नागपूर: आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ८० टक्के नवीन चेहऱ्यांना संधी देणार, असे सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या तयारीची जबाबदारी माजी नगरसेवकांच्या खांद्यावर टाकली आहे ,ऐवढेच नव्हे तर संघटनात्मक पातळीवरील नियुक्त्या करतानाही त्यांना विश्वासात घेतले जात आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांच्या मनात पुन्हा उमेदवारी मिळण्या बाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

२०१७ नंतर तब्बल आठ वर्षाने आणि कार्यकाळ संपल्यावर तीन वर्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने यासाठी जोरदार तयारी सुरू केली असून. सलग पंधरा वर्ष महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या या पक्षाला ती याही वेळी टिकवून ठेवायची आहे. सत्ताकाळात जनहिताच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने आणि प्रशासकीय राजवटी दरम्यान नगरसेवकांनी (आ्ता माजी) लोकांना वाऱ्यावर सोडल्याने जनतेत कमालीचा संताप आहे.

त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो हे गृहीत धरून पक्षाने ८० टक्के नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे सुतोवाच केले होते व या माध्यमातून पक्षातील दुसऱ्या फळीला कामाला लावले होते. परंतु, त्यामुळे पक्षातील प्रस्थापित वर्गात नाराजीचे सूर उमटले. काहींनी त्यांची पक्ष कार्यक्रमातील सक्रियता कमी केली. त्याशिवाय काहींनी पक्षाने तिकीट दिले नाही तर इतर पक्षाकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी जुळवाजुळव सुरू केली होती. हा एक प्रकारे बंडाचा इशाराच होता. त्यामुळे प्रत्येक जागा महत्वाची समजणाऱ्या भाजपने सावधगिरीची भूमिका घेणे सुरू केले.

भाजपसाठी महत्वाची निवडणूक

दुसरीकडे नागपूर महापालिकेची निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा विषय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नागपूर हे गृहशहर असल्याने भाजप येथे कुठलाही धोका पत्करायला तयार नाही, कुठल्याही परिस्थितीत महापालिकेवर चौथ्यांदा झेंडा फडकावयाचाच असा निश्चय पक्षाने केला आहे, २०१७ च्या निवडणुकीत भाजपला १५१ पैकी १०२ जागा मिळाल्या होत्या.

आताही संख्या पक्षाला १२० ते १२५ पर्यंत न्यायची आहे. यासाठी पक्ष एकसंघ असणे आवश्यक असून निवडणुकीचा अनुभव असणाऱ्या लोकांची गरज आहे, त्यांना दूर सारण्याचा धोका सध्या तरी पक्ष स्वीकारण्याच्या मनस्थितीत नाही, त्यामुळेच ८० टक्के नवीन चेहरे देण्याचा निर्णय सध्यातरी भाजपने बाजूला ठेवला असून जुन्या म्हणजे माजी नगरसेवकांववर पक्षाच्या कार्यक्रम अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच त्यांना पक्ष संघटनेतील नियुक्त्या करताना विश्वासात घेणे सुरू केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक प्रभागात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम पक्षाने हाती घेतला आहे. याच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही माजी नगरसेवकांवरच टाकण्यात आली आहे. या शिवाय पक्षाच्या मंडळ स्थरावरील कार्यकारिणी लवकरच जाहीर केली जाणार असून त्यासाठी माजी नगरसेवकांकडून नावे मागवण्यात आली आहे. या सर्व बाबींकडे माजी नगरसेवकांना महत्व देण्याच्या अनुषंगाने बघितले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पक्षाकडून पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी आशा माजी नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.