Who is T Veena: सक्तवसुली संचनालय (ईडी) केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांची मुलगी टी वीणा यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. कोट्टायम जिल्हा परिषदेचे सदस्य आणि नुकतेच भाजपमध्ये सहभागी झालेले झालेले ज्येष्ठ नेते पी सी जॉर्ज यांचे पुत्र शोन जॉर्ज यांच्या तक्रारीवरून सक्तवसुली संचनालयाने मार्च २०२४ मध्ये वीणा यांच्याशी संबंधित कथित बेकायदेशीर पेमेंट घोटाळ्याची चौकशी सुरू केली. शोन यांनी वीणा यांच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) फर्म एक्सालॉजिक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडची चौकशी करण्याची मागणी ईडीकडे केली होती.

दरम्यान २०२३ पासून वीणा या केंद्रीय संस्थांच्या रडारवर आहेत. २०२३ मध्ये कोची येथील कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेडच्या अहवालात असे म्हटले, एक्सालॉजिकने ग्राहकांकडून कोणतीही सेवा न घेता त्यांना १.७२ कोटी रुपयांचे बेकायदेशीर पेमेंट केले आहे.

वीणा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या, तेव्हापासूनच त्या वादळाच्या भोवऱ्यात आहेत. केरळमधील राजकीय चर्चेत त्यांना या ना त्या कारणाने ओढले जात होते. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला वीणा तामिळनाडूतील एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना विजयन यांच्या विरोधकांनी वीणा यांना लक्ष्य केले होते. त्या काळात केरळमधील खाजगी महाविद्यालयांना सीपीआय(एम)चा विरोध होता.

कारकिर्द

महाविद्यालयीन शिक्षणानंतर, वीणा यांनी काही वर्षे तंत्रज्ञान कंपनी ओरेकलमध्ये काम केले आणि २०१२ मध्ये तिरुवनंतपुरममध्ये आरपी टेकसॉफ्ट इंटरनॅशनलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाल्या. हा मध्य पूर्वेतील आरपी ग्रुपचा आयटी उपक्रम आहे जो अब्जाधीश रवी पिल्लई यांनी प्रमोट केला आहे. आरपी टेकसॉफ्टमधून पायउतार झाल्यानंतर, वीणा यांनी २०१४ मध्ये एक्सालॉजिकची स्थापना केली. वीणा यांनी बेंगळुरूमध्ये कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने सीपीआय(एम) च्या प्रतिस्पर्ध्यांनी मोठी टीका केली होती.

मास्टरमाइंड

टी वीणा या एक्सालॉजिकच्या एकमेव संचालक आहेत. त्यांच्या कंपनीची पेड-अप भांडवल १ लाख रुपये आहे. ही कंपनी सॉफ्टवेअर आणि कन्सल्टन्सी सेवा पुरवते. पण, ती सध्या एक “निष्क्रिय” कंपनी आहे. २०२० मध्ये, सोन्याच्या तस्करी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी स्वप्ना सुरेश यांनी आरोप केला की, वीणा एका वादग्रस्त करारामागील “मास्टरमाइंड” होत्या, ज्यामुळे अमेरिकन कंपनी स्प्रिंकलरला केरळमधील लोकांची संमती न घेता कोविड क्वारंटाइन अंतर्गत आरोग्य डेटा गोळा करण्याची परवानगी मिळाली.

काँग्रेसचे आरोप

यानंतर काँग्रेसने वीणा यांचे सुरेशशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. जून २०२२ मध्ये राज्य विधानसभेत सोन्याच्या तस्करी प्रकरणावरील चर्चेदरम्यान, काँग्रेसने आरोप केला की, त्यावेळी प्राइस वॉटर हाऊस कूपर्सचे संचालक जयक बालकुमार हे वीणा यांचे मार्गदर्शक” होते. २०१९ मध्ये यूएई वाणिज्य दूतावासाच्या कार्यकारी सचिवपदावरून राजीनामा दिल्यानंतर पीडब्ल्यूसीने सुरेश यांना केरळ सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या स्पेस पार्क प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीणा यांच्याशी संबंधित सीएमआरएल पेमेंट वादानंतर, काँग्रेसने आणखी एक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. कॉग्रेसने आरोप केला की, या पेमेंटचा त्यांचे पती आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री मोहम्मद रियास यांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख नाही.