Jharkhand Dhanbad Murder Case : काँग्रेसच्या नेत्यासह चार जणांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या भाजपाच्या नेत्याची न्यायालयानं ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. तसेच या हत्याकांडातील इतर ११ आरोपीही निर्दोष सुटले. झारखंडमधील धनबाद जिल्हा सत्र न्यायालयानं बुधवारी (तारीख २७ ऑगस्ट) हा निकाल दिला. या निर्णयामुळे कधीकाळी राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या हत्याकांडाकडे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. दरम्यान, हे हत्याकांड नेमकं कधी आणि कसं घडलं होतं? त्यासंदर्भात घेतलेला हा सविस्तर आढावा…
धनबाद हत्याकांड नेमकं कसं घडलं?
२१ मार्च २०१७ रोजी संध्याकाळी काँग्रेस नेते व धनबादचे तत्कालीन उपमहापौर नीरज सिंह हे त्यांचे अंगरक्षक, चालक आणि वैयक्तिक सहाय्यकासह एका कारमधून प्रवास करीत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवली आणि अंदाधूंद गोळीबार केला. या गोळीबारात नीरज सिंह यांच्यासह त्यांच्या चारही साथीदारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनं धनाबाद जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात तातडीनं गुन्हा दाखल करत घटनास्थळाची पाहणी केली. नीरज यांना लक्ष्य करण्यासाठी हल्लेखोरांनी एके-४७ रायफल्ससह बंदुकीतून ६० हून अधिक गोळ्या झाडल्या होत्या. हा हल्ला त्यांच्या वाहनावर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलेला हल्ला होता, अशी माहिती पोलिसांनी त्यावेळी दिली.
हत्याप्रकरणात तत्कालीन भाजपा आमदारावर गुन्हा
हत्याकांडाच्या या घटनेमुळे धनबादमधील कोळसा व्यापाराशी संबंधित राजकीय आणि व्यावसायिक वैमनस्य पुन्हा एकदा समोर आलं. नीरज सिंह यांची हत्या झारखंडच्या राजकीय वर्तुळाला हादरवून टाकणारी होती. नीरज सिंह यांच्या हत्येनंतर पोलिसांनी दोन दिवसांच्या आत एफआयआर (FIR) दाखल केला. त्यामध्ये तत्कालीन भाजपाचे आमदार संजीव सिंह यांच्यासह आणखी पाच जणांची नावे आरोपी म्हणून नोंदवण्यात आली. आरोपी संजीव सिंह हे मृत नीरज सिंह यांचे चुलत भाऊ आहेत. पोलिसांच्या मते- या हत्याकांडामागे चुलत भावांमधील तीव्र राजकीय आणि व्यावसायिक वैरच कारणीभूत होते. १९९० च्या दशकाच्या मध्यात धनबादचे माजी डॉन आणि कुटुंबप्रमुख सूर्यदेव सिंह यांच्या निधनानंतर राजकीय वारसा आणि व्यवसायावर नियंत्रण मिळवण्याच्या संघर्षातून हे वैर सुरू झाले होते.
आणखी वाचा : Jagdeep Dhankhar Pension : जगदीप धनखड यांचं निवृत्ती वेतन कशामुळे बंद? कारण काय?
