जालना : जवळपास चार दशके शिवसेनेत असलेले जालना जिल्हयातील माजी आमदार शिवाजी चोथे यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. ‘मला तिकिट मागायला दिल्लीला जावे लागत नाही’ असे पवार या कार्यक्रमात चोथे यांच्या समर्थकांना उद्देशून म्हणाले. त्यांच्या या विधानाचा नेमका अर्थ कसा काय काढायचा? असा प्रश्न आता घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
२००९ मध्ये विधानसभा राजेश टोपे मतदार संघ पुनर्रचनेपूर्वीच्या अंबड आणि त्यानंतर घनसावंगी विधानसभा मतदार संघातून सलग पाच वेळेस निवडून आलेले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. ‘चोथे यांच्याबरोबर आलेल्यांना वाटेल की या तालुक्यातून पुन्हा कुणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला तर यांचे काय होईल? असे वाटू देऊ नका. मला तिकिट मागायला दिल्लीला जावे लागत नाही’असे अजित पवार चोथे यांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात म्हणाले.
पवार यांचे हे वक्तव्य राजेश टोपे यांना उद्देशून होते आणि आता चोथे यांच्या रुपाने त्यांना पर्याय सापडला आहे,अशी प्रतिक्रिया टोपे यांच्या काही राजकीय विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे.परंतु यामागे चोथे यांच्याबद्दल प्रेम कमी आणि टोपे यांच्या विरोधाची भावनाच अधिक असल्याचे निरीक्षण आवर्जून नाेंदवले जात आहे. अजित पवार म्हणाले त्याप्रमाणे त्यांच्या पक्षाचे तिकिट दिल्लीतून आणावे लागत ना यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही तिकिटासाठी दिल्लीला जावे लागत नाही.
राहता राहिले भाजप आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पातळीवरील पक्ष. परंतु या दोन्ही पक्षांचा सध्या तरी घनसावंगी विधानसभा मतदार संघाच्या पार्श्वभूमीवर विचार किंवा चर्चा होत नाही. परंतु असे असले तरी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राजेश टोप.यांना मात्र चर्चेचा विषय केले जात आहे. जिल्ह्यातील दिवंगत नेते अंकुशराव टोपे आणि राजेश टोपे हे नेहमीच शरद पवार तसेच सुप्रिया सुळे यांचे निकटवर्ती राहात आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर सत्तेचे महत्व ओळखून राजेश टोपे यांनी आजित पवार यांच्या सोबत जावे असे मत असणारा एक वर्ग त्यांच्या कार्यकर्त्यांत होता.
परंतु त्यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ते राज्यातील सत्तेपासून दूर गेले. याबद्दल आनंद झालेली काही मंडळी जालना आणि नजिकच्या जिल्हयातही आहे. त्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतीलही आहेत. नुकताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले चोथे दोन वेळेस टोपे यांच्या विरोधात विधानससभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर पराभूत झालेले आहेत. चोथे १९९५ मध्ये विधानसभेवर निवडून आले त्यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे विलास खरात होते.
चोथे यांनी शिवसेनेची साथ सोडून अजित पवार यांचे नेतृत्व का स्वीकारले , या पक्षाकडून भविष्यात विधान सभेची निवडणूक लढविण्याची सुप्त इच्छा त्यांच्या मनात आहे का? हइत्यादी प्रश्नांची सरळ उत्तरे त्यांच्याकडून मिळणार नाहीत हे स्पष्ट आहे. या चोथे स्वतः जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्याची किंवा राष्ट्रवादीतील संघटनात्मक पदावर जाण्याची शक्यता दिसत नाही. मुलगा विनायक चोथे याला जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हयाच्या सक्रीय राजकारणात उतरविण्याची शिवाजी चोथे यांची इच्छा असण्याची शक्यता अधिक आहे. परंतु अद्याप जिल्हा परिषद मतदार संघ निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे या प्रश्नांच्या उत्तरांसाठी कांही काळ थांबावे लागेल हेच खरे!