कोल्हापूर : राज्यातील शिवसेना शिंदे गट-भाजप यांच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पाठोपाठ हसन मुश्रीफ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय राजकीय वर्तुळात धक्कादायक मानला जात आहे.

हसन मुश्रीफ यांच्या मागे ईडीची चौकशी सुरू असल्याने त्यातून सुटकेचा मार्ग म्हणून त्यांनी सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांनी या पक्षाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते कागल विधानसभा मतदारसंघातून सातत्याने निवडून येत राहिले. त्यांची पक्षनिष्ठा विचारात घेऊन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी कायम दिली. ते आत्तापर्यंत तीन वेळा मंत्री झाले होते. आता ते चौथ्यांदा मंत्री झाले आहेत.

हेही वाचा – आदित्य ठाकरे हेच लक्ष्य

काका ते पुतण्या समर्थक

हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. माझ्या हृदयात शरद पवार यांचे नाव कोरले आहे असे ते अभिमानाने नेहमी सांगत असत. आता त्यांनी काकांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली आहे.

ईडी चौकशीचे शुक्लकाष्ठ

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हसन मुश्रीफ हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बोलत असत. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र चालवले होते. यातूनच पुढे मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांची ईडी चौकशी सुरू झाली. त्यांच्या कागल ,पुणे, मुंबई येथील निवासस्थानी छापे टाकण्यात आले. त्यांचा संताजी घोरपडे हा खाजगी कारखाना तसेच ते अध्यक्ष असलेले कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथेही ईडीचे छापे वारंवार पडत राहिले.

हेही वाचा – Uttarakhand : समान नागरी कायद्याद्वारे लोकसंख्येवर नियंत्रण? सर्व समस्यांचे मूळ लोकसंख्या वाढ – भाजपा खासदारचे मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपचे माजी खासदार किरीट हे सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्या विरोधातील ईडीची कारवाई सुरूच राहील किंबहुना त्यांना अटक होईल अशा पद्धतीचे विधान करत होते. यामुळे ईडीचा ससेमिरा चुकवण्याच्या दृष्टीने मुश्रीफ यांनी काकांना बाजूला सारून पुतण्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनीही त्यांना मंत्री करून त्यांचा सन्मान केला आहे. आता मुश्रीफ हे कोल्हापूरचे पालकमंत्री बनतील अशी चर्चा सुरू आहे.