पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या तमिळनाडू दौऱ्यावर आहेत. आज, २७ जुलैला त्यांनी तिरूचिरापल्ली जिल्ह्यातील गंगईकोंडा चोलापूरम मंदिराला भेट दिली आहे. तसंच ते तीरूवतीराई उत्सवात सहभागीदेखील झाले. हजार वर्षांपूर्वी राज्य करणाऱ्या सम्राटाने आजच्या काळातल्या दोन राजकीय दिग्गजांना एकाच मुद्द्यावर समोरासमोर आणलं आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात एका नवीन संघर्षाची सुरुवात झाली. ऐतिहासिक सम्राटाचा वारसा जपण्याच्या मुद्द्यावरून हे दोन्ही नेते समोरासमोर आले आहेत.

स्टॅलिन यांनी सम्राट राजेंद्र चोल यांची जयंती अधिकृत राज्य उत्सव म्हणून साजरी करण्याची घोषणा केली आहे. या निमित्ताने त्यांनी विविध उपक्रमांची घोषणा केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज, २७ जुलै रोजी गंगईकोंडा चोलपूरम इथे भेट दिली. हे ठिकाण कधी काळी चोलांची राजधानी होतं. इथे त्यांनी राजेंद्र चोलांच्या उत्तर भारतातील मोहिमेच्या स्मरणार्थ एक विशेष नाणं सादर केलं आणि त्यांच्यावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन केले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने चार दिवसांचा महोत्सव आयोजित केला आहे. हा महोत्सव राजेंद्र चोलांच्या सुदूर आग्नेय आशियातील सागरी मोहिमेच्या १०००व्या वर्षानिमित्त आयोजित करण्यात आला.

इतिहासाबाबत दावे

हे सर्व केवळ महोत्सव साजरे करण्यापुरते मर्यादित नाही. इतिहासाच्या स्मृतीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न इथे दिसून येतो. स्टॅलिन यांचा दृष्टिकोन द्रविडी अस्मितेवर आधारित आहे, तर मोदींचा दृष्टिकोन राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित आहे.

राजेंद्र चोल यांना त्यांच्या वडिलांकडून (राजराजा चोल) एक शक्तिशाली राज्य वारसा म्हणून मिळाले होते. त्यांनीच गंगेपासून सुवर्णद्वीप (सध्याचे जावा, सुमात्रा आणि आग्नेय आशियातील बेटे) पर्यंत जात चोल सागरी साम्राज्य प्रस्थापित केले. १०२५ साली त्यांनी मल्लक्का सामुद्रधुनीवरील व्यापार नियंत्रणासाठी श्रीविजय साम्राज्यावर (आजचा मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड) मोठी सागरी मोहीम चालवली. इतिहासकार हर्मन कुलके यांच्या मते ही मोहीम केवळ आक्रमकतेचा भाग नव्हती, तर समुद्रावर प्रभुत्व आणि प्रतिष्ठेचा जाणीवपूर्वक केलेला दावा होता.

चोल यांची अभियांत्रिकी

उत्तरेतील मोहिमेच्या विजयानंतर राजेंद्र चोल यांनी गंगईकोंडा चोलपूरम हे गाव राजधानी म्हणून प्रस्थापित केले आणि त्यांच्या सैन्याने गंगेचे पाणी आणून एका भव्य मानवनिर्मित जलाशयात सोडले. हा जलाशय ‘चोलगंगम टाकी’ म्हणून ओळखला जातो. ताम्रपटांमध्ये याचे वर्णन गंगाजलमय जयस्तंभ म्हणजे पाण्याचा विजयस्तंभ असे आहे. त्यानंतर राजेंद्र यांनी इथे एक भव्य मंदिर बांधले. हे मंदिर २५० वर्षांहून अधिक काळ शिव भक्ती, अद्भुत चोल वास्तुकला आणि प्रशासकीय कौशल्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.

युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश

आज या मंदिराचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहे. हे मंदिर त्याच्या गुंतागुंतीच्या शिल्पांसाठी, चोल कांस्य आणि प्राचीन शिलालेखांसाठी प्रसिद्ध आहे. आदि तिरूवतीराई उत्सव समृद्ध तमिळ शिव भक्ती परंपरेचा उत्सवदेखील साजरा करतो.

