सुहास सरदेशमुख

नावाच्या पुढे ‘जी’ लावून तुम्हाला गोपीनाथजी म्हणता आलं असतं दिल्लीकरांसारखं. पण तो तुमचा स्वभाव नव्हता. नवव्या पुण्यतिथीबद्दल श्रद्धांजली. गेल्या नऊ वर्षात पुलाखाऊन बरंच पाणी वाहून गेलं हे सांगण्यासाठीच हा पत्रप्रपंच. तुम्ही निर्माण केलेल्या शरद पवार विरोधाच्या इंजिनाचे सुटे भाग आता एवढे बदलले आहेत की ते मूळ इंजिन राहिलेच नाही. त्या मूळ इंजिनास अधून-मधून विरोधी आवरण चढवल्याचे पद्धतशीर नाटक केले जाते. त्यामुळे आता मोजक्याच कार्यकर्त्यांना ‘ प्रसाद’ मिळतो आणि काही जणांचेच ‘ लाड ’ होतात. बरं हे कोणाजवळ तरी म्हणून दाखवावं तर तशा जागाच शिल्लक नाहीत. व्यक्त होणारा पक्षद्रोही ठरतो. ‘लोकनेते’ खूप असतात ही संकल्पनाच आता मोडीत निघाली आहे. पण तुम्ही घडविलेल्या विरोधाच्या मानसिकतेमुळे कमालीची कोंडी झाली बघा.

गाडीभर पुरावे घेऊन सिंचन घोटाळयातील कागदपत्रे चितळे समितीसमोर नेताना घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन विरोधी मानसिकतेमधील शेवटचे. त्याच ‘ सिंचन घोटाळ्या’च्या आधारे सत्तेपर्यंत पोहचता आलं पण नंतर हळुहळू हवा बदलत गेली. ‘ शरद पवार यांचं बोट पकडून आम्ही राजकारण करतो. ते देशातील ‘ कद्दावर’ नेते आहेत’, असं शीर्षस्थ नेतृत्वाचं वक्तव्य आलं. बारामतीमध्ये जाऊन नेत्यांनी स्वागत स्वीकारल्यानंतर तुम्ही निर्माण केलेली विरोधी मानसिकता होती, त्याचं आता काय करायचं असा प्रश्नच होता. तो अजूनही कायम आहे. ती कोंडी काही फुटली नाही बघा.

कार्यकर्त्यांचा पक्ष ही संकल्पना तोंडी लावण्यापुरती ठेवायची आणि राष्ट्रवादी ‘ सुभेदारी’ रचनेचा असावी हे प्रारुप ‘शीर्षस्थ’ नेतृत्वाने महाराष्ट्रापुरतं मान्य केलं आहे. त्यामुळे तुम्हाला वसंतराव भागवतांनी दिलेले ‘ माधव’ सूत्र आता संघटनेत ‘दुय्यम’ स्तरीय झाले आहे. मराठा नेतृत्वाने कमळ हाती घेतल्याशिवाय महाराष्ट्र उभाच राहणार नाही, हे सत्य जणू पक्षाच्या स्थापनेमध्ये होते अशा पद्धतीने त्याचा प्रभावी प्रचार आणि अंमलबजावणी सुरू आहे. कळते नेते चक्कार शब्द बोलत नाहीत. मग रोज नवाच माणूस उभा राहतो माध्यमांमध्ये बोलायला. जो माणूस पक्षाची बाजू मांडतो आहे त्याचं पक्ष वाढीतील योगदान वगैरे असले प्रश्न विचारणं म्हणजे महापाप ठरेल. याला पक्षीय लोकशाहीचे सुमारीकरण म्हणा किंवा ‘कंभोजीकरण’ ! हा शब्द तुम्हाला कळणार नाही. या जरा अलिकडच्या घटना आहेत. पण तुमच्या काळात बाजू मांडणारे माधव भंडारी आता दिसत नाहीत टिव्हीवर.

कदाचित त्यांची उपयोगीता संपली असेल. नव्या माणसांना पक्षात घ्यावे, हे गरजेचेच. तुम्हीही माणसं पक्षात आणली. अगदी कॉग्रेस आणि राष्ट्रवादीतूनसुद्धा. अगदी छत्रपती उदयनराजे यांना आठवे वंशज म्हणून तुम्हीच त्यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ घडवून आणला होता. पक्षाच्या ‘माधव’ सूत्राला शेवटी ‘म’ जोडून ‘माधवंम’ करायला हवे ही तेव्हाची गरज होती. आता सूत्राच प्रारंभच तेथे होतो. पण काहीही म्हणा, प्रचाराचा बाजात सामाजिक सहिष्णुता जपण्याच्या काळातून जाताना पक्ष संघटनेला आपले मत ठामपणे सांगता येण्याची ताकद तुमच्या काळातच तशी कमी होऊ लागली होती. आता ती पूर्णत: संपली आहे. आता सारे ठरलेले असते. पाचवीच्या वर्गात गाळलेल्या जागा भरण्यासाठी तीन पर्याय दिलेले असतात त्यातील एक निवडायचा असतो. आता ते दोन पर्यायही काढून टाकले आहेत. उत्तर ठरले आहे. तेवढे प्रश्नपत्रिका सोडविल्याप्रमाणे लिहायचे आणि ‘ जय श्रीराम’ म्हणायचे, असं सुरू आहे. तुम्ही असता तर पक्षांतर्गत दोन खटपटी केल्या असत्या. असो. किती तरी सांगायचे आहे. पण् पुढे कधी तरी असंच पत्रातून बोलत राहू. आज आपण नसल्याची आठवण सर्वत्र आहे. कदाचित तेवढी साजरी करतील सारे. पण तुम्ही कायम मनात राहाल एक उत्तम संघटक आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता म्हणून.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपला एक चाहता