Sukhwinder Singh Gill Enforcement Directorate raided भारती किसान युनियन (तोटेवाल)चे अध्यक्ष व शेतकरी संघटनेचे नेते सुखविंदर सिंग गिल सध्या चर्चेत आहेत. बुधवारी (९ जुलै) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्या निवासस्थानी आणि पंजाब व हरियाणामधील इतर १० ठिकाणांवर छापे टाकले आहेत. सुखविंदर सिंग गिल हे ‘डंकी रूट’ रॅकेटमध्ये सामील असल्याचा आरोप आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. ‘डंकी रूट’चा वापर असुरक्षित मार्गांनी लोकांना विदेशांत पाठविणाऱ्या बेकायदा स्थलांतर नेटवर्कसाठी केला जातो. नेमके हे प्रकरण काय? कोण आहेत सुखविंदर सिंग गिल? छाप्यात यंत्रणांच्या हाती काय लागले? त्याविषयी जाणून घेऊयात.
ईडीच्या छाप्यात अनेक कागदपत्रे जप्त
बुधवारी (९ जुलै) सक्तवसुली संचालनालयाने ही कारवाई केली. छाप्याच्या वेळी पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील तोता सिंग वाला गावातील रहिवासी असलेले गिल त्यांच्या घरी नव्हते. ही कारवाई झाली तेव्हा ते मोहालीतील ‘कौमी इन्साफ मोर्चा’च्या निषेधस्थळी होते. सकाळी ५.३० वाजता ही कारवाई सुरु करण्यात आली, जी रात्री ८.३० वाजेपर्यंत सुरू होती. छाप्यादरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेक कागदपत्रे जप्त केली आणि त्यांच्या फोटो कॉपीज घेतल्या. मात्र, अद्यापही या प्रकरणाचा तपास सुरूच आहे.

डंकी मार्गाचा आरोप काय?
- गिल यांची संघटना बीकेयू (तोटेवाल) संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) चा भाग होती. त्या अंतर्गत २०२० ते २०२१ मध्ये तीन रद्दबातल कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करण्यात आले होते.
- गिल यांचा दावा आहे की, बीकेयू (तोटेवाल)चे मोगा, फिरोजपूर, मुक्तसर, तरणतारन, फाजिल्का व बर्नाला यांसह १० जिल्ह्यांमध्ये युनिट आहेत.
- १९ फेब्रुवारी रोजी धरमकोट पोलीस ठाण्यात गिल यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्यापासून नवा वाद निर्माण झाला.
- या एफआयआरमध्ये एका निर्वासिताने आणि त्याच्या गावातील रहिवाशाने आरोप केला आहे की, गिल यांनी त्याला बेकायदा डंकी मार्गाने अमेरिकेत पाठविण्यासाठी ४५ लाख रुपये घेतले.
- तक्रारदाराला १३ फेब्रुवारी रोजी अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले होते.
पण गिल यांचा दावा आहे की, ते सूडाच्या राजकारणाचा बळी ठरत आहेत. “हा एफआयआर आता उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. मी यात सहभागी नव्हतो; दुसरा कोणीतरी सहभागी होता. ईडीचे आताचे छापे हे दुसरे शेतकरी नेते बीकेयू (पंजाब)चे अध्यक्ष फरमान सिंग संधू यांच्या इशाऱ्यावर टाकण्यात आले आहेत,” असे गिल यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
सुखविंदर सिंग गिल कोण आहेत?
सुखविंदर सिंग गिल व्यवसायाने एक शेतकरी आहेत. ते सांगतात की, त्यांच्याकडे सुमारे सहा एकर जमीन आहे. सामाजिक कार्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांच्या महाविद्यालयीन काळात गिल भांगडा सादर करायचे. त्यांनी त्या काळात विविध स्पर्धांमध्ये त्यांच्या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले होते. “सुमारे १२ ते १५ वर्षांपूर्वी मी लग्न केले आणि मी इतर कार्यक्रमांमध्ये भांगडा ऑर्केस्ट्रा गटाबरोबर काम केले ,” असे ते म्हणाले. गिल काही पंजाबी चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणूनही काम करत होते. राजकारणातील त्यांचा प्रवास अल्पकाळाचा राहिला आहे. त्यांच्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून ते शिरोमणी अकाली दलाच्या (एसएडी) युवा शाखेत सामील झाले. परंतु, २०१५ मध्ये अकाली दल-भाजपा युती सरकारमधील गुरु ग्रंथ साहिब अपवित्र करण्यात आल्याच्या प्रकरणाचे कारण देत त्यांनी स्वतःला पक्षापासून दूर केले.
