अविनाश पाटील
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात अखेर एकदाचे खाते वाटप जाहीर झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील चारपैकी तीन मंत्र्यांना अपेक्षेप्रमाणेच खाते मिळालेले असले तरी नाशिक जिल्ह्यातील दादा भुसे यांना मात्र बंदरे आणि खनिकर्म खात्याची जबाबदारी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. खुद्द भुसेंनी याविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली नसली तरी कार्यकर्त्यांकडून मात्र असमाधान व्यक्त केले जात आहे.
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातून मालेगाव बाह्यचे दादा भुसे, जळगाव ग्रामीणचे गुलाबराव पाटील या शिंदे गटाच्या मंत्र्यांसह नंदुरबारचे डाॅ. विजयकुमार गावित, जामनेरचे गिरीश महाजन या भाजपच्या मंत्र्यांचा समावेश आहे. याआधी या सर्वांनीच मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळलेली असल्याने अनुभवी म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळेच या चौघांनाही महत्वाचे खाते दिले जाईल, अशी अपेक्षा भाजप आणि शिंदे गटात व्यक्त केली जात होती. आदिवासी विकास खात्याची जबाबदारी याआधीही सांभाळलेली असल्याने डाॅ. गावित यांना तेच खाते देण्यात आले. अर्थात, डाॅ. गावित यांनाही यापेक्षा दुसऱ्या खात्याची अपेक्षा नव्हती. जे हवे तेच खाते मिळाल्यामुळे डाॅ. गावित यांना नंदुरबार या आपल्या आदिवासी जिल्ह्यावर पकड घट्ट करण्यास मदतच मिळणार आहे. भाजप-सेना युती सत्तेत असताना जलसंपदा खाते सांभाळलेले गिरीश महाजन यांना नवीन जबाबदारीत ते खाते मिळाले नसले तरी वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास, क्रीडा अशी महत्वाची खाती त्यांना मिळाली आहेत. खाते कोणतेही असो, तुम्ही काम कसे करता, यावर सर्वकाही अवलंबून असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे. मिळालेल्या खात्यांवर समाधानी असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. जळगाव जिल्ह्यातून महाजन हे भाजपचे एकमेव मंत्री आहेत. राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथ खडसे यांच्या विरोधातील जिल्ह्याच्या राजकारणात या खात्यांचा महाजन हे नक्कीच उपयोग करुन घेतील,असे बोलले जाते.
महाविकास आघाडी सरकारमध्ये पाणीपुरवठा आणि स्वच्छता खाते सांभाळलेले शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांना पुन्हा त्याच खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिंदे गटास सर्वप्रथम जाऊन मिळणाऱ्या मंत्र्यांमध्ये गुलाबराव हे पहिले होते. त्यामुळे त्यांना दुसरे एखादे अधिक महत्वाचे खाते देण्यात येईल, अशी कार्यकर्त्यांची भावना होती. परंतु, तसे घडले नाही. गुलाबरावांनी यासंदर्भात कोणतीही नाराजी व्यक्त केलेली नाही. मिळालेल्या खात्याचा अधिक चांगल्या प्रकारे जनतेच्या कल्याणासाठी उपयोग करुन घेता येईल, असे त्यांना वाटते. शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्या विभागीय बैठकीसाठी मालेगावची निवड केल्यानंतर दादा भुसे यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या राजकीय वजनाची चर्चा नाशिक जिल्ह्यात चांगलीच रंगली होती. शिंदे आणि भुसे हे चांगले मित्र असल्याने भुसे यांना मंत्रिमंडळात वेगळे खाते दिले जाईल, असेच सर्वांना वाटत होते.
भाजप-सेना युती सत्तेत असताना ग्रामविकास राज्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारात कृषिमंत्री राहिलेल्या भुसे यांना शिंदे-फडणवीस सरकारात बंदरे आणि खनिकर्म खात्यांचा कार्यभार देण्यात आला आहे. या खात्यांचा भुसे यांच्या मतदारसंघाशी तसा कोणताही संबंध नाही. स्वत: भुसे यांना कृषी खाते नको होते. कृषिचा कार्यभार सांभाळताना सारखे फिरणे भाग असते. पाठीचे दुखणे असलेल्या भुसे यांना त्यामुळेच कृषिऐवजी दुसरे खाते हवे होते. मिळालेल्या खात्यांविषयी त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली नसली तरी त्यांच्या कार्यकर्त्यांचा नकारात्मक सूर बरेच काही सांगून जातो.