Brij Bhushan Singh On POCSO Case Closure दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने सोमवारी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख तथा भाजपाचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्याविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेला खटला न्यायालयाने बंद केला आहे. मंगळवारी यावर ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आनंद व्यक्त केला आणि म्हटले की, त्यांना भगवान हनुमान आणि न्यायव्यवस्थेवर खूप विश्वास आहे.
ब्रिजभूषण सिंह काय म्हणाले?
अयोध्येत पत्रकारांशी बोलताना ब्रिजभूषण सिंह म्हणाले, “मला भगवान हनुमानावर आणि स्वतःवर खूप विश्वास आहे. १८ जानेवारी २०२३ रोजी जेव्हा माझ्यावर आरोप लावण्यात आले, तेव्हा मी ते खोटे असल्याचे सांगितले होते. मी जे काही बोललो ते खरे ठरले. छळ रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कलमांचा आज गैरवापर होत आहे. दिल्ली न्यायालयाने सोमवारी पॉक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या लैंगिक छळाच्या खटल्याची सुनावणी रद्द करण्यासाठी पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला.
ब्रिजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता कशी झाली?
“खटला रद्द करण्याची विनंती मान्य केली,” असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश गोमती मनोचा यांनी सांगितले. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सिंग न्यायालयात हजर झाले होते. या प्रकरणात तक्रारदारालाही जबाब नोंदवण्यासाठी आणि पडताळणी करण्यासाठी बोलावण्यात आले होते. १७ मे रोजी न्यायालयाने तक्रारदार कुस्तीगीरला समन्स बजावले होते, जिने ब्रिजभूषण यांच्यावर अल्पवयीन असताना लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. पीडितेने तिचा जबाब मागे घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी जून २०२३ मध्ये या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.
१ ऑगस्ट २०२३ रोजी न्यायालयीन कामकाजादरम्यान, तक्रारदार आणि तिच्या वडिलांनी पोलिस तपासावर समाधान व्यक्त केले. मुख्य म्हणजे त्यांनी या प्रकरणात क्लोजर रिपोर्टलाही विरोध केला नव्हता. पोलिसांनी सिंहविरुद्धचा POCSO खटला रद्द करण्याची शिफारस केली होती, परंतु सहा महिला कुस्तीगीरांनी दाखल केलेल्या वेगळ्या गुन्ह्यात त्यांच्यावर लैंगिक छळ आणि पाठलाग केल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलिसांनी अल्पवयीन कुस्तीगीराची तक्रार रद्द करण्याची शिफारस केली होती, कारण त्यासंबंधित पोलिसांना कोणतेही पुरावे सापडले नाहीत.
अल्पवयीन कुस्तीगीराने केलेल्या आरोपांनंतर बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याअंतर्गत आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांखाली ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, अल्पवयीन कुस्तीगीराच्या वडिलांनी नंतर दावा केला की, त्यांनी ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध लैंगिक छळाची खोटी तक्रार दाखल केली आहे. वडिलांनी स्पष्ट केले होते की, डब्ल्यूएफआय प्रमुखांनी त्यांच्या मुलीशी केलेल्या पक्षपाती वागणुकीमुळे त्यांच्यात राग आणि निराशा होती, त्यामुळे त्यांनी हे कृत्य केले.