पोलिसांच्या तपासानंतर मे २०१७ मध्ये उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने (STF) गोळीबार करणाऱ्या आरोपींना शोधून काढलं आणि त्यांना अटक केली. पुराव्याबद्दल अनेक शंका आणि नाट्यमय वळणांमुळे या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू होती. सप्टेंबर २०२२ मध्ये धनाबाद न्यायालयाने या हत्याकांडाशी संबंधित एका अतिरिक्त खटल्यात चार शूटर आणि आणखी दोन आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. या प्रकरणातील एक आरोपी अमन सिंह दीर्घकाळ तुरुंगात होता. मात्र, २०२३ मध्ये धनबाद तुरुंगातच त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
उर्वरित सर्व ११ आरोपींची निर्दोष मुक्तता
२०२३ नंतर या प्रकरणात कोणतीही हालचाल झाली नव्हती. मात्र, बुधवारी धनबाद येथील विशेष न्यायालयाने भाजपाचे माजी आमदार संजीव सिंह यांच्यासह उर्वरित ११ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या या निकालानंतर धनबादच्या स्थानिक राजकारणात नव्या तणावाला सुरुवात झाली आहे. संजीव सिंह यांच्या कुटुंबासाठी हा निकाल मोठा दिलासा देणारा ठरला आहे. “हा सत्याचा विजय असून आम्ही न्यायालयाचे आभार मानतो. या निकालानंतर संपूर्ण कोळसा पट्ट्यात आनंद पसरला आहे”, अशी प्रतिक्रिया संजीव सिंह यांच्या पत्नी व भाजपाच्या विद्यमान आमदार रागिणी सिंह यांनी दिली.
संजीव सिंह हे राजकारणात पुन्हा सक्रिय होतील का? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता, “लोक त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत, मीही त्यांना पुन्हा जनतेसमोर आणणार आहे. आपल्या नेत्याची आठ वर्ष कोण इतक्या संयमाने वाट पाहतो. एका गृहिणीसाठी राजकारणात पाऊल टाकणं हे मोठं आव्हान होतं; पण जनतेने मला साथ दिली,” असंही आमदार राणिगी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : मराठा समाजाच्या आंदोलनाला ‘या’ नेत्यांचा पाठिंबा; कोणकोणत्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट?
नीरज सिंह यांच्या पत्नीचे भाजपावर गंभीर आरोप
नीरज सिंह यांच्या पत्नी व काँग्रेसच्या माजी आमदार पूर्णिमा यांनी या प्रकरणावरून भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. “ही घटना भाजपा सरकारच्या काळात घडली होती, त्यामुळे सुरुवातीपासूनच या प्रकरणाचा तपास गंभीर चुकांनी भरलेला होता. माझ्या पतीच्या हत्येची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही केली होती, त्यासाठी विधानसभा सभागृहाबाहेर आंदोलनही केलं. आता तपासामध्ये आरोपींविरोधात कोणतेही पुरावे सापडले नाही, तर दोष कुणाचा आहे? या बिघडलेल्या तपासासाठी कोण जबाबदार आहे?” असा प्रश्न त्यांनी विचारला. पूर्णिमा सिंह यांनी आमदार रागिणी सिंह यांच्यावर सूडभावनेतून वागण्याचा आरोप केला आणि त्यांच्यापासून आपल्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं.
माझ्या पतीचा दोनदा मृत्यू झाला : पूर्णिमा सिंह
न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना पूर्णिमा भावूक झाल्या. “माझ्या पतीचा मृत्यू दोनदा झाला — पहिला २१ मार्च रोजी (खुनाच्या दिवशी) आणि दुसरा २७ ऑगस्ट रोजी (न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यावर). दिवसाच्या शेवटी असं वाटतं की जणू नीरजचा खून कोणीच केला नाही. संजीव सिंह यांच्या कुटुंबाचा पूर्वीपासूनच विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग राहिल्याचा आरोप आहे. झारिया किंवा धनाबादमध्ये जो कोणी त्यांच्या विरोधात उभा राहिला त्याची हत्या झालेली आहे, हे मी म्हणत नाही तर नोंदी सांगतात. भाजपा आमदार रागिणी अधिकाऱ्यांवर आरोप करतात की, त्यांनी त्यांच्या पतीला अटक केली; पण हे सर्व त्यांच्या भाजपा सरकारच्या काळात घडलं. आता त्या लोकांना उघडपणे धमकावत असून त्यांचे इशारे आम्हाला उद्देशूनच आहेत”, असं पूर्णिमा सिंह यांनी म्हटलं. दरम्यान, आठ वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेच्या न्यायालयीन निकालाची संपूर्ण झारखंडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.