२०१६ मध्ये, त्यांनी पत्रकारितेत प्रवेश केला आणि स्थानिक टीव्ही चॅनेलसाठी रिपोर्टिंग केले. तसेच स्थानिक राजकारण्यांच्या मुलाखतीही घेतल्या. ते म्हणाले, “मी अनेक वर्षे इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार म्हणून काम करत होतो. जेव्हा पंजाबमध्ये शेती कायद्यांविरुद्ध आंदोलन सुरू झाले, तेव्हा मी निषेधाच्या ठिकाणांवरून रिपोर्टिंग केले. अखेर २०२० मध्ये रेल्वे रुळांवर निदर्शने तीव्र झाल्याने मी बीकेयू (पंजाब) मध्ये सामील झालो.” ते पुढे म्हणाले, “नंतर मी दिल्लीच्या सीमेवर गेलो आणि तिथून रिपोर्टिंग केले. मी एका सहकाऱ्यासह आमच्या गाडीत काही महिने राहिलो आणि अशा प्रकारे मी शेतकरी संघटनांशी जोडला गेलो.”
२०२१ च्या अखेरीस शेती कायदे रद्द करण्यात आले. त्यानंतर गिल बीकेयू (पंजाब)च्या युवा शाखेचे सदस्य आणि बीकेयू (पंजाब)चे सरचिटणीस झाले. २०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, गिल यांनी दिवंगत अकाली दलाचे नेते व माजी राज्यमंत्री जत्थेदार तोता सिंग यांना सक्रियपणे पाठिंबा दिला. तोता सिंग धर्मकोटमधून आम आदमी पक्षाकडून (आप) निवडणूक हरल्यानंतर गिल यांनी स्वतःला अकाली दलापासून पुन्हा वेगळे केले.
२०२२ च्या अखेरीस, गिल यांनी फतेह इमिग्रेशन नावाची इमिग्रेशन सेवा कंपनी सुरू केली. ही कंपनी आता बंद करण्यात आल्याचे सांगितले आहे. “या व्यवसायामुळे मी स्वतः खूप तोट्यात आहे. मी कोणाची फसवणूक कशी करू शकतो? कंपनी सुरू झाल्याच्या एक वर्षानंतर मी ती बंद केली,” असे ते म्हणाले. त्यानंतर गिल यांनी बीकेयू (तोटेवाल)ची स्थापना केली. सुरुवातीला ही संघटना फरमान संधू यांच्या बीकेयू (पंजाब) गटासह एसकेएमचा भाग होती. परंतु, फेब्रुवारीमध्ये एफआयआरनंतर एसकेएमने मार्चमध्ये गिल यांना निलंबित केले. तेव्हापासून बीकेयू (तोटेवाल)च्या सदस्यांनी एसकेएमच्या बैठकांमध्ये सहभागी होणे बंद केले आहे.
२०२०-२१ च्या शेतकरी आंदोलनादरम्यान गिल यांच्या संघटनेत काम करणाऱ्या बीकेयू (पंजाब)चे अध्यक्ष फरमान सिंग संधू यांनी वेगळा दृष्टिकोन मांडला. “मी त्यांना पत्रकार म्हणून पाहिले आणि ते मला हुशार वाटले म्हणून मी त्यांना युनियनमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. पण त्यांनी इमिग्रेशन कंपनी उघडल्यानंतर फसवणूक केल्याचा दावा करणाऱ्या लोकांकडून माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या. २०२४ च्या सुरुवातीला लोक माझ्या घरासमोर निदर्शने करीत होते. तेव्हाच मी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले,” असे संधू म्हणाले. ऑल इंडिया किसान फेडरेशनचे अध्यक्ष व एसकेएमच्या चौकशी समितीचे प्रमुख प्रेम सिंग भांगू यांच्या मते गिल यांचे निलंबन कायम आहे.
भांगू म्हणाले, “आम्ही चौकशी करीत आहोत. हद्दपार करण्यात आलेला मुख्य तक्रारदार अद्याप आमच्यासमोर हजर झालेला नाही. गिल यांच्या दाव्यानुसार, त्यांच्याविरुद्धचा एफआयआर रद्द करण्यात आला आहे; मात्र असे असले तरीही आम्हाला तक्रारदाराचे निवेदन हवे आहे. तोपर्यंत निलंबन कायम राहील,” असे ते म्हणाले. गिल यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले आहे . “फरमान हे भाजपा खासदाराचे भाऊ असल्याने, ते माझ्यावर छापे टाकण्यासाठी आणि बनावट एफआयआर नोंदवण्यासाठी त्यांच्या संपर्कांचा वापर करीत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.