प्रल्हाद बोरसे

मालेगाव : भाजपमध्ये अस्वस्थ असलेले व अधून-मधून पक्षत्यागाची उघड भाषा करणारे येथील युवा नेते अद्वय हिरे यांनी भाजपला रामराम करत अखेर उध्दव ठाकरे शिवसेना पक्षाचे शिवबंधन बांधण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना मालेगावमधून शह देण्यासाठी ठाकरे गटातर्फे गेल्या काही दिवसांपासून सक्षम पर्यायाचा शोध सुरु होता. त्यानुसार हिरे यांना गळाला लावून ठाकरे गटाने भाजपलाही धक्का दिल्याचे मानले जात आहे.

रविवारी नाशिक येथे पार पडलेल्या समर्थकांच्या बैठकीत अद्वय हिरे यांनी भाजपचा त्याग करण्यावर शिक्कामोर्तब केले. तसेच येत्या २८ जानेवारीला मुंबईत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मूळच्या काँग्रेसी घराण्यातील अद्वय हिरे यांची सतत पक्षांतर करणारे नेते अशी ख्याती आहे. आजवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास झालेला आहे. वर्षभरापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपचे कमळ त्यांनी हातात घेतले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीची सत्ता स्थापन झाली. विधानसभा निवडणुकीत परस्परांविरुध्द लढलेल्या स्थानिक पातळीवरील विविध पक्षीय नेत्यांची ही महाआघाडी झाल्यानंतर मोठी पंचाईत झाल्याचे बघावयास मिळाले होते. हिरे यांचीही अशीच गत झाली होती.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघातील आमदार दादा भुसे यांना कृषीसारखे महत्त्वाचे खाते मिळाले होते. शिवसेना पक्ष बांधणीसाठी ते या मंत्री पदाचा पुरेपूर वापर करीत होते. दुसरीकडे राज्यात सत्ता असली तरी स्थानिक पातळीवर भुसे यांच्याकडून सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याने पक्ष वाढीवर मर्यादा येत असल्याचा सूर लावत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची खदखद तेव्हा सतत बाहेर पडत होती. अशाही स्थितीत आघाडी धर्मामुळे अगोदर ज्यांच्याशी दोन हात केले, त्या शिवसेनेच्या भुसेंचेच काम करण्याची वेळ आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसवर येईल,अशी स्पष्ट शक्यता दिसत होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाव नसल्याचे गृहितक लक्षात घेता हिरे यांनी तेव्हा भाजपचा रस्ता धरला असावा. भुसेंना टक्कर देण्यासाठी भाजपला मालेगावात प्रबळ पर्याय हवा होता आणि भाजपमध्ये जाणे ही हिरेंचीही राजकीय अपरिहार्यता होती. हिरेंच्या भाजप प्रवेशामुळे उभयतांची ही गरज भागवली गेली,अशी चर्चा तेव्हा राजकीय वर्तुळात रंगली होती.

नंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. शिवसेना फुटीनंतर राज्यातील ठाकरे सरकार गडगडले. शिंदे गटाने राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये भुसे यांना पुन्हा मंत्री पदाची संधी लाभली. नाशिकच्या पालकमंत्री पदाची धुराही त्यांच्या खांद्यावर सोपवली गेली. भाजप शिंदे गटाच्या या नव्या घरोब्यामुळे हिरेंना दुसऱ्यांदा राजकीय कोंडीला सामोरे जावे लागले. शिंदे गट व भाजपच्या युतीमुळे आगामी निवडणुकीत मालेगावात भुसेंची पाठराखण करण्याशिवाय भाजपसमोर पर्याय नाही,असा सध्या तरी रागरंग दिसत आहे. तेव्हा एकूणच स्वभावधर्म आणि राजकीय महत्त्वाकांक्षा बघता अद्वय हिरे हे भाजपमध्ये फार काळ टिकणार नाहीत,असा अनेकांचा होरा होता. ताज्या राजकीय कोंडीमुळे हिरे यांची अस्वस्थता जास्तच वाढली असल्याचे दिसत होते. त्यातून वेगवेगळ्या व्यासपीठांवरून बोलताना वेळप्रसंगी भाजपाला सोडचिठ्ठी देऊ, अशी भाषा ते करू लागले होते. त्याचे पर्यावसान अखेर त्यांचा पक्षत्याग आणि शिवबंधन बांधण्याच्या निर्णयात झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभेच्या सलग चार निवडणुकांमध्ये भुसे यांच्या विजयाचा आलेख चढता राहिल्याचे दिसून आले आहे. ठाकरे घराण्यातील अत्यंत विश्वासू अशी त्यांची ख्याती होती. त्यामुळे भुसे यांचे शिवसेनेच्या बंडात सामील होणे, हे अनेकांच्या दृष्टीने धक्कादायक होते. भुसे यांनी आपली साथ सोडणे हे खुद्द उध्दव ठाकरे यांनाही अत्यंत जिव्हारी लागल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भुसे यांना शह देण्यासाठी मालेगावात प्रबळ पर्याय शोधण्याचे गेली काही दिवस ठाकरे गटाचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत होते. त्या प्रयत्नाचाच भाग म्हणून हिरे हे ठाकरे गटाच्या गळाला लागले आहेत. अद्वय हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे यांचे कनिष्ठ सुपुत्र आहेत. हिरे यांचे थोरले सुपुत्र विधान परिषदेचे माजी आमदार अपूर्व हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. आता शिवसेनेत गेल्यावर हिरे हे भुसे यांना खरेच शह देतात का, हे बघणे नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे.