Maharashtra Political Top News Today : महाराष्ट्रात आज दिवसभरात अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चाकणमधील ठाकरे व शिंदे गटाच्या आमदारांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. पालघर साधू हत्याकांडातील आरोपीच्या भाजपा प्रवेशाने महाराष्ट्रात वाद निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील पक्ष अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे लढत आहे, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. तसेच अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरगंभीर आरोप केले आहेत. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊयात…

ठाकरे व शिंदेंचे आमदार एकत्र

चाकणमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (ठाकरे) व शिवसेना (शिंदे) आमदार एकत्र आले आहेत. चाकणमध्ये शिवसेनेकडून (शिंदे) माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी मनिषा गोरे या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरल्या आहेत. मनीषा गोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा अर्ज भरताना ठाकरेंचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेचे आमदार शरद सोनवणे उपस्थित होते.

“खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पश्चात ही पहिली निवडणूक पार पडत आहे. त्यांच्या पत्नी चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी उभ्या राहिल्या आहेत. अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेऊन, दिवंगत आमदार गोरेंना आदरांजली म्हणून आम्ही केवळ नगराध्यक्ष पदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा दिला आहे,” असे बाबाजी काळे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले आहे.

हत्याकांडातील कथित आरोपीच्या भाजपा प्रवेशावरून रोहित पवारांची टीका

पालघर येथे जमावाने दोन साधूंची हत्या केल्याच्या घटनेने राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. या हत्येनंतर तेव्हाच्या सत्ताधारी पक्षांवर भाजपाकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. आता या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आलेल्या व्यक्तीला भाजपाने पक्षात प्रवेश दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट केली आहे, यामध्ये त्यांनी भाजपाने काशिनाथ चौधरी यांना पक्षात प्रवेश दिल्याचे म्हटले आहे. तसेच ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच पक्षात स्थान दिल्याने त्या साधूंच्या हत्यांमागे भाजपाच होते का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. भाजपाचे गलिच्छ राजकारण असा हॅशटॅग देत, रोहित पवारांनी ही पोस्ट केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे स्थानिक निवडणुकांबाबत महत्त्वाचे विधान

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील पक्ष अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे लढत आहेत. अनेक ठिकाणी भाजपाने एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे. चाकणमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे दोन्ही गट (उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंचे पक्ष) एकत्र आले आहेत. तर चिंचवडणध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही गट (शरद पवार व अजित पवारांचे) एकत्र आल्याचे चित्रआहे. या सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, “अनेक पक्ष व मित्रपक्षांचे नेते गावागावात वेगवेगळे लढतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असं चित्र सर्रास पाहायला मिळतं. मात्र त्याकडे कोणीही फार गांभीर्याने पाहू नये. कारण शेवटी तो गावगाड्याचा प्रश्न असतो. गावात एखाद्याला वाटते की अमुक व्यक्तीबरोबर जाऊन आपले भले होईल तेव्हा तिथे तशी वेगळी युती-आघाडी पाहायला मिळते, ” असे ते म्हणाले.

अंजली दमानिया यांचे अजित पवारांवर गंभीर आरोप

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे त्यांच्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून पुण्यातील मुंढवा येथील ४० एकर जमीन खरेदी करत असतानाचे प्रकरण वादाचा मुद्दा ठरत आहे. या व्यवहारावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली होती आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा दमानिया यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई महापालिकेच्या गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयावरून दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

मुंबई महानगरपालिकेने ५०० कोटी रुपये खर्च करून बांधलेले शताब्दी रुग्णालय पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) या तत्वानुसार चालवण्यासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने रस दाखवला असल्याची एक बातमी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केली होती. ही बातमी शेअर करत अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. “आता आणखी एक ५०० कोटींचे हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना?” अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

हत्याकांडातील कथित आरोपीच्या भाजपा प्रवेशाला २४ तासांत स्थगिती

डहाणू तालुक्यात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला मोठा धक्का देत भारतीय जनता पक्षात (भाजपा) प्रवेश घेतलेले माजी जिल्हापरिषद सभापती काशिनाथ चौधरी यांच्या भाजपा पक्षप्रवेशाला अवघ्या २४ तासांत प्रदेशाध्यक्षांकडून स्थगिती देण्यात आली आहे. भाजपाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना प्रदेश पातळीवरून भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांनी तातडीने पत्र पाठवून हा निर्णय कळवला आहे. यामुळे स्थानिक भाजपाच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण झाले आहे. काशिनाथ चौधरी यांच्या भाजपा प्रवेशानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाल्याचे चित्र आहे. या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढल्याचा दावाही भाजपा नेत्यांनी केला होता.