईल, जिल्ह्याला जेव्हां आम्हा दोघांची गरज लागेल त्यावेळी आम्ही तितक्याच इच्छाशक्तीने आणि ताकदीने जिल्हयासाठी असणार आहोत. – आदिती तटकरे, मंत्री
आम्ही चांगल्या कामासाठी एकत्र आलो आहोत. हा विषय रायगड जिलह्याच्या विकासासंदर्भात आहे. यात कुणीही राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये. – भरत गोगावले, रोजगार हमी योजना मंत्री