सध्या जलाशयाची ही रचना मात्र दुरावस्थेत आहे. त्यात गाळ नियंत्रणासाठी वर्तुळाकार संरचना, चौरस गाळ साचवणारे भाग अशा प्रणालींचा समावेश होता. अनिरूद्ध कनिसेट्टी यांनी ‘लॉर्ड्स ऑफ द अर्थ अँड सी’मध्ये नमूद केले आहे की, चोलांनी केवळ शहरे उभारली नाहीत तर पर्यावरणीय नियंत्रणही प्रस्थापित केले. या जलाशयाचे पुनरुज्जीवन केल्यास स्थानिक जैवविविधता, शेतीचे जाळे पुन्हा सशक्त होऊ शकते. राजेंद्र चोल यांचेही मूळ ध्येय हेच होते.

दोन राजकीय दृष्टिकोन

राजेंद्र चोल यांच्या स्मरणार्थ दोन विरोधी राजकीय नेते समारोमोर आले आहेत. स्टॅलिन यांची कथा प्रादेशिक अस्मिता, जलसुरक्षा आणि सांस्कृतिक वारशावर आधारित आहे. त्यांनी १९.२ कोटी रुपयांचा जलाशय पुनरुत्थान प्रकल्प जाहीर केला आहे. १२ कोटी रुपयांची दुरुस्ती, ३८ किमी कालव्यांचे गाळ काढणे, बंधाऱ्यांची डागडुजी आणि सात गावांतील शेतीसाठी जलपुरवठा. उर्वरित ७.२ कोटी रुपये पर्यटन सुविधा, फूटपाथ, उद्याने, सीसीटीव्ही आणि संरक्षक भिंतीसाठी वापरले जातील.
तसंच मंदिर परिसराजवळ एक संग्रहालयही उभारले जाणार आहे. हे मंदिर चोलांच्या सागरी व्यापार, मंदिर स्थापत्य आणि सांस्कृतिक प्रगतीचे प्रदर्शन करेल. २०२१ मध्ये स्टॅलिन यांनी आडी तरूवधिरै हा सार्वजनिक सुटीचा दिवस घोषित केला होता. आता राजेंद्र चोलांचे महान कार्य जगाला दाखवण्यासाठी पावले उचलली जात आहेत, असे त्यांनी २३ जुलै रोजी ट्विटरवर लिहिले.

दुसरीकडे, पंतप्रधान मोदींच्या भेटीलाही प्रतिकात्मक महत्त्व आहे. त्यांनी एका स्मृतिनाण्याचे प्रकाशन केले आणि संगीतकार इलैयाराजा यांच्या २० मिनिटांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. ते प्रदर्शनालाही भेट देणार आहेत, यामध्ये चोलकालीन शिल्पे, विजयी चिन्हे पाहायला मिळतील. संपूर्ण गाव रंगवले गेले आहे, संरक्षित भिंतीही बांधण्यात आल्या आहेत.

महत्त्वाचे मुद्दे:

  • दक्षिण भारतातील चोल राजवंशाचे एक महान सम्राट
  • दक्षिण भारत, श्रीलंका, अंदामन-निकोबार, सुमात्रा आणि इतर आग्नेय आशियाई भागांवर मोहिमा केल्या
  • गंगईकोंडा चोलपूरमची स्थापना केली
  • गंगेचे पवित्र पाणी त्यांच्या साम्राज्यात आणले
  • त्यामुळे त्यांना गंगा जिंकणारा चोल असे म्हटले जाते
  • श्रीलंका पूर्णपणे जिंकून तिथे चोल साम्राज्याचे नियंत्रण प्रस्थापित केले

चोल सम्राटांनी हिंदू मंदिराच्या जाळ्यांचा विस्तार केला होता आणि व्यापार मार्ग तयार केले होते. हेच अधोरेखित करत भाजपा आजच्या राजकीय मांडणीसाठी प्राचीन भारताचा सामर्थ्यशाली आणि इस्लामपूर्व गौरव दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, कनिसेट्टी यांच्या मते चोलांची साम्राज्य सत्ता धार्मिक नव्हती. ती व्यवहारवादी, धर्मनिरपेक्ष आणि व्यापारावर आधारित होती. मणिग्रामम आणि अय्यवोळे या व्यापारी संघटनांनी राजाश्रयाखाली भरभराट कली. आग्नेय आशियात मिळालेले शिलालेख आणि व्यापारी पुरावे हे धार्मिक नव्हे तर आर्थिक तसंच वाणिज्य संबंधांची साक्ष देतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजेंद्र चोल यांचे जहाज ज्या समुद्रात हजारो मैल गेले, त्या अभियानाच्या हजाराव्या वर्षी त्यांच्या कर्तुत्वाला अधोरेखित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इतिहासकार तानसेन सेन यांच्या मते, राजेंद्र चोलांची मोहीम ही आधुनिक अर्थाने साम्राज्य विस्तारासाठी नव्हती, तर तमिळ व्यापाराचे आणि ताकदीचे जगासमोर प्रदर्शन दर्शवणारी होती.